आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरंकुश बहुसंख्याकशाही लोकशाहीला मारकच : अनन्या वाजपेयी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-'सध्याच्या राजकीय संस्कृतीचा चेहरा बहुसंख्याकांच्या हिंदू राष्ट्रवादाचा असून निरंकुश बहुसंख्याकशाही लोकशाहीला मारक असते. या स्थितीत फुले-आंबेडकर यांचे विचारच देशाला तारतील,' असे मत दिल्ली येथील इतिहासाच्या अभ्यासक अनन्या वाजपेयी यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास विभागात आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. 

 

'द चेंजिंग प्लेस ऑफ डॉ. आंबेडकर मेजॉरेटेरियन इंडिया' या विषयावर बोलताना वाजपेयी म्हणाल्या की, 'देशातील प्रमुख राजकीय विचारधारांचा उदय महाराष्ट्रात झाला. रानडे-गोखले यांची काँग्रेसी विचारधारा, सावरकर-गोळवलकर यांचा हिंदू राष्ट्रवाद आणि फुले-आंबेडकर यांचा जाती व्यवस्था मोडणारा प्रवाह प्रमुख आहेत. बहुमताने सत्तेत आलेले भाजप सरकार सरदार पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल कमालीचा कळवळा दाखवत आहे. हिंदू राष्ट्रवादात या महापुरुषांचा वापर केला जात आहे. भाजपची विचारप्रणाली भिन्न असताना केवळ सोय म्हणून त्यांनी महापुरुषांना जवळ केले. देशाची उभारणी करणाऱ्या पंडित नेहरू यांचे मात्र प्रतिमाहनन सुरू आहे. आम्हाला घटना मान्य नाही, असे सांगणाऱ्या गोळवलकर यांचे विचार शिरोधार्य मानणारा पक्ष आता आंबेडकर यांचे स्मारक उभारत आहे. प्रत्यक्षात भाजपचे काम घटनाविरोधी आहे. सार्वजनिक शिक्षण पद्धती बंद करण्याचा त्यांचा डाव आहे' असे वाजपेयी म्हणाल्या. 


या वेळी कुलगुरू बी. ए. चोपडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रबुद्ध म्हस्के यांनी वाजपेयी यांचा परिचय करून दिला. डॉ. प्रकाश शिरसट यांनी सूत्रसंचालन केले आणि डॉ. गीतांजली बोराडे यांनी आभार मानले. या वेळी डॉ. उमेश बगाडे, डॉ. उत्तम अंभोरे, प्रा. एच. एम. देसरडा, निर्मला जाधव यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...