आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार महिन्यांत 13 अल्पवयीन मुली बेपत्ता; 10 परतल्या, तिघींचा शोध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- नैराश्य, प्रेमप्रकरण, कुटुंबाकडून होणारे दुर्लक्ष यामुळे अल्पवयीन मुली घरातून निघून जाण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसते. विशेष म्हणजे शाळा, कॉलेजला सुट्या लागल्यानंतर बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने पालकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाळूज एमआयडीसी ठाण्यात दाखल घटनांच्या आकडेवारीवरून या वर्षी पहिल्या चार महिन्यांतच १३ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. यापैकी १० परतल्या, तर तिघींचा शोध सुरू आहे. 


मागील वर्षी वाळूज औद्योगिक परिसरातून २७ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यातील २६ मुली घरी परतल्या, तर एका मुलीचा शोध सुरू आहे. यंदा जानेवारी २०१८ ते एप्रिल २०१८ या अवघ्या चार महिन्यांमध्ये तब्बल १३ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. यातील १० मुली घरी परतल्या, तर ३ मुलींचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. 'ऑपरेशन मुस्कान' किंवा अन्य उपक्रमांद्वारे अपहरण झालेल्या बालकांचा शोध सुरू असतो. शारीरिक अत्याचारास मुली बळी पडतात. काहींनी 'सैराट'सारखा चित्रपट पाहून स्वखुशीने हा मार्ग पत्करला असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. उल्लेखनीय असे की, सर्वाधिक मुली या कामगारांच्या कुटुंबातील तसेच १२ ते १८ वर्षे वयोगटातील आहेत. प्रतिष्ठेपायी काही पालक मुलगी हरवल्याची तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. अशी वेळच येऊ नये यासाठी समुपदेशनाची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. 


२४ दिवसांत ७ मुली बेपत्ता 
चालू वर्षात अवघ्या चार महिन्यांमध्ये १३ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या अाहेत. त्यातच उन्हाळी सुट्या लागताच एप्रिल महिन्यात तब्बल ७ मुली बेपत्ता झाल्या असून यापैकी ४ मुलींच्या पालकांनी पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद केली असून उर्वरित तीन मुलींचे पालक मुलींच्या शोधार्थ रात्रीचा दिवस करत आहेत. सामाजिक भीतीपोटी पालक पोलिसांत तक्रार देत नाहीत. तसेच मुलीचे खरोखर कोणी अपहरण केले की काय झाले, याबाबत पोलिसांना खरे सांगत नाहीत. त्यामुळे पोलिसांना तपास करण्यात मोठ्या अडचणी निर्माण होऊन मुलींचा शोध लावण्यास विलंब होतो. 


मोबाइल फोनचा दुरुपयोग 
अनेक कुटुंबांत वडिलांसह आईसुद्धा कामावर जात असल्याने किशोरवयात पदार्पण केलेल्या मुलींच्या भावभावना लक्षात घेऊन त्यांच्याशी संवाद साधायला किंवा मन मोकळे करायला जवळचे कोणी नसते. सुरक्षितता म्हणून दिलेला मोबाइल फोन हाच प्रामुख्याने त्यांंच्या असुरक्षिततेचे कारण ठरताना दिसत असल्याचे समोर आल्याचे फौजदार आरती जाधव यांनी सांगितले आहे. 


मुलीकडे मैत्रीण म्हणून बघा 
पालकांनी मुलीकडे नेहमीच संशयाच्या दृष्टिकोनातून न पाहता मैत्रीण म्हणून बघावे. तिला मोबाइल वापरण्यास प्रतिबंध करण्यापेक्षा मोबाइलचा सदुपयोग करण्यास शिकवावे. मुलींच्या मैत्रिणी-मित्र, शिक्षक यांच्याशी पालकांचा नेहमीच संवाद असावा. 
-नूतन अडसरे, शांतता कमिटी सदस्य 


समुपदेशनाची खरी गरज 
वाढत्या वयासोबत किशोरवयीन मुला-मुलींसाठी खासगी शिकवणी, शाळा, कॉलेज, वसाहत येथे खास समुपदेशनाची गरज आहे. या वयात मुलींना खऱ्या अर्थाने पालक, शिक्षक, नातेवाईक, मित्र-मैत्रिणींनी समजून घेत योग्य मार्गदर्शन करण्याची गरज असते. मात्र, बदलती जीवनशैली व धावपळीच्या आयुष्यामुळे मुलांकडे लक्ष द्यायला पाल्यांना वेळ नाही. यामुळे असे प्रकार घडतात. 


समुपदेशनावर भर देणार 
मोजक्याच शाळा-महाविद्यालयांत मुलींसाठी समुपदेशन कक्ष सुरू आहेत. यापुढे इतर शाळा, खासगी शिकवणी, धार्मिक स्थळे येथेही समुपदेशन कक्ष स्थापन करण्यासाठी संबंधितांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. 
-ज्ञानेश्वर साबळे, पोलिस निरीक्षक 

बातम्या आणखी आहेत...