आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘वेद शाळेत शिकवणे हा प्रस्ताव अयोग्यच’; सत्यपालांचे म्हणणे शंकराचार्यांनी नाकारले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- वेदांचे ज्ञान अत्यावश्यक अाहे. त्यामुळे वेदाचे शिक्षण शाळांमध्ये दिले पाहिजे, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपालसिंह यांनी शुक्रवारी (१९ जानेवारी) औरंगाबादेत व्यक्त केले होते. त्याला करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नृसिंहभारती यांनी कडाडून विरोध दर्शवला. वेद म्हणजे ज्ञान असले तरीही हा विषय शाळा, कॉलेजात शिकवण्यासारखा नाही. तो गुरुकुल पद्धतीनेच शिकवण्याची परंपरा असून ती देशाने जपली पाहिजे, असे त्यांनी ‘दिव्य मराठी’शी शनिवारी बोलताना स्पष्ट केले.


शहरात सध्या वैदिक संमेलन सुरू आहे. शुक्रवारी याचे उद््घाटन  सत्यपाल सिंह यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करवीर पीठाचे शंकराचार्य उपस्थित होते. त्यांच्यासमोरच सिंह यांनी वादग्रस्त विधाने केल्याने खळबळ उडाली. मानवाची निर्मिती माकडापासून नाही. वेद शाळा, महाविद्यालयांत शिकवले गेले पाहिजेत, असे ते म्हणाले होते. यावर शंकराचार्यांचे मत काय आहे हे दिव्य मराठी प्रतिनिधीने जाणून घेतले.

 

करवीर पीठाचे शंकराचार्य म्हणतात...
 वेद शाळा, महाविद्यालयात शिकवले पाहिजेत का?

उत्तर : वेद शिकण्याची विशिष्ट पद्धत व परंपरा आहे. वेद मुखोद्गत पद्धतीने शिकवले जातात. त्यामुळे त्याला गुरुकुल परंपरा लागू केली आहे. 
पण शाळांत वेद शिकवण्याविषयी आपले नेमके म्हणणे काय?
उत्तर : शाळा-कॉलेजात वेद शिकवणे शक्य नाही.     
 मनुष्याची निर्मिती माकडापासून झाली, हा डार्विनचा सिद्धांत खरा की खोटा?
उत्तर : वेदांत सांगितल्याप्रमाणे मनुष्याची आणि सृष्टीची निर्मिती एकाच वेळी झाली आहे. ती ईश्वरानेच केली आहे, असे वेद म्हणतात. आम्हाला डार्विनच्या संशोधनाबद्दल काहीही बोलायचे नाही. तो एक सिद्धांत त्यांनी मांडला. वेद त्याहीपेक्षा जुने आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.

 

सत्यपाल म्हणाले होते, वेद शाळांमध्ये शिकवा

आपल्या ऋषी-मुनींनी निर्माण केलेले वेद सृष्टीच्या निर्मितीआधीचे आहेत. वेदांमुळेच पृथ्वीवरील माणूस सुसंस्कृत बनला आहे. वेदांचे हे सखोल ज्ञान शालेय अभ्यासक्रमातच शिकवले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपालसिंह यांनी शुक्रवारी वैदिक संमेलनाचे उद््घाटन करताना केले होते. केंद्र वेदांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी व्यवस्था करणार असल्याचा दावाही त्यांनी केला होता. 

बातम्या आणखी आहेत...