आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रखर विरोध तरी मनपाने पडेगावात टाकला कचरा, गाड्या स्थानिकांनी अडवल्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - c बुधवारी पुन्हा विरोध झाला, परंतु शांततेत. तगडा पोलिस बंदोबस्त असल्याने दोन तास थांबून नंतर येथे कचरा टाकण्यात आला.

 

भावसिंगपुरा आणि पडेगावातील नागरिकांनी कचऱ्याच्या गाड्यांना आडवे जात रस्त्यावरच वाहने अडवली. काहीही झाले तरी येथे कचरा टाकू देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. हे आंदोलन दोन तास सुरू होते. आज येथे आलेल्या वाहनातील कचरा टाकू द्यावा, उद्या आणणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर ट्रकमधील कचरा टाकू दिला गेला. नारेगाव येथे कचरा टाकणे बंद झाल्यापासून आता कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी चिकलठाणा, कांचनवाडी, हर्सूल आणि पडेगाव येथील चार जागा महापालिकेने निश्‍चित केल्या आहेत. सध्या तिथेच कचरा टाकला जात आहे. मात्र, टाकलेल्या कचऱ्यावर कोणतीच प्रक्रिया होत नसल्याने आता स्थानिक नागरिकांकडून कचरा टाकण्यास विरोध होतो आहे. मनपाने काल पडेगाव येथील कत्तलखाना परिसरात कचऱ्याच्या ५० गाड्या रिकाम्या केल्या. यादरम्यान काही नागरिकांनी कचरा टाकण्यास विरोध करत कचऱ्याच्या गाड्यांवर तुफान दगडफेक केली. त्यात एका ट्रकच्या काचा फुटल्या. त्यानंतर मनपाने काल सायंकाळपर्यंत पोलिस बंदोबस्तात कचरा टाकला.

 

बुधवारी सकाळी पुन्हा मनपाच्या गाड्या पोलिस बंदोबस्तात पडेगाव भागात पोहोचल्या. मात्र भावसिंगपुरा आणि पडेगाव येथील नागरिक कत्तलखाना रोडवरच या गाड्यांना अाडवे गेले. संतप्त नागरिकांनी रस्त्यावरच ठिय्या देत या गाड्या पुढे जाऊ देण्यास मज्जाव केला. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. मनपाचे शहर अभियंता सखाराम पानझडे, सहायक आयुक्त नंदकुमार भोंबे, नोडल ऑफिसर वसंत निकम आदींनी तिथे येऊन नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यानंतर मनपा अधिकाऱ्यांनी "ठीक आहे, यापुढे नवीन कचरा आणणार नाही, परंतु आता आलेल्या या गाड्या टाकू द्या,' असा प्रस्ताव मांडला. त्यावर आंदोलकांनी या पंधरा गाड्या रिकाम्या करण्यास सहमती दर्शवत आपले आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात खंडेराव लोखंडे, बाळासाहेब शेलार, सुनील लोखंडे, अंकुश लोखंडे, दिलीप कवडे यांच्यासह भावसिंगपुरा, पडेगाव आणि ग्लोरिया सिटी येथील नागरिक सहभागी झाले होते.

 

२५ टक्के कचरा उचलल्याचा दावा
दरम्यान, दोन दिवसांत रस्त्यावर साचलेला २५ टक्के कचरा उचलण्यात आल्याचा दावा महापौर नंदकुमार घोडेले यांनी पत्रकारांशी बोलताना केला. पडेगाव येथे कचरा टाकण्यास उद्या पुन्हा विरोध होणार याची कल्पना असल्याने सायंकाळी त्यांनी संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. दिमतीला मनुष्यबळ असल्याने उद्या चिकलठाणा आणि पडेगाव येथे कचरा टाकला जाणार हे स्पष्ट झाले आहे. ८ दिवसांत सर्व कचरा उचलून त्यावर चिकलठाणा व पडेगाव येथे प्रक्रिया केली जाणार आहे. त्याचे नियोजन करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...