आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीसीपी श्रीरामे व पीडित तरुणीत १३५० मेसेजेस! दोघांमध्ये झाले तब्बल ५५० वेळा चॅटिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आैरंगाबाद- बावीसवर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झालेले पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे आणि पीडित तरुणीत १३५० वेळा व्हॉट्सअॅप मेसेजची देवाणघेवाण झाली आणि ५५० वेळा चॅटिंगही झाल्याची बाब श्रीरामे यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीदरम्यान मंगळवारी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. भीष्मा यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला असून आता अटकपूर्व जामिनावर निकाल अपेक्षित आहे. 


पीडित तरुणीने व्हॉट्सअॅपवर श्रीरामेविरोधात पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून पोलिस आयुक्तांच्या आदेशान्वये एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात अटक होऊ नये म्हणून श्रीरामे यांनी ७ जुलै रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. भीष्मा यांच्यासमोर सुनावणी झाली असता मुख्य सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी अटकपूर्व जामिनाला विरोध केला. पीडितेच्या तक्रारीनंतर तिला २२ जून रोजी पोलिस आयुक्तालयातील महिला तक्रार निवारण केंद्रात बोलावले होते. सुरक्षा समितीच्या सदस्या, विधी अधिकारी, महिला तक्रार निवारण केंद्राच्या पोलिस निरीक्षक, बाल न्याय मंडळाच्या सदस्या, सहायक पोलिस आयुक्त यांच्यासमोर पीडितेने व्हॉट्सअॅपची तक्रार स्वत: दिली असल्याचे मान्य करत त्यावर असलेली सही आपलीच असल्याचे पीडितेने या सदस्यांसमोर सांगून त्यावर सही केली. त्यानंतर सर्व सदस्यांनी 'बीफोर मी' नोंदवत सह्या केल्या. हे सर्व झाल्यानंतरच २७ जून रोजी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात श्रीरामेविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असल्याचे अॅड. देशपांडे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. 

 

माझा मोबाइल तपासणीसाठी देण्यास तयार आहे. माझ्या घराची झडती घ्यावी. मी वैद्यकीय तपासणीसही तयार आहे. पोलिस दलात उच्चपदस्थ अधिकारी असल्यामुळे मला चालक, दोन गार्ड कायम सोबत असताना लपून छपून असे कृत्य करणे अशक्य आहे. तपासासाठी अटकेची गरज नाही. पोलिसांना तपासात सर्व सहकार्य करण्यास तयार असल्यामुळे अटकपूर्व जामीन देण्यात यावा, अशी विनंती श्रीरामे यांनी अॅड. गोपाल देशपांडे यांच्यामार्फत केली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून या अटकपूर्व जामिनावर निर्णय अपेक्षित आहे. 


श्रीरामेंच्या अटकेशिवाय तपास अशक्यच 
श्रीरामेंनी पीडितेला आणि पीडितेने श्रीरामे यांना असे दोघांनी एकमेकांना १ हजार ३५० व्हॉट्सअॅप संदेश पाठवले, तर ५५० वेळा चॅटिंगही केले. श्रीरामेंना अटक केल्याशिवाय तपास करणे शक्य नसल्यामुळे जामीन देण्यात येऊ नये, अशी विनंती मुख्य सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी न्यायालयास केली. 

बातम्या आणखी आहेत...