आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वशांतीसाठी दुआ करून आज इज्तेमाचा समारोप; रविवारी गर्दीचा उच्चांक गाठला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अौरंगाबाद/वाळूज- लिंबेजळगाव येथील इज्तेमाने रविवारी गर्दीचा उच्चांक गाठला. रविवारी या इज्तेमामध्ये साडेचार हजार जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळाही पार पडला. सोमवारी विश्वशांतीसाठी विशेष दुआ अदा करून सकाळी ११ वाजता इज्तेमाचा समारोप होणार आहे. 


जगभरातील ६८ देशांमधून आणि भारतभरातून आलेले मुस्लिम भाविक सोमवारी सकाळी ११ वाजता विश्वशांतीसाठी दुवा करणार आहे.  दिल्ली मरकजचे उलेमा धर्मगुरू हजरत मौलाना साद यांच्या बयानानंतर  सामूहिक  दुवा केली जाणार आहे. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार समारोपानंतर सर्वप्रथम पायी जाणारे, त्यानंतर दुचाकीवर आलेले आणि त्यानंतरच जिल्हानिहाय आलेले भाविक शामियान्यातून परतणार आहेत. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी आयोजकांतर्फे पूर्ण काळजी घेतली जात असल्याचे लिंबेजळगावचे सरपंच सय्यद अनिस पटेल यांनी सांगितले. 


उद्याचा वाळूजचा बाजार रद्द
सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास प्रमुख उलेमा हजरत मौलाना साद  हे भाविकांना मार्गदर्शन करणार असून त्यानंतर सामूहिक दुआने सांगता होणार आहे. सांगतेच्या पार्श्वभूमीवर वाळूजचा सोमवारी भरणारा आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहे.


तीन महिन्यांपासून सुरू होती तयारी
गेल्या तीन महिन्यांपासून राज्यस्तरीय  इज्तेमाची तयारी जिल्हा कमिटीच्या वतीने केली जात होती. त्यासाठी तब्बल २ हजार २०० एकर जागेचे सपाटीकरण केले गेले. 


पाण्याच्या सुविधेसाठी २२ शेततळी खोदून त्यात कोट्यवधी लिटर पाणी साठवले गेले. मांढरादेवी यात्रेत आगीची घटना घडली होती. त्यात अनेक भाविकांचा मृत्यू झाला होता. अशी संभाव्य दुर्घटना लक्षात घेऊन ही दक्षता बाळगण्यात आली. इज्तेमास्थळी चहूबाजूने चार इंची पाण्याची पाइपलाइनही टाकण्यात आली.  त्यावर पंप बसवण्यात आला. 


नमाज अदा करून साथी घराकडे 
रविवारी दिवसभर कार्यक्रमांना हजेरी लावून जोहर, असर, मगरीबची नमाज अदा करून साथी घरी परतत आहेत. अनेकांनी इशाची नमाज झाल्यावर इज्तेमा कार्यक्रमातून परतणे पसंत केले. 

 

इज्तेमास्थळी वाखाणण्याजोगी पार्किंग व्यवस्था 
भाविकांच्या वाहनांसाठी इज्तेमा कमिटीच्या वतीने पार्किंगची उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी, जिल्हानिहाय व्यवस्था ठेवली आहे. राज्यातील २४ जिल्ह्यांसाठी स्वतंत्र पार्किंग आहे. कोणत्याही क्षणी वाहने काढावयाची झाल्यास वाहनधारकांना कुठलीच अडचण येत नाही. याच पार्किंगमध्ये दुसऱ्या बाजूने दुचाकी वाहने आहेत. त्यासाठी,स्वयंसेवक नेमण्यात आलेले आहेत.   

 

मौलाना व उलेमांकडून दिवसभर मार्गदर्शन
इज्तेमा कार्यक्रमावर तब्बल ५००  सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असून पहाटे पाच वाजता फजरच्या नमाजनंतर मौलाना जमशेद व हजरत मौलाना साद यांचे प्रवचन झाले. सकाळी दहाला जोहरच्या नमाजनंतर मौलाना शौकत सहाब व मौलाना शमीम यांनी मार्गदर्शन केले. सायंकाळी पाचला असरच्या नमाजनंतर साडेचार हजार सामूहिक विवाह सोहळे पार पडले. मगरीबच्या नमाजनंतर हजरत मौलाना साद यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम झाला.

बातम्या आणखी आहेत...