आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: 65 वर्षांच्या आजी देताहेत दहावी बोर्डाची परीक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शिक्षणाची आवड असेल तर मनुष्याला वयाच्या मर्यादा नसतात. याचा प्रत्यय गुरुवारपासून सुरू झालेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेत दिसून आला. शहरातील एका परीक्षा केंद्रावर चक्क ६५ वर्षांच्या आजी दहावीची परीक्षा देत आहेत. इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच नियमित शाळा, अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या आजींनी शिक्षणाचा कंटाळा असलेल्या मुलांसमोर आदर्श ठेवला आहे. 


आजवर सेवानिवृत्तीनंतर शिक्षण घेतले, अर्धवट शिक्षण राहिले, पण नोकरी करता करता शिक्षण घेणारे अनेक जण आपण पाहिले आहेत, परंतु घरची परिस्थिती हलाखीची असल्याने आईने कमी वयात लग्न लावून दिलेल्या जयाबाई भिकाजी पंडित यांनी शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आहे. हातात डझनभर बांगड्या, कपाळावर कुंकू आणि तरुणांना लाजवेल अशा पद्धतीने आपला नंबर शोधून वर्गात प्रवेश करणाऱ्या या आजीबाईंना पाहून अनेकांना वाटलं की, त्या नातवाला सोडवायला आल्या असतील. पण बाकावर बसताच सर्वांना त्यांचा आश्चर्याचा धक्का बसला. सोमवारी पहिला मराठी विषयाचा पेपर दिल्यानंतर जयाबाई म्हणाल्या, मला पेपर सोपा गेला. लग्न झाल्यावरही शिक्षणाची ओढ होती. तेव्हा ओळखीच्या असलेल्या शकुंतलाबाईंनी मला प्रौढ विद्यालयाची माहिती दिली. त्यानंतर मी समर्थनगर परिसरात असलेल्या या महाविद्यालयात चौथीला प्रवेश घेतला. इतर मुलांप्रमाणे मी रोज शाळेत येऊ लागले. इतक्या वर्षांचे अंतर आणि सर्वच गोष्टी शालेय विद्यार्थ्यांप्रमाणे मलाही समजावून सांगाव्या लागत होत्या, पण सर्व शिक्षकांनी मला खूप साथ दिली. मी नियमित शाळेत येते, तास करते. मला तीन मुलं आणि सुना आहेत. त्यांच्या पाठिंब्यामुळेच आज मी दहावीची परीक्षा देते आहे. माझा मुलगा मला शाळेत सोडवायला येतो. दहावीनंतरही पुढचे शिक्षण घेण्याची इच्छा असल्याचे जयाबाई पंडित यांनी सांगितले. 


वाचता येत असल्याचा आनंद 
किमान लिहिता-वाचता, सही करता येईल एवढे शिक्षण घ्यायचे, असा निश्चय करून मी शाळेत चौथीला प्रवेश घेतला होता. आज दहावीला आहे. लिहिता वाचता येते. मी रोज वर्तमानपत्र वाचते. कुटुंबातील सदस्यांना याचा खूप आनंद वाटतो. 

बातम्या आणखी आहेत...