आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या निर्लेपची बजाज इलेक्ट्रिकल्सकडून खरेदी; 80 काेटी रुपयांत झाला करार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/औरंगाबाद - औरंगाबादस्थित नॉनस्टिक कुकवेअर क्षेत्रातील प्रतिष्ठित कंपनी निर्लेप अॅप्लायन्सेस बजाज इलेक्ट्रिकल्सने विकत घेतली आहे. सुमारे ८० काेटी रुपयांत हा करार झाला आहे. यात निर्लेप कंपनी, ब्रँड आदींची मालकी आणि देणीही बजाजकडे आली आहेत. ५० वर्षांपूर्वी म्हणजेच १९६८ मध्ये स्थापन झालेल्या निर्लेपचा स्वयंपाकाच्या भांड्यांत नाॅनस्टिक तंत्रज्ञान अवलंबणाऱ्या पहिल्या कंपन्यांत समावेश होतो.

 

तसेच युराेपमध्ये आपली उत्पादने निर्यात करणारी ही या क्षेत्रातील पहिली कंपनी आहे. बजाज इलेक्ट्रिकल्सने मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, आम्ही निर्लेपचे पूर्ण शेअर्स  सुमारे ४२.५० कोटींत विकत घेण्याचे ठरवले आहे. यात अधिग्रहण होईपर्यंत कंपनीची कर्जे आणि देणींचाही अतिरिक्त समावेश असेल.  अधिग्रहणामुळे वेगाने विस्तारत असलेल्या १२ हजार कोटी रुपयांच्या किचनवेअर बाजारपेठेत कंपनीला आपली जागा भक्कम करता येईल.

 

 

निर्लेपचे ३० कोटींचे कर्ज बजाजकडे

 निर्लेपचे संचालक मुकुंद भोगले यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, आम्ही निर्लेपमधील पूर्ण वाटा ८० कोटींत विकण्याचे ठरवले आहे. यात करारात १०० टक्के इक्विटीसाठी ४२.५० कोटी आणि ३० कोटी रुपयांच्या कर्जाचा समावेश अाहे.


दोन टप्प्यांत होणार अधिग्रहण

 बजाजने सांगितले की, हे अधिग्रहण दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात ६० दिवसांत ८० टक्के शेअर्स हस्तांतरित करण्यात येतील. दुसऱ्या टप्प्यात क्लोजिंग डेटनंतर कॉल ऑप्शनद्वारे कोणत्याही मुदतीत उर्वरित २० टक्के शेअर्स विकत घेण्याचा हक्क असेल.

 

निर्लेपची १०० कोटी, तर बजाजची ४,७०० कोटींची उलाढाल

निर्लेप अॅप्लायन्सेस कंपनीत जवळपास ५०० कर्मचारी आहेत. २०१८ आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीची उलाढाल १०० कोटींची होती. गेल्या तिमाहीत बजाज इलेक्ट्रिकल्सचे उत्पन्न ४,७०० कोटी रुपये होते.

 

शेअर्स ४२.५० कोटींत विकले जाणार
निर्लेपचे शेअर्स ४२.५० कोटींत, तर ३० कोटींचे कर्जही बजाज घेणार आहे. या अधिग्रहणानंतर निर्लेप ही पूर्णपणे बजाज इले.च्या मालकीची उपकंपनी असेल. निर्लेपचा कारखाना, वितरण जाळे आणि बौद्धिक संपदा हक्कांवर बजाजची मालकी असेल. 

 

यामुळे भोगले कुटुंबाने घेतला निर्लेपच्या विक्रीचा निर्णय

नॉनस्टिक उत्पादन क्षेत्रात प्रचंड प्रमाणात स्पर्धा वाढली. किरकोळ उत्पादकांनी अगदी कमी लोकसंख्येच्या गावांपर्यंत त्यांची उत्पादने पोहोचवणे सुरू केले. त्यांना शह देण्यासाठी मार्केटिंग, िवतरणाचे अपेक्षित जाळे निर्लेपकडे नाही, हे वारंवार समोर येऊ लागले.

 

निर्लेपकडे ८६ वितरक आणि सुमारे १३,५०० किरकोळ विक्रेते आहेत. बजाज इलेक्ट्रिकल्सकडे सुमारे २०,००० विक्रेते आहेत. निर्लेप व बजाजची शक्ती एकत्र झाली तर बड्या उत्पादकांच्या स्पर्धेत िटकणे शक्य आहे, असाही या करारात विचार करण्यात आला आहे.

 

निर्लेपऐवजी इतर महत्त्वाच्या उद्योगांकडे लक्ष द्यावे, असा सूर भोगले कुटुंबात व्यक्त होत होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भोगले कुटुंबीयांच्या तिसऱ्या पिढीने या उद्योगात काम करण्यात फारसे स्वारस्य नाही, असे काही वर्षांपूर्वीच स्पष्ट केले होते.

 

बातम्या आणखी आहेत...