आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- अपुरे कर्मचारी असल्याने करवसुली होत नाही, असे कारण वाॅर्ड अधिकारी गतवर्षी पुढे करत होते. परंतु यंदा तीन महिन्यांपासून १४० कर्मचारी मालमत्ता करवसुलीसाठी देण्यात आले तरीही वसुलीचा टक्का वाढू शकला नाही. त्यामुळे आयुक्त दीपक मुगळीकर संतप्त झाले असून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वसुली वाढवली नाही तर थेट निलंबनाची कारवाई करू, असा इशारा त्यांनी दिला. घरी गेलेल्या कर्मचाऱ्याला तेथेच कर घेऊन पावती देता यावी, यासाठी प्रत्येक प्रभागात ५ असे ४५ हँड डिव्हाइस मशीन देण्यात येणार असल्याचे मुगळीकर यांनी स्पष्ट केले.
एलबीटी रद्द झाल्यामुळे मनपाकडे आता मालमत्ता कर हाच उत्पन्नाचा प्रमुख स्रोत उरला आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून थकीत आणि चालू मालमत्ता कर वसुलीसाठी जोर देण्यात येत आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षात थकबाकीसह विद्यमान कराच्या वसुलीचे ३९० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. परंतु आतापर्यंत फक्त २० टक्केच वसुली होऊ शकली आहे.
व्यावसायिक मालमत्तांना प्राधान्य
दरम्यान, वसुली करताना आधी व्यावसायिक मालमत्तांना प्राधान्य दिले जाणार आहे. मालमत्ता कर भरलेला नसेल अशा मालमत्तांवर थेट जप्तीची कारवाई केली जाईल. आवश्यक तेथे पोलिसांचीही मदत घेतली जाईल.
कर्मचाऱ्यांना जप्तीचे अधिकार नाहीत
१४० कर्मचारी आऊटसोर्सिंगद्वारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, त्यांना मालमत्ता सील करण्याचे अधिकार नाहीत. त्यांना मालमत्ता जप्तीचे अधिकार देण्याचा विचार असल्याचे मुगळीकर यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांना अपेक्षित असलेली यंत्रसामग्रीही दिली जाईल, मात्र तरीही वसुली वाढली नाही तर निलंबनाला सामोरे जावे लागेल, असे आयुक्तांनी सांगितले.
नव्या मशीनचा वापर
घरपोच वसुली करण्यासाठी आता हँड डिव्हाइस या अत्याधुनिक यंत्राचा वापर केला जाणार आहे. या मशीनद्वारे घरपोच वसुली करून तिथल्या तिथे पावती मालमत्ताधारकांना दिली जाईल. हे मशीन मनपाच्या सॉफ्टवेअरशी संलग्न केलेले असल्याने यात संपूर्ण माहिती असेल. एक मशीन बारा हजार रुपयांचे असून प्रत्येक प्रभागात ५ मशीन उपलब्ध करून देणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.