आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साताऱ्यातील कचऱ्याचे वर्गीकरण, ओला कचरा कंपोस्टिंगला, तर सुका सेंट्रल नाक्याला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सातारा आणि देवळाई परिसरातील नागरिकांनी कचरा वर्गीकरण करून दिला तरी कर्मचारी मात्र सर्व कचरा एकत्र आणून पुरत असल्याचे वृत्त 'दिव्य मराठी'ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन वॉर्डात नागरिकांनी बंद केलेले वर्गीकरण पुन्हा सुरू करून ओला कचरा कंपोस्टिंगला, तर सुका कचरा सेंट्रल नाक्याला पाठवला जाऊ लागला आहे. 

 

शहरातील कचराकोंडीला २३ दिवस पूर्ण झालेले असताना मनपा प्रशासनाकडून मात्र अद्याप कोणतेच नियोजन करण्यात आलेले नाही. शहरात हा प्रकार होत असला तरी सातारा आणि देवळाई या दोन्ही वाॅर्डांमध्ये कोणत्याच प्रकारची कचरा कोंडी नाही. सुरुवातीला येथे वर्गीकरणास चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, सर्व कचरा नारेगावात जात असल्याने वर्गीकरण करूनही पुढे पूर्ण कचरा एकत्र करण्यात येत होता. त्यावर कोणतीच प्रक्रिया करण्यात येत नव्हती. त्यामुळे कालांतराने नागरिकांनीही कचरा वर्गीकरण करून देणे बंद केले होते. मात्र, १६ फेब्रुवारीपासून कचरा नारेगाव डेपोत जाणे बंद करण्यात आल्याने शहरांत कचराकोंडी झाली होती. त्यामुळे पुन्हा वर्गीकरण आणि कचऱ्यावर प्रक्रिया करण्यावर जोर देण्यात येत असल्याने सातारा आणि देवळाईत सुरुवातीला कचरा एकत्र करून पुरण्यात येत होता. त्यावर प्रक्रिया होत नसल्याचे वृत्त 'दिव्य मराठी'ने प्रसिद्ध केल्यानंतर या दोन्ही वॉर्डांत कचऱ्याचे वर्गीकरण केले जात असून कंपोस्टिंगही सुरू केले आहे. महापौरांच्या आदेशानुसार ही मोहीम पुन्हा राबवण्यात येत असून यासाठी स्वच्छता निरीक्षक उमेश खरात, मनपाच्या जीवशास्त्रज्ञ डॉ. अर्चना राणे, पर्यवेक्षक जे. आर. बोराडे, शेख अन्वर, मनोज जगधने, अमोल दाभाडे, शेख मुनवर कार्यरत आहेत. 


आरोग्याचीही काळजी : शहराप्रमाणे सातारा-देवळाई वॉर्डातही आता वर्गीकरणासह औषध फवारणी करण्याची मोहीम मनपाच्या वतीने राबवण्यात येत आहे. त्यामुळे कचरा वेगळा करून आणल्यानंतर फवारणी करण्यात येते आणि जेथे कचरा टाकला तेथून उचलल्यानंतरही फवारणी करून आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे. 


महापौरांचे एकाकी प्रयत्न 
शहरातील कचराकोंडी फोडण्यासह सातारा आणि देवळाईत बंद पडलेली कचरा वर्गीकरण मोहीम पुन्हा सुरू केली. इतर ठिकाणची कचराकोंडी फोडण्यासाठी मनपा प्रशासनाने जेवढे प्रयत्न केले नाहीत, त्यापेक्षा जास्त महापौर म्हणून नंदकुमार घोडेले यांनी प्रयत्न केले आहेत. विशेष म्हणजे, शहरात कचरा आणि आरोग्य सांभाळताना त्यांचे आरोग्य खालावले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना सलाइन लावण्यात आले होते. त्यानंतरही त्यांनी लगेच रात्री बैठका घेऊन जागांचे नियोजन करण्याचे आदेश मनपा प्रशासनाला दिले. 

बातम्या आणखी आहेत...