आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...हे तर पोलिसांचे गुंडाराज, मिटमिट्याच्या महिलांनी सांगितली पोलिसांच्या अत्याचारांची कहाणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औैरंगाबाद - आमची काहीच चूक नाही. पोलिसांनी घरात घुसून आम्हाला मारहाण केली. मुलाबाळांनाही मारले. पुन्हा आमच्यावरच गुरकावत फ्रिजमधले आइस्क्रीमही खाल्ले.. हे गुंडाराज नाही तर काय आहे... अशा शब्दांत मिटमिटा गावातील महिलांनी सोमवारी पोलिसांच्या अत्याचाराबाबत विभागीय आयुक्तांसमोर गाऱ्हाणे मांडले. आमदार इम्तियाज जलील यांच्यासह मिटमिटा गावातील महिला, ग्रामस्थांनी सोमवारी विभागीय आयुक्तालयात धाव घेऊन पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीची माहिती दिली. या पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी करत या ग्रामस्थांनी एक तास विभागीय आयुक्तालयात ठिय्या दिला. दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करू, असे पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी सांगितल्यानंतर महिला शांत झाल्या. मिटमिटा गावातील युवकांसह महिला, बालके यांना पोलिसांनी कशी मारहाण केली, याचे चित्र या ग्रामस्थांच्या आक्रोशातून उभे राहिले. अनेक महिलांच्या पायांवर काठ्यांचे वळ होते. महिलांनी त्यांना झालेल्या मारहाणीची कहाणी विभागीय आयुक्तांसमोर सांगितली. हे वळ पाहून विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी अवाक् झाले. 

 

पोलिसांच्या धास्तीने अनेकांनी गाव सोडले 
महिलांनी सांगितले, पोलिसांनी आम्हाला मारले, टीव्ही फोडला. अनेक जण आमच्याच घरातले पाणी पित होते. काहींनी फ्रिजमधील आइस्क्रीम फस्त केले. पोलिसांच्या या वागणुकीमुळे ग्रामस्थांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. पोलिस पुन्हा गावात धडकतील, या भीतीपोटी अनेक जण गाव सोडून गेले आहेत. त्यामुळे या पोलिसांवर कठोर कारवाई करा, ग्रामस्थांवर नोंदवलेले गुन्हे मागे घ्या, अशी मागणी महिलांनी केली. 


वर्दी मिळाली म्हणून गुंडगिरी जमणार नाही : आमदार इम्तियाज जलील म्हणाले, वर्दी मिळाली म्हणजे पोलिसांनी अशी गुंडगिरी करणे योग्य नाही. ग्रामस्थांना अमानुषपणे झालेली मारहाण म्हणजे त्यांची गुंडगिरीच आहे, हे सहन केले जाणार नाही. या प्रकरणात कारवाई झालीच पाहिजे. पोलिसांनी मारहाण केलेल्या सहा महिलांना मंगळवारी विधानसभेत घेऊन जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 


पोलिस उपायुक्तांनी केले आश्वस्त 
महिला, आमदार इम्तियाज जलील यांच्या आक्रमक भूमिकेनंतर विभागीय आयुक्तांनी पोलिस आयुक्तांसोबत चर्चा केली. त्यानंतर पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे विभागीय आयुक्तालयात आले. आता गावात येऊन पोलिस कोणाला अटक करणार नाहीत. केवळ चौकशी केली जाईल, अशा शब्दांत त्यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले. दोषी पोलिसांवरही कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 


मुले, पतीला सोडा 
या वेळी छाया मालोदे यांनी सांगितले, पोलिसांनी आम्हाला घरात घुसून मारहाण केली. माझ्या दोन वर्षांच्या मुलीलाही चापट मारली. पतीला पकडून नेले. आम्हाला कोणाचाही आधार नाही. माझ्या पतीला सोडा, अशी विनवणी त्यांनी केली. फरिदा शेख इब्राहिम यांच्या डोक्याला १४ टाके पडले आहेत. त्यांनीही मारहाणीबाबात गाऱ्हाण मांडले. अनेक महिलांनी पायावर उठलेले वळ दाखवल्यानंतर पोलिसांनी किती अमानुषपणे काठ्या चालवल्या हे समोर आले. 

बातम्या आणखी आहेत...