आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अख्खे मिटमिटा गाव उतरले रस्त्यावर; 3 तास चालली जाळपोळ, दगडफेक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद /दौलताबाद - कचराकोंडीच्या २० व्या दिवशी मिटमिटा परिसरातून अप्पावाडी येथे कचरा घेऊन निघालेले दोन ट्रक गावकऱ्यांनी जाळले. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवरही तुफान दगडफेक केली. अख्खे मिटमिटा गाव रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे दहा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी या गाड्यांना तब्बल सात तास लागले.

 

एकूण ३५ आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. त्यात २६ महिला, ९ पुरुषांचा समावेश होता. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आंदोलक महिलांवरही लाठीचार्ज करण्यात आला. दरम्यान, सायंकाळी सातच्या सुमारास चार ट्रकच्या पहिल्या ताफ्याने अप्पावाडी शिवारात माई महाराज मठाच्या पाठीमागे ट्रक रिकामे केले. त्यानंतरच्या तासाभरात आणखी १२ ट्रक कचरा तेथे टाकण्यात आला.   


बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास मनपाचे सहा  ट्रक पोलिस बंदोबस्तात अप्पावाडीकडे जात असताना मिटमिट्याजवळ गावकऱ्यांनी ट्रक अडवत दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात पोलिसांच्या दोन आणि अग्निशमन विभागाच्या एका गाडीच्या काचा फुटल्या. जमाव तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने कचरा घेऊन जाणाऱ्या दोन गाड्या अक्षरशः: पेटवून दिल्या.   
पोलिसांनी प्रथम समजूत घालण्याची भूमिका घेतली. मात्र नागरिक ऐकण्यास तयार नव्हते. महिलादेखील रस्त्यावर उतरल्या होत्या. गावकऱ्यांनी रस्त्यावर मोठमोठे दगड आणून टाकले, तर टायर आणि झाडांचे खोड रस्त्यावर जाळून टाकले होते. दोन तास हा प्रकार सुरूच होता. अखेर उपायुक्त विनायक ढाकणे यांनी सौम्य लाठीचार्जचे आदेश दिले.

 

आजही तणाव होण्याची शक्यता   
गुरुवारीदेखील या परिसरात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. या भागातील महिलांवर लाठीचार्ज झाला आहे. दगडफेक करणाऱ्यांच्या दुचाकीदेखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत.  शिवाय अप्पावाडी येथे कचरा टाकण्याचे कामही सुरूच राहणार आहे. त्यामुळे तणाव कायम असणार आहे.

 

मनपाने गावकऱ्यांना विश्वासात घेतलेच नाही   
दोन दिवसांपासून या भागातील नागरिकांच्या बैठका सुरू होत्या. बुधवारी सकाळी नऊ वाजता अप्पावाडी येथील जमीन मालक आणि मनपाचे अधिकारी, महापौर जागा बघण्यासाठी आले असता गावकऱ्यांनी त्यांना विरोध केला. या वेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. त्यानंतर वातावरण अधिक तापले. पडेगाव आणि मिटमिटा परिसरातील लोकांना हा कचरा सफारी पार्कच्या ठिकाणीच टाकणार असे वाटल्यामुळे प्रक्षोभ अधिक वाढला. प्रत्यक्षात अप्पावाडी आणि सफारी पार्क यात तीन किलोमीटरचे अंतर आहे.  नागरिकांना विश्वासात घेऊन कारवाई केली असती तर एवढी गंभीर परिस्थिती झाली नसती.   

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, अश्रुधुराच्‍या 25 नळकांड्या फोडल्‍या व पाहा फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...