आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध सावकारीविरुद्ध वृत्तमालिका : 'डीबी स्टार'च्या पत्रकारावर भ्याड हल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- अवैध सावकारीविरोधात वृत्तमालिकेतून प्रकाश टाकल्यामुळे डीबी स्टारचे पत्रकार रवी रामभाऊ गाडेकर यांच्यावर शनिवारी रात्री गजानन महाराज मंदिर रोडवर हेडगेवार रुग्णालयासमोर भ्याड हल्ला करण्यात आला. पल्सर दुचाकीवरून आलेल्या गुंडांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक यशवंत देवकर यांच्या नादी का लागतोस? असे म्हणत चाकूहल्ला करत पळ काढला. याप्रकरणी जवाहरनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 


१४ जुलै रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास गाडेकर हे गजानन महाराज मंदिर रस्त्याने पायी जात असताना पाठीमागून दुचाकीवर दोघे आले. त्यातील एकाने 'तू यशवंत देवकर यांच्या नादी लागतो का?' असे म्हणत शिवीगाळ करून पाठीवर चाकूने वार केला. त्यानंतर दोघेही तेथून पसार झाले. गाडेकर यांनी डीबी स्टारमध्ये २० ते २४ जून यादरम्यान 'सावकारीचा पाश' या मथळ्याखाली चार भागांची वृत्तमालिका प्रसिद्ध केली होती. जिल्हा निबंधक कार्यालयातील काही अधिकारी या अवैध सावकारांना जाणीवपूर्वक पाठीशी घालत असल्याचा खुलासा त्यात केला होता. त्यामुळे गाडेकर यांना या कार्यालयातून धमक्याचे फोन सुरू झाले होते. मात्र डीबी स्टारने निर्भीडपणे ही वृत्तमालिका सुरूच ठेवली. या हल्ल्यामागे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक यशवंत देवकर असावेत. वृत्तमालिका सुरू असताना त्यांनी गाडेकरांना धमकीचे फोन केले होते. त्या वेळी त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हाही नोंदवला आहे. त्यानंतरही वृत्तमालिका सुरूच असल्यामुळे अखेर शनिवारी गाडेकर यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांनी जखमी अवस्थेत जवाहरनगर पोलिस ठाणे गाठले. पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांनी गाडेकर यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले व पथकासह जवाहरनगर भागात गुंडांचा शोध सुरू केला. तोपर्यंत ते पळाले होते. या प्रकरणाचा तपास जवाहरनगर पोलिस ठाण्याचे हवालदार सोनवणे करीत आहेत. 


अशी होती वृत्तमालिका 
अवैध सावकारी करणारे लोक शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा भावाने कर्ज देतात आणि वसुलीसाठी गुंड पाठवतात. या तगाद्याला कंटाळून अखेर शेतकरी आत्महत्या करत असल्याचे प्रकार समोर आले होते. औरंगाबाद जिल्हा निबंधक कार्यालयात अवैध सावकारीच्या ३४१ तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी २३४ प्रकरणांत चौकशी झाली असून ३७ प्रकारांत अवैध सावकारी झाल्याचे समोर आले होते. त्यापैकी आठच सावकारांवर कारवाई झाली. इतर सावकारांना का पाठीशी घातले जाते म्हणून 'डीबी स्टार'मध्ये 'सावकारी पाश' या नावाने जूनमध्ये वृत्तमालिका प्रसिद्ध झाली होती. या प्रकरणात यशवंत देवकर चौकशी करत होते. त्यांना थेट सवाल करत त्यांचे म्हणणेही छापले होते. असे असतानासुद्धा राग मनात ठेवून त्यांनी धमकीचे फोन केले होते.  


आतापर्यंत तीन गुन्हे दाखल 
१७ जून रोजी गाडेकर पुण्यात असताना त्यांना प्रथम धमकीचा फोन आला होता. त्या वेळी गाडेकर यांनी पुण्यातील सावंगी पोलिसांत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. त्यानंतर ३ जुलै रोजी पुन्हा धमकीचा फोन आला. त्या वेळी पुंडलिकनगर पोलिसांत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. ९ जुलै रोजी याप्रकरणी अर्ज केला होता. 

बातम्या आणखी आहेत...