आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात सव्वासहा महिन्यांत ५०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या! दररोज दाेन शेतकरी गाठताहेत मृत्यूला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठवाड्यातील ५०० शेतकऱ्यांनी अवघ्या सव्वासहा महिन्यांत आत्महत्या केल्या आहेत. ८ जिल्ह्यात दररोज २.७ या प्रमाणे शेतकरी आत्महत्या करत असल्याचे विभागीय आयुक्तालय प्रशासनाने घेतलेल्या नोंदीवरून स्पष्ट होते. तसा अहवाल विभागीय उपायुक्तांनी कै वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनला पाठवला आहे. 


हवामानातील बदल, कीड व रोगांचा वाढता प्रादुर्भाव, कपाशीवरील गुलाबी बोंडअळी, शेतमालाला हमी भाव असूनही त्यापेक्षा कमी दर मिळणे अशा विविध कारणांमुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला आणि उत्पन्न कमी झाले आहे. कर्जाची परतफेड होत नाही. आज बँका, सावकार, मित्र, सोयरे उसणे पैसे देत नाहीत. कर्जमाफी होऊनही त्याचा लाभ घेण्यासाठी मोठ्या कर्जदार शेतकऱ्यांकडे पैसेच नाहीत. एकट्या मराठवाड्यात १ जानेवारी २०१८ ते १५ जुलै २०१८ या सव्वासहा महिन्यांच्या कालावधीत ५०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नोंदीतून समोर आली आहे. 


निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले. दीड लाखांपेक्षा अधिक कर्जे असलेले शेतकरी या योजनेमुळे कात्रीत सापडले. खर्च अधिक व उत्पन्न कमी परिणामी आर्थिक स्थिती आणखी खालावली. दुसरीकडे दीड लाखापर्यंतच कर्जमाफी मिळाल्याने उर्वरित कर्जाचा बोजा पेलवणे त्यांना शक्य नसल्याने नैराश्य आलेले शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारची फसवी कर्जमाफी योजनाही या आत्महत्यांना कारणीभूत असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले. 


सरासरी पद्धती बंद करावी

हवामानात बदल होत आहे. काही ठिकाणी धो धो पाऊस तर काही ठिकाणी कोरडे ठाक राहत आहे. एकाच दिवशी काही वेळेत पडलेल्या पावसाने सरसरीची नोंद होते. तेवढा पाऊस झाल्याचे सांगितले जाते. पण पावसाचा खंड, कमी पर्जन्यमान, वातावरणातील बदलामुळे झालेल्या नुकसानीची नोंदच घेतली जात नाही. नैराश्यग्रस्त शेतकरी, तरुण मुले, मुली आणि महिला शेतकरीही आत्महत्या करू लागल्या आहेत. त्यामुळे हवामान बदलामुळे होणाऱ्या नुकसानीचे वास्तव टिपून शेतकऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्याची गरज कृषी तज्ज्ञ वाचकांनी "दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केली. 

 

१३० आत्महत्या प्रकरणे मदतीसाठी ठरली अपात्र 
मराठवाड्यात एकूण ५०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद जरी घेण्यात आली असली तरी यापैकी २९४ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना एक लाख रुपये प्रमाणे ९९४ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. तर उर्वरित १३० अपात्र प्रकरण म्हणून मदत देण्यात आलेली नाही. यातील ७६ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

 
दीड लाखावर शेतकरी कर्जामुळेच वंचित 
कर्जमाफी योजनेंतर्गत मराठवाड्यातील ११ लाख २१ हजार ७७ शेतकरी कर्जमाफीचे लाभार्थी आहेत. त्यांच्यासाठी ५ हजार ९५ कोटी ३७ लाख रुपयांची तरतूद देखील सरकारने केली आहे. त्यापैकी ९ लाख ६१ हजार ३३० लाभार्थी शेतकऱ्यांना ३ ९७८ कोटी ९२ लाख रुपयांची कर्जमाफी लाभ मिळाला आहे. तर १ लाख ५९ हजार ७४७ शेतकरी आजही लाभापासून वंचित आहेत. दीड लाखांच्या वरील रकमेची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसेच नसल्याने ते लाभ घेऊ शकत नाहीत. त्यामुळे बँकांनी शिल्लक राहिलेले २९ कोटी ३० लाख ४३ हजार रुपये शासनाला परत पाठवले आहेत. 


जिल्हानिहाय शेतकरी आत्महत्यांचा
औरंगाबाद ७५ 
जालना ५५ 
परभणी ६७ 
हिंगोली ३८ 
नांदेड ४७ 
बीड ९७ 
लातूर ४७ 
उस्मानाबाद ७४ 
एकूण ५०० 

बातम्या आणखी आहेत...