आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद जिल्‍ह्यात समृद्धी महामार्गाचे 60% भूसंपादन, 8 गावांतील भूसंपादन रखडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यात समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाला गती प्राप्त झाली असून आतापर्यंत ६० टक्के भूसंपादन झाले आहे. वैजापूर तालुक्यात सर्वाधिक २७७ हेक्टर भूसंपादन झाले आहे. आता टेंडर प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात दोन आणि जालना व बदनापूरसाठी एक असे तीन टेंडर निघणार असल्याची माहिती महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपजिल्हाधिकारी एच.व्ही. अरगुंडे यांनी दिली.

 

गेल्या काही महिन्यांपासून प्रशासनाकडून सातत्याने गावागावात जाऊन पाठपुरावा करण्यात येत असल्याने समृद्धी महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती मिळाली आहे. येत्या एप्रिलपर्यंत ८० टक्के भूसंपादन पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहेे.

 

वैजापूर तालुक्यात सर्वाधिक जमीन संपादित : वैजापूर तालुक्यातील ४६६ हेक्टर जमीन संपादित करायची असून यातील २७७.१६ हेक्टरचे भूसंपादन झाले आहे. यात शासकीय जमीन १४ हेक्टर असे एकूण २९१ हेक्टर भूसंपादन झाले आहे. औरंगाबाद तालुक्यात ६२७ हेक्टरचे भूसंपादन करायचे असून २५५ हेक्टर भूसंपादन झाले अाहे. यात शासकीय जमीन ८२ हेक्टर असे मिळून ३३८ हेक्टर भूसंपादन झाले आहे. गंगापूर तालुक्यात २५३ हेक्टर जमीन संपादित करावयाची असून १७० हेक्टरचे भूसंपादन झाले आहे. शासकीय जमीन ८.६३ हेक्टर इतकी आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांची ७०३ हेक्टर तर शासकीय १०५ हेक्टर असे ८०९ हेक्टर भूसंपादन झाले आहे.

 

आठ गावात भूसंपादन झालेच नाही : शेतकऱ्यांच्या विरोधामुळे आठ गावात अजूनही भूसंपादन सुरू झालेले नाही. यात पळशी, कानापूर, कच्ची घाटी, महालपिंप्री, गावतपूर, गावंधरी तांडा, रहाटळपट्टी तांडा, जोगवाडा या गावांचा समावेश आहे.

 

दरम्यान, आम्ही तहसीलदारांसोबत दुधड व जयपूर या गावांना भेटी दिल्या. शेतकऱ्याच्या तक्रारीचे निवारण सुरू आहे. येत्या आठवड्याभरात या गावात जमीन खरेदीला सुरुवात होईल, असे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले.

 

समृद्धीचे ३ टेंडर निघणार
औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातून समृद्धीचा १५५ किमीचा मार्ग जातो. औरंगाबाद जिल्ह्यात हा मार्ग ११२ किमी असून तो ६२ गावातून जातो. औरंगाबाद तालुका ५२ किमी, गंगापूर २१ आणि वैजापूर ३९ किमीचा समावेश आहे. औरंगाबाद तालुक्याचे एक टेंडर तर गंगापूर- वैजापूरचे एक आणि जालना बदनापूरचे एक असे तीन टेंडर निघतील. तिन्ही टेंडरसाठी तीन वेगवेगळे ठेकेदार असतील.

बातम्या आणखी आहेत...