आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामेश्वर महाले याच्या हत्येप्रकरणी अक्रम शेख याला मरेपर्यंत जन्मठेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर- बेलापूर येथील रामेश्वर राजेंद्र महाले या युवकाच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी अक्रम अकील शेख यास मरेपर्यंत जन्मठेप व ५० हजार रूपये दंडाची शिक्षा सोमवारी सुनावण्यात आली. इतर सहा आरोपींना प्रत्येकी १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. यू. बघेले यांनी हा निकाल दिला. 


युनूस माजिद शेख, आरिफ मुनिर शेख, नयूम शकील बागवान, नोहिद निसार बागवान, शोएब ऊर्फ बिड्या राजमहंमद शेख, सलमान ऊर्फ जावेद शब्बीर बागवान अशी सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे असून सर्वांना प्रत्येकी १० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 
बेलापूर येथे जानेवारी २०१६ मध्ये संभाजी चौकात रात्री ८ वाजता रामेश्वर राजेंद्र महाले, प्रसाद दहीवाळ, अक्षय दहीवाळ, शुभम पोपळघट, शुभम दायमा हे गप्पा मारत होते. आरोपी लोखंडी गज, लाकडी दांडके घेऊन आले व त्यांनी तरूणांना शिवीगाळ करून मारहाण केली. रामेश्वर गंभीर जखमी झाला. याप्रकरणी राकेश मच्छिंद्र नागले यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. जखमी रामेश्वरला नगर येथील खासगी रूग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. 


या खटल्यात १५ साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्ष साक्षीदार असलेला फिर्यादी राकेश मच्छिंद्र नागले, प्रसाद दहीवाळ, अक्षय दहीवाळ, शुभम पोपळघट व वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र जगधने यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी पाळदे यांनी गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाच्या वतीने वकील बी. डी. पानगव्हाणे यांनी काम पाहिले. त्यांना प्रसन्ना गटणे यांनी सहकार्य केले. मूळ फिर्यादीच्या वतीने वकील एन. जी. खंडागळे व सुनील शेळके यांनी काम पाहिले. 

बातम्या आणखी आहेत...