आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईवडिलांना एकुलत्या एक असलेल्या 2 मित्रांचा मृत्यू, मिटमिट्याजवळ दुचाकीला अपघात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/दौलताबाद - मित्राचा पगार झाला म्हणून तीन तरुण जिवलग मित्र मंगळवारी (६ फेब्रुवारी) दौलताबादजवळील एका ढाब्यावर जेवणासाठी गेले. तेथून रात्री एकच्या सुमारास दुचाकीवरून (एमएच २० डीजी २४५९) ट्रिपल सीट परतताना ट्रकला ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या ट्रकला धडकले. त्यात शुभम सुरेश राऊत (२१, रा. नंदनवन कॉलनी, श्रीकांत शिवाजी हिवाळे (२३, पडेगाव) यांचा मृत्यू झाला, तर आकाश रमेश सोनवणे (२६, माजी सैनिक कॉलनी, पडेगाव) गंभीर जखमी झाला. हे तिघेही आपापल्या कुटुंबात एकुलते एक आहेत. अपघातास कारणीभूत ठरलेला अज्ञात ट्रकचालक ट्रकसह फरार झाला आहे.

 

छावणी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख, मृतांच्या नातेवाइकांनी सांगितले की, सिमकार्ड विक्रीचे काम करणाऱ्या श्रीकांतचा मंगळवारी पगार झाला. म्हणून तो शरणापूर येथील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या आकाश तसेच शुभमला दौलताबाद रोडवरील शेळके मामा ढाब्यावर जेवणासाठी घेऊन गेला. शुभमच्या दुचाकीवरून घरी जात असताना मिटमिटा येथील मदरशासमोर अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. शुभमने हेल्मेट घातलेले नव्हते.


दूरवर फेकले गेले...
धडकेत तिघे एकमेकांपासून दूरवर फेकले गेले. डोक्यास गंभीर जखम होऊन अति रक्तस्रावाने शुभम, श्रीकांत जागीच ठार झाले. छावणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तिघांनाही घाटी रुग्णालयात हलवले. तेव्हा दोघे मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिस उपनिरीक्षक अतुलकुमार ठोकळ पुढील तपास करीत आहेत.


ट्रकला अाेव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात घडली दुर्घटना
प्राथमिक तपासानुसार ओव्हरटेक करताना अपघात झाला असावा. घटनास्थळावर ट्रकसदृश वाहनाच्या जोरात ब्रेक लागल्याच्या खुणा, औरंगाबादच्या विरुद्ध दिशेला शुभम, श्रीकांत तर आकाश रस्त्याच्या मध्यभागी पडला.


शुभम होता छायाचित्रकार
सनी फोटोग्राफर अशा टोपणनावाने परिचित असलेला शुभम विवाह सोहळे, मॉडेलिंगची फोटोग्राफी करत होता. दोन दिवसापूर्वीच तो नाशिक येथे मित्राच्या लग्नाची ऑर्डर पूर्ण करून परतला होता. त्याचे वडील कपडे शिलाईचे काम करतात. त्याला तीन बहिणी आहेत.

 

आकाश आज नवी नोकरी सुरू करणार होता
आकाश कॉलेजात शिकत असताना शरणापूर येथील पेट्रोल पंपावर काम करत होता. रात्री काम संपण्यास उशीर होत असल्याने आई नाराजी व्यक्त करत असल्याने त्याने नवी नोकरी शोधली होती. बुधवारी तो नव्या कामावर रुजू होणार होता. मृत्यूशी झुंज देऊन तो नवी नोकरी नक्की सुरू करेल, अशी आशा त्याच्या कुटुंब, मित्रांनी व्यक्त केली.

 

सहा महिन्यांत आठ मृत्यू
गेल्या सहा महिन्यांत या रस्त्यावर आठ, तर दोन वर्षांत ५२ जणांचा मृत्यू झाला. १३ डिसेंबर रोजी एक तरुण पत्नीला परीक्षेसाठी घेऊन निघालेल्या विनोद सदाशिव मानकापेला मरणाने गाठले होते. तत्पूर्वी लष्कराच्या ट्रकशी धडक होऊन कारचालक मरण पावला होता. खुलताबाद उरुसाच्या काळातही दोघे मरण पावले.

 

श्रीकांतवर होते कुटुंब अवलंबून : काही वर्षांपूर्वी श्रीकांतच्या वडिलांचे निधन झाले. एका बहिणीचा आकस्मिक मृत्यू झाला होता. तो आई आणि बहिणीसह राहत होता. त्याच्या नाेकरीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरच कुटुंब अवलंबून होते.


प्रत्यक्षदर्शीने काय सांगितले
ट्रकला धडक लागून पडल्यावर शुभम जागचा हललाही नाही, मात्र श्रीकांतला किंचित शुद्ध होती. तो उभा राहण्यासाठी धडपड करत होता. तेवढ्यात एका पिकअप व्हॅन त्याच्या पायावरून गेली आणि तो पुन्हा उठलाच नाही.


दुभाजक आवश्यक, ढाब्यांच्या वेळांवरही हवी बंधने
या महामार्गावर मुंबई, नाशिक, धुळे, चाळीसगाव तसेच वेरूळ आणि खुलताबादकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. रस्त्याच्या दुतर्फा ढाबे रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. त्यातच दुभाजक नसल्याने मोठ्या वाहनांच्या हेडलाइटचा प्रकाश एकदम डोळ्यांवर येऊन चालकाचा ताबा सुटतो. रस्ता चौपदरीकरण, दुभाजक लावणे आणि ढाब्यांच्या वेळेवर बंधन हवे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...

बातम्या आणखी आहेत...