आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हेरॉकला जागतिक बाजारपेठेत १४ % तर भारतीय बाजारात १८ टक्के नफा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबाद येथील अकरा हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्हेरॉकने यंदा जागतिक बाजारपेठेत १४ टक्के तर भारतीय बाजारात १८ टक्के नफा कमावला असून लवकरच ई व्हेइकलच्या उत्पादनात कंपनी उतरणार आहे. कंपनीने प्रथमच शेअर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केले असून ते २६ जून रोजी खुले करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक तरंग जैन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. 


जैन यांनी १९८४ ते २०१८ या ३४ वर्षांच्या कालावधीतील कंपनीचा प्रवास उलगडला. ते म्हणाले की, १९८४ साली बजाज कंपनीचे व्हेंडर म्हणून दुचाकी व तीन चाकी वाहनांसाठी लागणारे प्लास्टिकच्या भागांचे उत्पादन सुरु केले. तेव्हा १ कोटी ४० लाखांची उलाढाल पहिल्या वर्षात झाली. त्यानंतर कंपनीने वेगाने विस्तार केला. २०१८ मध्ये कंपनीची उलाढाल ११ हजार कोटी रुपयांची आहे. संपूर्ण जगातील दुचाकी, तीन चाकी व चारचाकी कंपन्यांसाठी व्यवसाय केला. आमच्या लायटिंग डिव्हीजनचा या नफ्यात ६० टक्के वाटा आहे. 


ई व्हेइकलचे उत्पादन करण्यासाठी सज्ज
सध्या ई व्हेइकलचे युग आहे. प्रदूषण मुक्तीसाठी अशा गाड्यांचे उत्पादन करावे लागणार आहे. त्यासाठी कंपनी सज्ज आहे. ई कार सध्या महाग आहेत. त्या स्वस्त कशा करता येतील यावरही संशोधन सुरु आहे. 


प्रगतीचे श्रेय १४ हजार कर्मचाऱ्यांना
तुम्ही औरंगाबाद शहरातील पहिले अब्जाधीश झाल्याची बातमी आली तेव्हा कसे वाटले? या प्रश्नावर ते म्हणाले, हा प्रवास करताना मला अभिमान वाटला. आमच्या जगभरातील १४ हजार २०० कर्मचाऱ्यांमुळेच हा टप्पा गाठता आला. 


जानेवारीत तीन देशांत नवे प्रकल्प
जैन म्हणाले की, जानेवारी २०१९ मध्ये आम्ही मोरक्को, तुर्की, ब्राझील या देशांत नवे कारखाने सुरु करत आहोत. यात प्रामुख्याने चारचाकी वाहनांचे सुटे भाग तयार होतील. भारतात आम्ही दुचाकी, तीन चाकी आणि चारचाकी वाहनांचे भाग तयार करतो. विदेशात याच उत्पादनासह लायटिंग आणि चारचाकी वाहनांचे इलेक्ट्रॉनिक भाग तयार करतो. लायटिंग डिव्हिजनमधून ६० टक्के नफा मिळतो. भविष्यात लोकांमध्ये गुंतवणूक करणार : जैन म्हणाले, आई-वडील आणि कर्मचाऱ्यांचे आशीर्वाद हेच आमचे धन आहे. त्या जोरावर इथपर्यंत आलो. आता पुढे संशोधन विकास, उत्पादनातील अचूकता यासह लोकांमध्ये गुंतवणूक हे आमचे ध्येय असेल. 


जीएसटी, नोटबंदीचा निर्णय चांगला
नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे तुमच्या उद्योगाला काही झळ पोहोचली का? या प्रश्नावर जैन म्हणाले, हा निर्णय अत्यंत चांगला आहे. सूक्ष्म उद्योगांना सुरुवातील फटका बसला. या वर्षाची पहिली तिमाही फायद्यात आहे. सर्वच ऑटो कंपन्या नफ्यात आहेत. हा निर्णय घेण्याचे धाडस सरकारने दाखवले आणि ते अमलातही आणले, असेही जैन म्हणाले. 

 

कंपनीचे शेअर २६ जून रोजी खुले होणार 
व्हेरॉक कंपनीने प्रथम शेअर खरेदीसाठी खुले केले आहेत. २६ जूनपासून ते खुले होतील. २ कोटी शेअर्स विक्रीला काढले आहेत. ९६५ ते ९६७ रुपयांना एक या प्रमाणे भाव राहील. ते सामान्य माणसाला विकत घेता येतील. २८ जूनला त्याची विक्री बंद होईल. एक ग्राहक किमान पंधरा शेअर खरेदी करु शकतो. कंपनीने १५ टक्के तर प्रमोटर्सने ८५ टक्के शेअर विक्रीला काढले आहेत. कर्मचाऱ्यांसाठी १ लाख शेअर विक्रीसाठी आहेत. कोटक, सिटी बँक, क्रेडिट स्विस, आयआयएफएल या बँकेतून याची खरेदी करता येईल, असे जैन म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...