आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा जाळल्यामुळे उंदीर, किडे पसार; पक्ष्यांची उपासमार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरात कचरा जाळण्याच्या घटनांत वाढ झाल्यामुळे त्यावर जगणारे उंदीर आणि अन्य किडे इतरत्र पसार झाले. यामुळे उंदीर, किडे खाद्य असणाऱ्या पक्ष्यांची उपासमार होत असून अशक्त होऊन जमिनीवर कोसळणाऱ्या पक्ष्यांची संख्या गत महिनाभरात पाचपटींनी वाढली आहे. शहरातील पक्षिमित्रांकडे दररोज ५ ते ७ अशक्त पक्षी दाखल होत आहेत. एरवी आठवडाभरात एवढे पक्षी येतात. परिस्थिती अशीच राहिली तर जीवशृंखला बाधित होण्याचा धोका आहे. 

 

शहरी भागात उंदीर, घुशी आणि किडे कचऱ्यातील अन्नपदार्थ खाऊन जगतात. ते पक्ष्यांचे खाद्य असतात. कचऱ्याच्या ठिकाणी उंदीर, किडे हे जीव मोठ्या प्रमाणात आढळतात. कचऱ्यात आढळणारे हे जीव घार, घुबड या पक्ष्यांचे अन्न आहेत. कचराकोंडी झाल्यापासून २०-२५ दिवसांत ठिकठिकाणी कचरा जाळला जातोय. यात किडेही जळून राख झालेत, तर उंदरांनी अन्यत्र पळ काढलाय. यामुळे अन्नशृंखला बाधित झाल्याचे पक्षिमित्र डॉ. किशोर पाठक यांनी सांगितले. 

गत आठवड्यातच जयभवानीनगरातील हनुमान कुचट यांच्या घराच्या गच्चीवर एक घुबड निपचित पडलेले आढळले. कोठी किंवा गव्हाणी जातीचे हे घुबड पोटात अन्न नसल्याचे कोसळले होते. त्याला उडताही येत नव्हते. पक्षिप्रेमी सागर पाटील, प्रकाश दुर्वे आणि बबलू धोत्रे यांनी त्याला डॉ. पाठक यांच्याकडे आणले. त्याची तपासणी केली असता त्याच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्याचे दिसून आले. उंदीर हे त्याचे खाद्य अाहे. घुबड एका रात्रीतून २-३ उंदीर फस्त करते. मात्र, कचरा जाळल्यामुळे ही अन्नसाखळी तुटली. याप्रमाणेच पक्षिप्रेमींनी उपाशी घार आणि कबूतरही डॉ. पाठक यांच्याकडे आणले होते. डॉ. पाठक यांनी त्यास कॅल्शियमचे डोस दिले, मांसही खाऊ घातले. तीन दिवसांच्या उपचारानंतर या पक्ष्यांत जीव आला आणि ते आकाशात झेपावले. 

 

जीवशृंखला बाधित होण्याचा धोका 
कचऱ्यावर जगणारे उंदीर आणि अन्य जीव हे पक्ष्यांचे अन्न आहे. मात्र, कचरा जाळल्यामुळे ते पसार झाले आहेत. परिणामी पक्ष्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अजून काही दिवस कचरा जाळणे सुरू राहिले तर पक्ष्यांची संख्या घटेल. यामुळे जीवशृंखला बाधित होईल. -डॉ. किशोर पाठक, पक्षिमित्र 

 

पाचपटींनी वाढले अशक्त पक्षी 
उन्हाच्या तडाख्यामुळे एरवीही या दिवसांत पक्षी कोसळतात. मात्र, अजून म्हणावे तसे ऊन वाढलेले नाही. यामुळे अन्न न मिळाल्याने हे पक्षी कोसळल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट झाले. या काळात सरासरी अशा पद्धतीने आठवड्याला ५-७ पक्षी कोसळतात. आता दिवसाकाठी एवढे पक्षी दाखल होत आहेत. कचरा जाळणे सुरू झाल्याच्या २०-२५ दिवसांत हे प्रमाण पाचपटींनी वाढल्याची माहिती डॉ. किशोर पाठक यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...