आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'भूमिगत' यशस्वी झाल्यास बोअर, विहिरींवर संक्रांत; पाणीटंचाईचा धोका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहराच्या बहुचर्चित भूमिगत गटार योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. आता फक्त सांडपाणी वाहिन्या मुख्य वाहिन्यांना जोडून ते पाणी प्रक्रियेसाठी प्रकल्पात नेण्याचे तेवढे शिल्लक राहिले आहे. तसे झाल्यास शहरातील नाले स्वच्छ होतील. शहरासाठी हे चांगले असले तरी कोणी विश्वास ठेवणार नाही, परंतु त्यामुळे शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवणार आहे. तसेच चिकलठाणा, झाल्टा, इकडे वाळूज, पंढरपूर येथील भाजीपाला उत्पन्नावर परिणाम होणार आहे. शहरातील टँकर लॉबी ही सर्वस्वी नाल्यांतील पाण्यावर अवलंबून आहे. तर तिकडे नजीकचे शेतकरीही याच पाण्यावर भाजीपाला घेतात. त्यामुळे भूमिगतचे यशस्वी होणे या मंडळींच्या मुळावर येण्याचे संकेत आहेत. अर्थात समांतर जलवाहिनीचे पाणी लगेच मिळाले तर यातून औरंगाबादकरांची सुटका होऊ शकेल. 


शहराला लागणारा भाजीपाला मोठ्या प्रमाणावर चिकलठाणा, झाल्टा तसेच नजीकच्या गावांतून येतो. येथील शेतकरी सर्रासपणे नाल्यांत मोटारी टाकून त्याचे पाणी भाजीपाल्याला देतात. आता तेथे वाहिनी टाकली आहे. तरी काही शेतकरी थेट मॅनहोलमध्ये मोटारी टाकून भाजीपाला काढताहेत. ते जर बंद झाले तर येथे उन्हाळ्यात भाजीपाला पिकूच शकणार नाही. भाजीपाला उत्पादक अशी या गावांची ओळखही संपुष्टात येईल. अर्थात जे शेतकरी शुद्ध झालेले पाणी प्रकल्पातून नेतील ते तगू शकतील. 


सातारा-देवळाईतही तेच
शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या सातारा व देवळाईतील सांडपाणी नाल्यांतच जाते. तेथील टँकर लॉबीही त्यामुळे खुश आहे. तेथे अजून भूमिगत योजना सुरू झालेली नाही. आता सुरू झाली तरी ती पूर्ण होण्यास पाच वर्षे लागतील. 


'समांतर' हाच पर्याय
यावर पर्याय काय, असा प्रश्न समोर येतो. तर समांतर जलवाहिनी पूर्ण होऊन नागरिकांना मुबलक पाणी मिळणे हाच त्यावर पर्याय आहे. महापालिकेने मुबलक पाणी दिले तर नागरिक टँकरची मागणी करणार नाहीत. टँकरची मागणीच कमी झाली तर नाल्यांच्या बाजूला असलेले बोअर तसेच विहिरींवरील अवलंबित्व कमी होईल. म्हणजे टँकर लॉबीचे महत्त्व कमी होईल. त्यामुळे उगाच कोणी वाहिन्या फोडण्याचे उपद्व्याप करणार नाही. 


...तर वाढतील टँकरचे भाव
अपेक्षेप्रमाणे शहरातील सर्व नाले आणि त्याबरोबर विहिरी व बोअर अाटले, पाणी उपलब्ध झाले नाही तर शुद्धीकरण प्रकल्पातून पाणी आणावे लागेल. त्यासाठी खर्च वाढेल आणि आपोआपच टँकरचे दर वाढतील. नागरिकांनी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी नाकारले तर नजीकच्या परिसरातून पाणी आणावे लागेल. अर्थात त्याचा दरही जास्तच असेल. 
 

का जाणवेल पाणीटंचाई? 
आजघडीला दररोज २५० एमएलडी पाणी नाल्यांत सोडले जाते. १३५ एमएलडी पाणी जायकवाडीतून येते तर किमान तेवढेच पाणी हे बोअरमधून उपलब्ध होते.भूमिगतमुळे हे सर्व पाणी थेट सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात जाऊन तेथे शुद्ध होईल. ते नाल्यांत जाणार नाही म्हणजेच भूजल पातळी खाली जाईल अन् आजूबाजूचे बोअर तसेच विहिरी कोरड्या पडतील. 


असे आहे शहरातील नाल्यांचे चित्र 
- ७२ शहरातील एकूण नाले 
- १८ शहरातील मोठे नाले
- नाल्यांची लांबी ५७ किलोमीटर (५६ हजार ८२६ मीटर) 
- अपवाद वगळता या सर्व नाल्यांमध्ये ड्रेनेजचे पाणी सोडले जाते. त्यामुळेच या नाल्यांना लागून असलेले बोअर तसेच विहिरींमध्ये भरउन्हाळ्यातही पाणी असते.


बोअर, विहिरी नाल्यांच्या पाण्यावर जिवंत 
शहरातील बोअर तसेच विहिरींना जे काही पाणी आहे ते या नाल्यांमुळेच. अंतर्गत वसाहतीतील बोअर तसेच विहिरी उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच कोरड्या पडतात. परंतु नाल्यांना लागून असलेल्या विहिरी व बोअर कधीच आटत नाहीत. कारण नाल्यांतील सांडपाणी पाझरून या स्रोतांमध्ये येते. जेव्हा नालेच कोरडे होतील तेव्हा आपोआपच येथेही टंचाई जाणवेल. 


उद्यानालाही फटका बसेल 
सिद्धार्थ उद्यानाच्या बाजूला असलेल्या नाल्याजवळील विहिरीतून उद्यान तसेच प्राणिसंग्रहालयासाठी पाणी घेतले जाते. परंतु नाला आटला म्हणजे विहीर आटेल आणि आपोआप येथेही पाणीटंचाई जाणवेल, असे निवृत्त उद्यान अधीक्षक जनार्दन भडके यांनी स्पष्ट केले. 


टँकर लॉबी काय करेल? 
जर खरेच नाले कोरडे झाले, भूगर्भातील पाणीपातळी खालावली तर ही टँकर लॉबी काय करेल, असा प्रश्न आहे. त्यांना दूरवरून पाणी आणावे लागेल. आर्थिकदृष्ट्या ते परवडणारे नसेल. त्यामुळे नाल्यांतील मलनिस्सारण वाहिन्या फोडण्याचे प्रकार होतील. 

बातम्या आणखी आहेत...