आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊसतोड कामगार महिलेने दिला मत्स्यपरीला जन्म, अवघ्या 15 मिनिटांचे आयुष्य आले वाट्याला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- अंबाजोगाई मेडिकल काॅलेजच्या प्रसूती विभागात एका ऊसतोड कामगार महिलेने मत्स्यपरी रुपातील बाळाला जन्म दिला. पण त्या बाळाचा अवघ्या 15 मिनिटांतच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी 9 वाजता घडली. लाखात एक असे उदाहरण पाहायला मिळते अशी माहिती डाॅक्टरांनी दिली आहे. 

 

एका उसतोड कामगार महिलेला रविवारी संध्याकाळी प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते सोमवारी सकाळी आठच्या सुमारास तिला प्रसुती कळा सुरु झाल्या. प्रसुती विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वर्षा वरपे, डॉ. प्रियंका खराणे, डॉ. कल्याणी मुळे, डॉ. पूनम देसाई, डॉ. सपना चिंचोले यांनी तिची प्रसूती केली. साधारणपणे सकाळी नऊच्या सुमारास तिने बाळाला जन्म दिला. पण दोन पाय जोडलेला एकच पाय आणि लिंग नसलेलं बाळ जन्माला आले. महिलेची प्रसूती नॉर्मल झाली असली तरी बाळाची प्रकृती तशी जन्मतःच चिंताजनक होती. अशा विचित्र अवस्थेत जन्मलेल्या बाळाला अवघ्या 15 मिनिटांचच आयुष्य मिळाले.

 

डॉ. संजय बनसोडे यांनी सांगितले, वैद्यकीय परिभाषेत याला सिरेनोमेलिया म्हणतात. सिरेनोमेलियाला मर्मेड सिंड्रोमही (मत्स्यपरी) म्हटलं जातं. एका लाखात एक असं उदाहरण पाहायला मिळतं. हे बाळ आता वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती विभागातील म्युझियममध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी ठेवण्याचा प्रयत्न चालू अाहे. या महिलेने गर्भधारणेनंतर कसलेही औषधोपचार घेतलेले नाहीत. एक महिन्यापूर्वी खाजगी रूग्णालयात सोनोग्राफी केली असता बाळाच्या किडनी आणि फुफ्फुसात अडचण असल्याचे वैद्यकीय अहवालात नमुद करण्यात आले होते असेही डॉ. संजय बनसोडे यांनी सांगितले.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...