आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जलसंधारण’ला 200 कर्मचाऱ्यांची गरज, 6 महिन्यांत 5 जणांचीच नियुक्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबादेत राज्याच्या जलसंधारण आयुक्तालयाची स्थापना होऊन सहा महिने झाले. यासाठी किमान दोनशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे नियोजन होते. मात्र, आतापर्यंत फक्त पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. १५ जुलैपर्यंत कर्मचारी रुजू झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी औरंगाबादमध्ये दिला होता. यास पाच महिने लोटले असून, त्यांचे आश्वासन हवेतच विरले आहे. प्रभारी आयुक्त आणि केवळ पाच कर्मचारी असल्याने वाल्मीतील जलसंधारण आयुक्तालय नावालाच उरले आहे. 


मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात जलसंधारण आयुक्तालय औरंगाबादला स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. प्रारंभी वाल्मीला जलसंपदामधून जलसंधारणमध्ये नेण्यास विरोध असताना वाल्मीला जलसंधारण खात्यात वर्ग करण्यात आले. त्यानंतर जलसंधारण आयुक्तालयाची घोषणा करण्यात आली. मात्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्याने पूर्ण क्षमतेने काम सुरू झालेले नाही.


आयुक्तालय नावालाच
कर्मचारी नसल्याने आयुक्तालय नावालाच आहे. कृषी कर्मचाऱ्यांच्या विरोध का आहे, हे तपासावे.
- शंकररावनागरे, जलतज्ज्ञ


पदोन्नती रखडण्याची भीती
जलसंधारणआयुक्तालयात कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. मात्र येथे आल्यास पदोन्नती थांबेल, या भीतीने ते येण्यास उत्सुक नाहीत. 


कृषी तसेच इतर विभागांचे कर्मचारी जलसंधारण आयुक्तालयात रुजू होण्यास तयार नसल्यामुळे पदे रिक्तच आहेत. मंत्र्यांनी घोषणा करून तब्बल पाच महिने झाल्यानंतरही रिक्त पदे भरलेली नाहीत. तांत्रिक पॅनल, वित्त शाखा, दक्षता गुणवत्ता नियंत्रण शाखा, माहिती तंत्रज्ञान समन्वय शाखा, भूजल सर्वेक्षण, सांख्यिकी सेवा कक्ष, संकल्पचित्र सर्वेक्षणासाठी १८५ पदे तर फेररचनेनंतर मंत्रालयीन स्तरावर कामासाठी ३५ अशी २२० पदे नव्याने निर्माण करण्यात येणार आहेत. 


कृषीसह इतर विभागांतील कर्मचारी रुजू होईनात 
जलसंधारण आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर जूनमध्ये एच.के. गोसावी यांनी प्रभारी आयुक्तपदाचा पदभार घेतला. गेल्या सहा महिन्यांपासून पाण्याची दरसूची तयार करणे, पाणलोट क्षेत्र आणि विहिरीच्या माध्यमातून सिंचन व्यवस्थापनाचा अहवाल तयार करण्याचे काम गोसावी यांच्याकडे आहे. याशिवाय सचिवांसोबत नागपूर, अमरावती येथे झालेल्या प्रादेशिक बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम ते करत आहेत. मात्र अधिकारी नसल्यामुळे कामांना मर्यादा येत आहेत. 


जलसंधारण आयुक्तपदी अद्याप कोणाचीही नियुक्ती झाली नाही. वाल्मीचे महासंचालक एच.के. गोसावी प्रभारी आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. शासनाने अजूनही जलसंधारण आयुक्तालयासाठी स्वतंत्र आयुक्तांची नेमणूक केली नाही. सध्या दोन लेखाधिकारी, दोन शाखा अभियंता आणि एक कार्यकारी अभियंता असे पाच अधिकारी जलसंधारण आयुक्तालयासाठी देण्यात आले आहेत. आयुक्तालयासाठी दोनशे कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र सहा महिने होऊनही कर्मचाऱ्यांची भरती झाली नाही. 

बातम्या आणखी आहेत...