आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांचे मानसिक संतुलन बिघडले; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शुक्रवारी मुंबईच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी विधाने केली त्यावरून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे स्पष्ट होते. आम्हीही सत्तेत होतो, विरोधकांवर आम्हीही टीका केली, परंतु अशी भाषा वापरली नाही. त्यांनी आमच्यावर टीका करावी, परंतु भाषा चांगली वापरावी. आपण मुख्यमंत्री आहोत, लोकांसमोर काय उदाहरण ठेवतोय याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे. अमर्याद सत्तेचा हा परिणाम असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी केली. 


शनिवारी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, राज्यातील प्रत्येक मतदारसंघात आमची काय स्थिती आहे, तेथील राजकीय चित्र काय आहे, याचा अहवाल तयार आहे. तो आठ दिवसांत राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठवला जाईल. त्यानंतर महिनाअखेरीस ते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आघाडीबाबत चर्चा करतील. भारिप बहुजन महासंघानेही आमच्यासोबत यावे, अशी आमची इच्छा आहे. प्रकाश आंबेडकरांची इच्छा काय हे माहिती नाही, परंतु आमची इच्छा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा अन् त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार यावर एक प्रकारे त्यांनी शिक्कामोर्तबच केले. आमच्याकडे उमेदवारांची चिंता नाही. मात्र राहुल गांधी यांनी जाहीर केल्याप्रमाणे काही ठिकाणी ठरवून नवीन चेहरे दिले जातील. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस-शिवसेना किंवा काँग्रेस-मनसे असे चित्र कधीही दिसणार नाही. आम्ही आमची विचारधारा कधीही सोडणार नाही, असे चव्हाण यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. 


कचराकोंडी हे फडणवीस यांचे अपयश

औरंगाबाद शहरात ५१ दिवसांपासून सुरू असलेली कचराकोंडी ही मुख्यमंत्री फडणवीस यांचे अपयश असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. ते म्हणाले, नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांकडेच आहे. तरीही इतक्या दिवसांत ते यातून मार्ग काढू शकले नाहीत. वैजापूर नगराध्यक्षपदाचा उमेदवार भाजपने ऐनवेळी पळवला. येथे मुख्यमंत्र्यांनी पैशाचे आमिष दाखवल्याचे ते म्हणाले. 


मेक इन इंडिया गेले कोठे? 
सरसकट प्लास्टिक बंदीचा निर्णय कसा काय घेतला जाऊ शकतो, असा सवाल चव्हाण यांनी केला. या उद्योगावर हजारो लोक अवलंबून आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचा विचार सरकारने केला नाही. मेक इन इंडियामध्ये उद्योग वाढवायचे की बंद पाडायचे हे सरकारने ठरवावे, असे ते म्हणाले. 


आधी हक्काचे पाणी द्या, नंतर उद्योगाचे बघा
वैजापूर येथे बोलताना मुख्यमंत्र्यांनी उद्योगांना पाणी देणार नसल्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी आधी मराठवाड्याला हक्काचे पाणी द्यावे, त्यानंतर त्याच्या वाटपाचे निश्चित करावे, उद्योगाला पाणी दिले नाही तर शहरे ओस पडतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. 


जेवायला बोलावले की वाद मिटतो
भाजपने सर्व अधिकार केंद्रित केले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांना अधिकार ठेवले नाहीत. तरीही शिवसेना लाचार आहे. त्यामुळे ते अधूनमधून नाराजी व्यक्त करत बाहेर पडण्याची भाषा करतात. पण भाजपच्या कोणी जेवायला बोलावले की वाद मिटवतात. शिवसेनेने कितीही बाहेर पडण्याची भाषा केली तरी ते लाचार होऊन युती करतीलच, असा दावा त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...