आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन दिवसांआड पाण्याचे नियोजन कोलमडले, अनेक भागांत पाच ते सहा दिवसांआड पाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरातील सर्व भागाला समान पाणी देण्यासाठी ११ मेपासून तीन दिवसांआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र बदललेल्या वेळापत्रकामुळे नागरिकांची सोय होण्याऐवजी गैरसोय वाढली आहे. ज्या भागाला दोन दिवसांआड पाणी येत होते, त्यांना तीन तर ज्यांना सहा-सात दिवसाआड पाणी येते होते, ते अद्यापही याच अंतराने येत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होण्याऐवजी विस्कळीत झाल्याचे चित्र शहरातील प्रत्येक भागात दिसत आहे. पाणी देण्याच्या दोन फेऱ्यांनंतर पुरवठा सुरळीत होईल, असे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. तर नियोजन केल्यास दोन दिवसांआड पाणी देणे शक्य आहे, यावर महापौर नंदकुमार घोडेले ठाम आहेत. 


गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील पाण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. सध्याच्या वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा केल्यास शहराला समान व चांगल्या दाबाने पाणी मिळेल, असा दावा करण्यात आला होता. मात्र सध्याचे चित्र याउलट असल्याचे दिसून येत आहे. ज्यांना वेळेत पाणी येत होते, त्यांनाही आता एक दिवस विलंबाने पाणी मिळत आहे. ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने मनपा प्रशासनाला २३ मे रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. 


यापूर्वीही बदलले होते वेळापत्रक

महापौर घोडेले यांनी एप्रिल महिन्यात पाणीपुरवठा विभागाची बैठक घेऊन पाण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले होते. पाणीपुरवठा विभागाने दोन वेळा दोन दिवसांआड तर तिसऱ्या वेळी तीन दिवसांआड पाणी देण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार आठ दिवस पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र पाच मे रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले. सहा मेपासून पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा सुरू झाला. यामुळे अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, सर्वाधिक परिणाम सिडको-हडको भागावर झाला आहे. 


दोनदा बदलली वेळ 
पाच व सहा मे रोजी पाण्याचे वेळापत्रक बदलण्यात आले. त्यानंतर सात मे रोजी भाजपच्या नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात झोपा काढा आंदोलन करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. नऊ मे रोजी पुन्हा नव्या वेळापत्रकाला मंजुरी देऊन ११ मेपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली. 


दोन दिवसांआड पाणी मिळू शकते 
शहराला २४० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. दररोज १३५ एमएलडी पाणी येते. दोन दिवसांत हे पाणी २७० एमएलडी होते. याचे दोन भाग केल्यास नागरिकांना दोन दिवसांआड पाणी मिळू शकते. मात्र पाणीपुरवठा विभागाकडून नियोजन करण्यात येत नाही. 
- नंदकुमार घोडेले, महापौर 


समान पाणी नाही 
नवीन वेळापत्रकानुसार शहरातील सर्व भागांना समान पाणी मिळेल, असा दावा प्रशासनाने केला होता. अनेक भागांत चार ते पाच तास पाणी येते. दुसरीकडे हडको-सिडकोला केवळ ४५ मिनिटे पाणी येत आहे. तसेच काही ठिकाणी तीन तर काही ठिकाणी सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. 

बातम्या आणखी आहेत...