आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्‍नडमधील चिमुकलीच्या शोषणाचा व्हिडिअो व्हायरल; 70 वर्षीय संशयित अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पाच वर्षांच्या मुलीचे शोषण करत असतानाचा व्हिडिअो बालकल्याण समितीकडे येताच बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अॅड. रेणुका घुले यांनीच पालक होऊन शोषण करणाऱ्या ७० वर्षांच्या  व्यक्तीच्या विरोधात तक्रार दिली. या तक्रारीवरून पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांनी संशयित आरोपीला अटकही केली. कन्नड तालुक्यातील करंजखेड गावात हा  प्रकार घडला असून गुलाम मोहंमद असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला १६ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.   


याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अॅड.रेणुका घुले यांच्याकडे एका सामाजिक कार्यकर्त्याने  पाच ते सहा वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण करत असलेल्या एका ७०
वर्षीय व्यक्तीचा व्हिडिअो पाठवला. त्याची गंभीर दखल घेत अॅड. घुले यांनी तत्काळ पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले. 

 

अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देताच घुले यांनी पिशोर पोलिस ठाणे गाठत मुलीचे पालक म्हणून फिर्याद दिली. त्यानुसार कलम ३६६ आणि कलम ३७७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जयराज भटकर पुढील तपास करीत आहेत.  

 

व्हिडिअोतील मुलगी सापडली नाही   
गुन्हा दाखल झाल्यानंतर गुलाम मोहंमद याला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. त्याला १६ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र व्हिडिअोत दिसणारी मुलगी अजून पोलिसांना सापडली नाही. तिचे आई-वडील कोण याची माहितीही समोर आलेली नाही. पोलिसांकडे असलेला व्हिडिअो हा एका व्यक्तीने गच्चीवरून घेतल्याचे स्पष्ट दिसते. या व्हिडिअोची सत्यता पडताळण्याकरिता तो मुंबई कलिंगा येथे  फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार आहे.   

 

संशयित शिक्षण संस्थेचा पदाधिकारी   
संशयित गुलाम मोहंमद हा  एका शिक्षण संस्थेचा पदाधिकारी असून त्याचे रेशनचे दुकानही आहे. गुलाम याच्या विरोधात षड्यंत्र आखण्यात आल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. गुलाम याच्याशी साधर्म्य असलेली व्यक्ती व्हिडिअोत दिसते आहे. मात्र तेच आहेत असे  नाही. गुलाम स्वत: पोलिस ठाण्यात व्हिडिअो व्हायरल झाल्यावर बदनामीची तक्रार घेऊन गेला होता. याबाबत  पोलिस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचेही त्यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केले.  

 

घटनाक्रम -१

सामाजिक कार्यकर्त्याने व्हिडिओ घुलेंना पाठवला

 

घटनाक्रम -२

घुलेंनी स्वत: ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली

 

घटनाक्रम -३

पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकास अटक केली

बातम्या आणखी आहेत...