आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीमुळे मनपात वचनपूर्ती? अर्थसंकल्प तयार करतानाच पदाधिकाऱ्यांनी घेतली खबरदारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरातील विकास कामांसाठी दरवर्षी अंदाजपत्रक तयार केले जाते. मात्र आगामी निवडणुकांमुळे पुढील वर्षीपासून लागणारी आचारसंहिता लक्षात घेऊन चाणाक्ष पदाधिकाऱ्यांनी यंदा अंदाजपत्रकातच वचनपूर्तीची खबरदारी घेतली असल्याची चर्चा आहे. युतीच्या संकल्पपूर्तीवर डोळा ठेऊन तयार केलेल्या या अर्थसंकल्पात नागरी सुविधांच्या विविध योजनांचाच समावेश केला आहे, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी ठामपणे सांगितले. 


वॉर्डातील कामे प्राधान्याने व्हावी, यासाठी त्यांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यासाठी नगरसेवक आग्रही असतात. त्यात अंतर्गत, मुख्य आणि इतर रस्ते, ड्रेनेज, पथदिवे, सभागृह, दुरुस्ती, जलवाहिनी आदी कामांचा समावेश असतो. जास्तीत जास्त कामांचा समावेश व्हावा, यासाठी नगरसेवकांची चढाओढ सुरु असते. यंदाही सुरुवातीला नगरसेवकांनी तशी धडपड केली. प्रशासनानेही प्रशासकीय कामांचा समावेश केला आहे. दुसरीकडे स्थायी समितीने यात वाढ करुन समितीच्या सदस्यांना वाव देत त्यांच्या कामांचाही समावेश केला. त्यानंतर सर्वसाधारण सभेसमोर हा अर्थसंकल्प आलेला आहे. 


यात दुरुस्तीसह मंजूर करण्यासाठी सभेची आवश्यकता अाहे. दोन महिन्यांपासून हा अर्थसंकल्प सभेच्या मान्यतेसाठी पडून आहे. सोमवारी अर्थसंकल्प सादर करून त्याला मंजुरी दिली जाणार आहे. युतीच्या संकल्पपूर्तीत रस्ते, पाणी, पथदिव्यांचा समावेश होता. शासनाचे १५० कोटी आणि साताऱ्यातील २५ कोटींतून रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. समांतरकडून पाणी मिळणार असले तरी मनपा आपल्या फंडातून पंप, जलकुंभ आणि जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करू शकते. पथदिव्यांसाठी एलईडी प्रकल्प राबवण्यात येत आहे. 


आता या कामांना प्राधान्य बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतीवन, हैदराबाद मुक्तिसंग्राम संग्रहालय, गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक, ५० खाटांचे रुग्णालय, वारकरी भवन, मीनाताई ठाकरे योजना, मोफत अंत्यविधी योजना ही कामे प्राधान्याने हाती घेण्यात येऊ शकतात. 


नगरसेवकांच्या कामांवर परिणाम 
संकल्पपूर्तीसाठी अर्थसंकल्पात अनेक योजनांचा समावेश केला आहे. दुसरीकडे नगरसेवकांनीही कामांची यादी तयार केली आहे. मनपाची आर्थिक स्थिती पाहता नवीन योजना पूर्ण करण्यासाठी अनेकांच्या कामांना कात्री लागू शकते. तसेच यंदा स्पील ओव्हरचे प्रमाणही अधिक असेल. नवीन आयुक्त याबाबत काय भूमिका घेतात, याकडेही सर्वांचे लक्ष आहे. 

बातम्या आणखी आहेत...