आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - औरंगाबाद येथील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी स्वतंत्रपणे औरंगाबाद पर्यटन आराखडा तयार करण्यात येत असून त्यासाठी ४४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय, देशी आणि राज्यातील पर्यटक अशा तीन टप्प्यांत आम्ही वर्गवारी केली असून सर्वसामान्य माणसानेही पर्यटन करावे, यासाठी पर्यटन विभाग प्रयत्न करत असल्याची ग्वाही पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
राज्याच्या पर्यटन व्यवसायवृद्धीसाठी राज्याचे एक स्वतंत्र धोरण तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. मुंबईच्या विकास आराखड्यात हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास सांगणारे एक संग्रहालय असावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली. सत्ताधारी पक्षाद्वारे विधानसभेत उपस्थित केलेल्या विशेष चर्चेच्या उत्तरादरम्यान ते बोलत होते.
ते म्हणाले, महाराष्ट्रात पर्यटन उद्योगासाठी मोठी बाजारपेठ असून गेल्या काही वर्षांत पर्यटन हे राज्यात सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र ठरले आहे. युनेस्कोने घोषित केलेल्या ३७ जागतिक वारसास्थळांपैकी ५ महाराष्ट्रात आहेत. याशिवाय राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्रपणे वारसा धोरण तयार करण्यात येत आहे.
पर्यटनाशी संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी खासगी कंपन्यांना मुद्रांक शुल्क, जीएसटी आणि वीज दरात सूट दिली जाणार असून त्यांना सवलतीच्या दरात जमीन आणि मुंबईसारख्या शहरात एफएसआय देण्याचा प्रस्ताव धोरणात समाविष्ट करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. सिंदखेड राजा या जिजाऊंच्या जन्मस्थानासाठी २५ कोटींची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
औरंगाबाद विमानतळाच्या विस्तारासाठी २०० कोटी
औरंगाबाद विमानतळाच्या विस्तारासाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत तारांकित प्रश्नावरील लेखी उत्तरामध्ये दिली. सिल्लोडचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी या संदर्भात तारांकित प्रश्न विचारला होता. विमानतळ विस्तारीकरणास नेमका किती खर्च येईल, याचा आकडा अद्याप सांगता येणार नाही. विस्तारीकरणासाठीची जमीन मोजणी केल्यानंतर खर्चाचा आकडा सांगता येईल. औरंगाबादचे जिल्हाधिकारी विस्तारीकरणासाठी भूसंपादनाची कार्यवाही करत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.