आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : बोगस बियाणे विक्रेत्यांवर होणार आता गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री  - गेल्या वर्षी बोंडअळी व कमी पावसाने हातातून खरीप व रब्बी हंगाम गेलेल्या शेतकऱ्यांना चांगले व दर्जेदार बियाणे मिळावे, यासाठी तालुका कृषी कार्यालय व पंचायत समितीचा कृषी विभाग जय्यत तयारी करत आहे. त्यांनी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे देत असताना जर कुणी बोगस बियाणे देण्याचा प्रयत्न केला, तर अशांवर तत्काळ गुन्हे दाखल होणार आहे.   


कृषी क्षेत्रातील प्रत्येक वर्षी होणारा सावळा गोंधळ कमी करण्यासाठी राज्य शासनाने ऑनलाइन खत व बियाणे विक्रीची पद्धत आणली. त्यासाठी कृषी कार्यालयाने सर्व बी-बियाणे धारकांना नियमावली आखून दिली आहे. २०१४ ला आलेल्या दुष्काळात पूर्णतः पिचून गेलेला शेतकरी २०१५ च्या सप्टेंबरच्या १७ व १८ तारखेला पडलेल्या संततधार पावसामुळे काहीसा उल्हासित झाला होता. परंतु त्यानंतर २०१६ मध्ये तर पावसाने हात वर केले.

 

थोड्याफार पडलेल्या पावसात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीचे पीक घेतले. मात्र सदोष बियाण्यांमुळे कापसावर मोठ्या प्रमाणात बोंडअळी रोग आला. हा विषय राज्यपातळीवर गाजला त्यामुळे राज्य शासनाने काही बियाणे कंपन्यांवर फाैजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. पण त्यानंतर काय झाले हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना आजपर्यंत कळले नाही.

 

त्याचबरोबर बोंडअळीने ज्या शेतकऱ्यांचे कापसाचे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली. पण त्यातही फुलंब्री तालुका कमनशिबी ठरला. तालुक्यातील चारही महसूल मंडळे या भरपाईतून वगळण्यात आली. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आता खरीप हंगाम काही दिवसावर येऊन ठेपला आहे. शेतकऱ्यांनी आता सर्व दुःख विसरून शेतीची मशागत करणे सुरू केले आहे.

 

या वेळी कर्जबाजारीपणामुळे पिचलेल्या शेतकऱ्यांना दर्जेदार खत व बियाणे देण्याची जबाबदारी शासनाची आहे. त्यामुळेच दोन्ही कृषी विभागाच्या माध्यमातून बियाण्यांची झाडाझडती घेण्यात येत आहे. 

बातम्या आणखी आहेत...