आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टेशनजवळ 2 वर्षांत तिसऱ्यांदा फुटली जलवाहिनी; निम्म्या शहराला निर्जळी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ठिकठिकाणच्या जलवाहिनीची दुरुस्ती व महावितरणने गुरुवारी वीजपुरवठा खंडित केल्याने शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला असतानाच शुक्रवारी रात्री दोन वाजता रेल्वेस्टेशन परिसरातील १४०० मिमी व्यासाची जलवाहिनी फुटली. तिची दुरुस्ती शनिवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत सुरूच होती. त्यामुळे रविवारी निम्म्याच शहराला पाणीपुरवठा होणार असून निम्म्या शहराला पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. दोन वर्षांत तिसऱ्यांदा रेल्वे उड्डाणपूल परिसरात ही जलवाहिनी फुटली. एकदा व्हॉल्व्हला गळती लागल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळित झाला होता. 


दुरुस्ती चार तास, चार एमएलडीचा तुटवडा 
दुरुस्तीसाठी ४ तास जलवाहिनी बंद ठेवली होती. या जलवाहिनीतून ताशी एक एमएलडी पाणी जलकुंभात साठले असते. म्हणजेच चार एमएलडी पाण्याचा तुटवडा निर्माण झाला.

 
या भागांना आज पाणी मिळणार नाही 
पुष्पनगरी, अदालत रोड, क्रांतीनगर, कोकणवाडी, भाग्यनगर, सुयोग कॉलनी, कोटला कॉलनी, चिंतामणी कॉलनी, खोकडपुरा, दलालवाडी, अजबनगर, सब्जीमंडी, श्रीनिकेतन कॉलनी, बंजारा कॉलनी, जाफर गेट, बहादूरपुरा, समतानगर, समर्थनगर, नागेश्वरवाडी, एस. बी. कॉलनी, स्वातंत्र्यसैनिक कॉलनी, निराला बाजार, कैलासनगर, दत्तनगर, लालमंडी, प्रगती कॉलनी, भावसिंगपुरा, नारळीबाग, बुढीलेन, टिंबर गल्ली, विवेकानंदपुरा. 


साठवण टाकी भरल्यानंतर दाब वाढल्यामुळे तडे 
रात्री शहरातील जलकुंभात रात्री पाणी भरण्यापूर्वी जलकुंभाच्या साठवण टाकीत भरून घेतली जाते. ती भरल्यानंतर जलवाहिनीवरील दाब वाढतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी जलवाहिनी फुटते. 


वारंवार याच ठिकाणी का फुटते जलवाहिनी? 
नक्षत्रवाडी ते रेल्वेस्टेशनपर्यंत जलवाहिनी समतल आली आहे. मात्र रेल्वे स्टेशन उड्डाणपूल परिसरात जमिनीचा भाग सखल असल्याने पाण्याचा दाब वाढतो आणि जलवाहिनी फुटते. 


हडको-सिडकोत नियमित पाणी
१४०० मिमी व्यासाची जलवाहिनी फुटली तरी त्याचा परिणाम हडको-सिडकोवासीयांवर होणार नाही. दोन्ही भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीत नियमित पाणी येत असून जलकुंभ भरले. त्यामुळे येथे नियमित पाणीपुरवठा होईल.

बातम्या आणखी आहेत...