आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनशैलीमुळे आलेल्या आजारांवर उपायही जीवनशैलीतच, औषधांत नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दररोजच्या जीवनातील ताणतणाव, चुकीच्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. मधुमेहाचे रुग्ण तर प्रत्येक कुटुंबात आढळत आहेत. हा आजार एकदा जडला की दररोज औषध, आहारात बदल याशिवाय अनेक गोष्टींची बंधने येतात. डॉक्टरांच्या सल्ल्यावर होणारा खर्च वेगळाच. जगापुढे मधुमेहाचे आव्हान असताना औरंगाबादेतील एका डॉक्टरने मधुमेह पूर्णत: घालवण्याचा विडा उचलला आहे. सोशल मीडियाचा वापर करून त्यांनी मागील दोन वर्षांत ३२ देशांतील ३२ हजार रुग्णांना मधुमेहापासून दिलासा मिळवून दिला आहे. 


जगभरात मधुमेहाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे संपूर्ण जीवनशैलीत अनेक बंधने येतात. मात्र, डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी विकसित केलेली उपचाराची पद्धत वजन कमी करण्याबरोबरच मधुमेहदेखील बरा करत आहे. याविषयी डॉ. दीक्षित म्हणाले, डॉ. श्रीकांत जिचकार यांच्याकडून मला ही उपचार पद्धती मोफत मिळाली. त्यामुळे मी ती समाजापर्यंत मोफत पोहोचवत आहे. वजनवाढ आणि त्यानंतर येणारा मधुमेह हे जीवनशैलीतून येणारे आजार आहेत. त्याचे उपचारही जीवनशैलीतच आहेत. याचा अर्थ मधुमेहींनी औषध सोडून द्यावे असा मुळीच नाही. औषधांसोबत जीवनशैलीत बदल केल्यास मधुमेह पूर्णत: बरा होऊ शकतो. दोन वर्षांत ३२ हजार लोकांचे वजन यामुळे लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. अनेकांचा मधुमेह बरा झाला. काहींना अनियंत्रित मधुमेह होता, तो नियंत्रणात आला. विशेष म्हणजे हा उपक्रम व्हॉट्सअॅप, फेसबुक, व्याख्याने, यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवला जात आहे. 


२०१२ मध्ये डॉ. दीक्षित यांचे वजन ८ किलोंनी वाढले होते. अनेक प्रयत्न केले. मात्र, वजन कमी होत नव्हते. अशातच एका मित्राने डॉ. जिचकार यांच्या संशोधनाबद्दल सांगितले. डॉ. दीक्षितांनी तत्काळ यूट्यूबवर त्याचा शोध घेतला. त्यांनी सांगितलेली जीवनशैली अंगीकारली आणि तीन महिन्यांत वजन कमी झाले. त्यांनी स्वत:चा अनुभव अनेकांना सांगितला अन् त्यांच्या जीवनातही बदल दिसू लागला. २०१३ मध्ये 'विनायास वेटलॉस' नावाचे पुस्तक हिंदी, मराठी आणि इंग्रजीत लिहिले. पुस्तक वाचूनही अनेकांना लाभ झाला. १० एप्रिल २०१६ मध्ये औरंगाबादेत संत एकनाथ नाट्यमंदिरात एक व्याख्यान झाले होते. त्याचा अनेकांनी लाभ घेतला. त्यानंतर व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून या जीवनशैलीचा प्रचार-प्रसार सुरू झाला. असे ६० लोक माझ्यासोबत जोडले गेले असून ते या कामात मदत करतात. 


डिसेंबर २०१५ पर्यंत ५ हजार लोक व्हॉट्सअॅपवर जोडले 
आम्ही ग्रुप जॉइन करण्यापूर्वी काही चाचण्या करून घेण्यास सांगतो. त्यात ३० टक्के लोकांना मधुमेह निघतो. मग मधुमेही, प्री मधुमेही आणि वजन अशा तीन पद्धतींचे मार्गदर्शन ग्रुपद्वारे केले जाते. १०० ग्रुप वजन कमी करण्याचे, २७ ग्रुप मधुमेहींचे, तर १५ ग्रुप प्री मधुमेहींचे आहेत. याद्वारे दररोज वेगवेगळ्या टिप्स दिल्या जातात. अनेक जण आपली सक्सेस स्टोरीसुद्धा टाकतात. मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून याविषयी दिलेली व्याख्याने यूट्यूबवर असल्याचे डॉ. दीक्षित म्हणाले. 


मधुमेह पूर्णत: बरा होऊ शकतो 
मी स्वत: मॉडर्न मेडिसीन शिकलो आहे. ज्यामध्ये हे सांगण्यात आले आहे की, मधुमेह कधीही बरा होत नाही. आयुष्यभर औषधोपचारातून तो नियंत्रण ठेवणे शक्य आहे. मात्र, या जीवनशैलीतून आजार बरा झाल्याची अनेक उदाहरणे माझ्याकडे आहेत. ज्यांना इन्सुलिन घ्यावे लागायचे ते बंद होऊन ते गोळ्यांवर आले, तर गोळ्या घेणाऱ्यांच्या गोळ्या बंद झाल्याचे, डाॅ. दीक्षित म्हणाले. 


हे पथ्य पाळा, आजार राहतील दूर 
- दिवसभरात सर्वाधिक भुकेच्या दोन वेळा निश्चित करा. ५५ मिनिटांचा हा कालावधी ठेवा. 
- या वेळी हवे ते खा. तूप, बटर, साखर असे सर्वकाही खा. 
- मधल्या वेळात शक्यतो काहीही खाऊ किंवा पिऊ नका. पाणी चालेल. 
- मात्र, ज्यांना बिलकूल सहन होत नसेल त्यांनी नारळपाणी, मिठाचे लिंबूपाणी, टोमॅटोची फोड किंवा पातळ ताक घेण्यास हरकत नाही.

बातम्या आणखी आहेत...