आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई विमानतळावर एजंटने दिली खाेटी तिकिटे; उमराला जाणाऱ्या ३० जणांची फसवणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मक्का-मदिना येथील उमरा यात्रेला नेतो, असे सांगून शहरातील ३० भाविकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एजंटने पैसे घेऊन पोबारा केल्यानंतर भाविक दोन दिवस मुंबई विमानतळासमोरील रस्त्यावर बसून होते. व्हिसा कंपनीच्या प्रतिनिधीने तिकीट खोटे असल्याचे सांगितल्यानंतर भाविकांनी मुंबईहून थेट एमआयडीसी सिडको पोलिस ठाणे गाठले. मात्र, तुम्ही पैसे जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जमा केले आहेत, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. जिन्सी पोलिसांनीदेखील या भाविकांना उद्या या, असे सांगून पिटाळून लावल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. 


फसवणूक झालेल्या अजहर काझी यांनी दिलेल्या माहितीनुसार किराडपुऱ्यातील हज उमरा टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीने ३० भाविकांकडून प्रत्येक ५० हजार रुपये घेतले. महिन्याभरापूर्वी सर्वांनी कंपनीचा मालक रफिक अब्दुल कय्युम खान उर्फ मौलाना (४०, रा. नारेगाव) यांना १५ लाख रुपये दिले होते. १८ जून रोजी मुंबई विमानतळावरून सर्व जण मक्का-मदिना येथे जाणार होते. १७ जूनला रात्री रफिकने भाविकांना ट्रॅव्हल्सने मुंबईला नेले. 


दोन दिवस मुंबईच्या रस्त्यावर
३० भाविकांमध्ये १० महिला, सहा लहान मुले, तर पाच ज्येष्ठ नागरिक आहेत. विमानतळावर पोहोचल्यानंतर रफिकचा भाऊ समीर तेथे आला. व्हिसासाठी अजून दोन लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर भाविकांनी ६५ हजार रुपये जमा करून दिले. ते पैसे घेऊन समीरनेही पोबारा केला. तोपर्यंत सर्व जण विमानतळावरच बसून होते. 


महिला, ज्येष्ठांना रडू कोसळले
पैशामुळे आपली यात्रा रद्द होऊ नये म्हणून या भाविकांनी पुन्हा एक लाख ३० हजार रुपये जमा केले आणि समीरचा शोध घेत विमानतळावर असलेल्या व्हिसा कंपनीच्या प्रतिनिधीकडे गेले. तेव्हा त्याने या भाविकांना तिकिटाची मागणी केली. तिकीट पाहताच तुमच्याकडे असलेले तिकीट खोटे आहे, असे त्या प्रतिनिधीने सांगितले. त्यानंतर सर्वांना आपली फसवणूक झाल्याचे कळले. महिला, ज्येष्ठ नागरिकांना अक्षरश: रडू कोसळले. 


विश्वासामुळे झाला घात
रफिक हा गेल्या अनेक वर्षांपासून शहरातून उमरा यात्रेचे आयोजन करतो. त्यावर विश्वास ठेवून भाविकांनी त्याच्याकडे पैसे दिले. त्याने पैसे भरल्याची पावतीदेखील दिली नाही. मात्र, या भाविकांनी एक डायरीत किती पैसे दिले हे नमूद करून त्यावर सह्या केल्या होत्या. बाबा कुरेशी यांनी सांगितले, माझी आई ८५ वर्षांची अाहे. जन्मापासून कधी शहराच्या बाहेर गेली नाही. फसवणूक झाल्यामुळे तिला मानसिक धक्का बसला. दोन दिवसांपासून तिच्या डोळ्याचे पाणी थांबले नाही. 


कागदपत्रे नव्हती म्हणून गुन्हा दाखल नाही
फसवणूक झालेले भाविक पोलिस ठाण्यात आले होते. मात्र, त्यांच्याकडे कागदपत्रे नसल्याने गुन्हा दाखल झाला नाही. बुधवारी सर्व कागदपत्रे घेऊन त्यांना बोलावले आहे. असे जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर म्हणाले. 

 

कष्ट करून आई-वडिलांसाठी जमवले होते पैसे 
तरुणांनी आचारी, चिंच तोडणे, वीटभट्टीवर काम करून आई-वडिलांना उमऱ्याला पाठवण्यासाठी पैसे जमवले होते. नूर आणि अलम हे दोघे आचारी काम करतात. गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी पैसे जमवले. ८५ वर्षांच्या आईला उमऱ्याला पाठवण्याचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळाले. शेख बाबू यांनी पाच वर्षांपासून भिशीत पैसे भरले होते, तर ५० वर्षांच्या निझाम पठाण यांनी चिंच फोडून पैसे जमवले. 


मक्केत ५० जण अडकले 
या कंपनीने मागच्या महिन्यात १५ दिवसांसाठी मक्का येथे पाठवलेले ५० भाविक तेथेच अडकून पडले आहेत. त्यांचे पैसे घेऊन रफिक खान फरार झाला आहे. या सर्वांचे पासपोर्ट रफिककडेच आहेत. 

बातम्या आणखी आहेत...