आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: रंगकर्मींच्या धमकीमुळे ‘संत एकनाथ’साठी दाेन कोटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- संत एकनाथ रंगमंदिराच्या दुरवस्थेचे रंगकर्मींनी वाभाडे काढल्यानंतर महापालिकेने ५० लाख खर्चून रंगरंगोटी तसेच अन्य काम करण्याचे ठरवले होते. परंतु मनपाच्या वर्धापन दिनानिमित्त होणारे नाटक उधळून लावले जाईल, अशी धमकी नाट्यप्रेमींनी दिल्याने चित्र बदलले. महापौर नंदकुमार घोडेले यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत एका फटक्यात जिल्हा नियोजन मंडळातून 2 कोटी रुपये मंजूर करून घेतले. आता या नाट्यगृहावर अडीच कोटी रुपये खर्च होणार असून त्यात अत्याधुनिक आसन व्यवस्थेसह रंगमंच, प्रकाशयोजना सर्व काही नवीन अन् दर्जेदार असणार आहे. 


डीपीसी निधी वापराचा निघाला मार्ग 
रंगमंदिराचीदुरवस्था सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर गेल्यानंतर पालकमंत्री रामदास कदम यांनी नाट्यगृहासाठी 2 कोटी रुपये देण्याची घोषणा केली. खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट यांनीही निधी देण्याची घोषणा केली होती. परंतु त्यांचा निधी दुरुस्तीवर खर्च करता येत नाही, अशी अडचण समोर आली आणि प्रकरण गुलदस्त्यात गेले. त्यामुळे मनपाने आपल्या निधीतून ५० लाख रुपये खर्चून नूतनीकरणाचा निर्णय घेतला. इकडे मनपाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या नाट्यगृहात नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला होता. 


येथील प्रयोग बंद करून तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नाट्यप्रेमींची होती. तरीही तेथेच कार्यक्रम घेत असल्याचे समजल्यानंतर सारंग टाकळकर, राजू परदेशी, संदीप सोनार, शीतल रुद्रवार यांनी हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला. मनपाचाच कार्यक्रम उधळला जाणे हे महापौर घोडेले यांना अयोग्य वाटत होते. त्यांनी या चौघांशी चर्चा केली. ५० लाखांची निविदा मंजूर असल्याचे सांगितले. मात्र त्यातून फक्त शौचालयाचे काम रंगरंगोटी होणार असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. पालकमंत्री कदम यांनी जाहीर केलेला निधी कसा वापरता येईल, यावर चर्चा केली. दुरुस्तीसाठी निधी मिळत नाही, परंतु नव्या कामासाठी मिळतो. तेव्हा जे काम आपण करतोय ते नवीनच आहे, असे कागदोपत्री दाखवा, अशी सूचना केली. 


...अन् तातडीने केला प्रस्ताव तयार 
मनपाच्याअभियंत्यांनी तातडीने पालकमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला. घोडेले पालकमंत्री कदम यांच्याशी बोलले. त्यांनी निधी मंजुरीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी प्रभारी आयुक्त आहेत. त्यांनी दोन्हीकडील स्वाक्षऱ्या केल्या अन् प्रस्ताव मंजूर झाला. दोन कोटी रुपयांत हे रंगमंदिर नवे करण्याचे ठरले. 


कलाकारांशी चर्चा करणार 
नाट्यगृहातनेमकी कोणती कामे करायची हे महापालिकेचे अधिकारी ठरवणार नाहीत. कलाकारांना तेथे नेमके काय हवे, यासाठी कलाकारांशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या सूचना आल्यानंतरच निविदा जारी केल्या जाणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...