आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमान 20 ठिकाणी पेटवून दिले कचऱ्याचे ढिगारे, अनेक वसाहतींत दुर्गंधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरात विविध ठिकाणी साठलेला सुमारे ९ हजार टन कचरा मांडकीसह शहरातील काही भागांत रिचवण्याचे प्रयत्न फारसे यशस्वी झाले नाहीत. दरम्यान, कचरा कोंडीच्या २६ व्या दिवशी किमान २० ठिकाणी लोकांनी कचरा पेटवून दिल्याने अनेक वसाहतींत दुर्गंधी, धूर पसरला आहे. तरीही परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा महापौर नंदकुमार घोडेले यांनी केला.

 

दरम्यान, मनपाच्या लपून छपून कचरा टाकण्याच्या मोहिमेबद्दल पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. अशा मोहिमांमुळे महापालिका कायदा व सुव्यवस्था बिघडवत आहे, असेही ते म्हणाले. तर रात्री पोलिस बंदोबस्ताशिवाय कचरा नेण्यास सफाई कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. दुसरीकडे कचरा प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असून सोमवारी त्यावर सुनावणी होणार आहे.

 

महापौरांनी बुधवारी सकाळी पत्रकारांनी शहरातील कचरा परिस्थितीची पाहणी केली. तेव्हा नागरिकांनी जागोजागी कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लावलेली लावलेली होती. धुराने शहर व्यापले की काय असे वाटत होते. सेंट्रल नाका येथे कचऱ्याचे ५० ट्रक उभे आहेत. त्यातून भयंकर दुर्गंधी सुटली आहे. माशांचे थवेच्या थवे त्यावर असल्‍याचे दिसून आले.


सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी आहे. नारेगावात कचरा टाकायचा नसेल तर कोठे टाकायचा, असा सवाल न्यायालयाने केला. नारेगावकरांच्या वकिलाने शुक्रवारपर्यंत पर्याय देतो, असे सांगितल्यावर सोमवारी सुनावणी घेऊ, असे न्यायालयाने सांगितले. ऐतिहासिक शहर म्हणून देशोदेशीचे पर्यटक विमानाने दररोज औरंगाबादेत येतात. त्यांना विमानातून औरंगाबादचे असे 'ऐतिहासिक' दर्शन घडते.


बुढीलेनमध्ये महापौरांसमोर कचरा पेटवला
बुढीलेन भागात महापौर, सभापती गजानन बारवाल, सभागृह नेता विकास जैन यांच्यासमोर एकाने कचरा पेटवून दिला. त्याला कचरा का पेटवला, असे विचारले. तेव्हा त्याने मग या कचऱ्याचे काय करायचे? किती दिवस दुर्गंधी सहन करायची, असा प्रतिसवाल केला. मग मनपाच्या पथकाने आग विझवली.

 

सिडको-हडको स्वच्छ
जुन्या शहराच्या तुलनेत सिडको-हडको भाग स्वच्छ आहे. रामनगरात मनपाच्या खुल्या जागेत ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती सुरू आहे. तेथे सिडकोने लावलेली कचरा संकलनाची पद्धत सिडको वसाहती २००६ मध्ये महापालिकेत आल्यावरही कायम राहिली आहे.


बारवालांना घेरले
पदमपुरा येथे कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना दोन दिवसांपूर्वी लावलेली आग अजूनही विझली नाही. महापौर, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल तेथे पोहोचताच परिसरातील महिला तेथे आल्या. त्यांनी बारवाल यांना घेराव घालत, तुम्ही काहीच करत नसल्याचा आरोप केला.

 

विरोधामुळे सफाई कर्मचारीही धास्तावले आहेत. रात्रीच्या वेळी आम्ही पोलिस बंदोबस्ताशिवाय कचऱ्याचे ट्रक घेऊन जाणार नाही, असे त्यांनी महापौरांना सांगितले. खासदार चंद्रकांत खैरे यांनी गेल्या आठवड्यात गनिमी काव्याने कचरा रिचवू, असे म्हटले होते. त्यानुसार रात्रीच्या वेळी काही भागांत ट्रक नेले जात आहेत. मंगळवारी टीव्ही सेंटर चौकातील विवेकानंद उद्यानात ट्रक पोहोचले. तेव्हा माजी महापौर सुदाम सोनवणे यांच्या नेतृत्वात जमावाने विरोध केला. कर्मचाऱ्यांना मारहाण, ट्रकवर दगडफेकही केली. त्यामुळे कामगार शक्ती संघटनेने आधी पोलिस बंदोबस्त द्या, असे म्हटले आहे. मारहाणीची तक्रार अधिकाऱ्यांनीच द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.


घाटी, कॅन्सर हॉस्पिटलला मनपाची नोटीस
शहरात रोज एक क्विंटलपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या आस्थापनांना नोटिसा बजावण्यात येत असून, त्यात घाटी व कॅन्सर हॉस्पिटलचाही समावेश आहे. तुमच्याकडे निघणाऱ्या कचऱ्याची तुम्हीच विल्हेवाट लावा, असे या नोटीसमध्ये नमूद केले अाहे. या दोन्ही रुग्णालयात दररोज किमान २ टन कचरा निघतो.


कचऱ्याचीच चर्चा
सर्वच भागांतील नागरिक रसायन टाकून कचरा नष्ट होऊच शकत नाही. त्यामुळे काहीही करा, पण कचरा येथून घेऊन जा, असे महापौरांना म्हणत होते. तर कचरा न्यायचा कोठे, याचे उत्तर आमच्याकडे नसल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात येत होते.

 

गांधेलीचा विरोध
ओला कचरा टाकू देण्यासाठी कांतीलाल जैन यांनी गांधेली येथील जागा महापालिकेला उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु यास गांधेलीच्या ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. ग्रामपंचायतीने ठराव घेऊन येथे कचरा टाकू देणार नाही, असे सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...