आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा व्यवस्थापनातून बायोगॅस निर्मिती, गॅस साठवण्यासाठी पॉलिमरचा बलून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- विवेकानंद महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाने कचरा व्यवस्थापनातून बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प उभारला असून मागील दोन वर्षांपासून तो कार्यान्वित आहे. सुरुवातीला प्रयोगशाळेच्या छतावर केलेल्या छोट्या प्रकल्पावर आधारित आणखी मोठा प्रकल्प महाविद्यालय परिसरात उभारणे सुरू आहे. महाविद्यालयाच्या परिसरातील झाडांचा पालापाचोळा गोळा करून गॅस आणि वीज निर्मितीदेखील करण्यात येणार आहे. 


शेणाऐवजी कचऱ्यापासून केली बायोगॅस निर्मिती

बायोगॅस ही तशी जुनी संकल्पना आहे. परंतु केवळ शेणापासूनच बायोगॅस निर्मिती करता येते हा एक गैरसमज आहे. शास्त्रीयदृष्ट्या कुठल्याही प्रकारच्या सेंद्रिय पदार्थांपासून बायोगॅस निर्मिती करता येते. परंतु काही सेंद्रिय पदार्थ जसे, पालापाचोळा, खराब कागदाचे लवकर विघटन होत नसल्याने ते बायोगॅस प्रकल्पांमध्ये सहसा वापरले जात नाही. त्यामुळे नेमका हाच धागा पकडून विवेकानंद विज्ञान महाविद्यालयातील प्रा.डॉ. नितीन अधापुरे व त्यांच्या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या कचऱ्यावर विशिष्ट प्रक्रिया करून बायोगॅस निर्मिती करून दाखवली. 


असा केला प्रयोग 
पालापाचोळा व कागदाचा वापर करून बायोगॅस तयार करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या सूक्ष्म जिवाणूंचे मिश्रण वापरण्यात येते. तयार झालेला मिथेन गॅस साठवण्यासाठी अतिशय कमी खर्चात पॉलिमरच्या बॅग बनवल्या आहेत. यात गरज नसेल तेव्हा गॅस साठवणे शक्य आहे.

 
गॅस साठवण्यासाठी स्वतंत्र बलून 
डॉ. अधापुरे यांनी विशिष्ट पॉलिमरचा वापर करून गॅस साठवणीसाठी बलून तयार केले आहे. गॅस तयार झाला, की तो बलूनमध्ये साठवता येतो. हे बलून विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाच्या जैवतंत्रज्ञान व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्राध्यापकांचे आगळेवेगळे संशोधन आहे. 


असा मिळेल गॅस आणि वीज 
डॉ. अधापुरे यांनी टाकीच्या क्षमतेनुसार किती ओला कचरा टाकला तर किती लिटर गॅस व किती वॅट वीज मिळेल याचा तक्ताच केला आहे. टाकी जेवढी मोठी तेवढा जास्त गॅस आणि वीज निर्मिती होते. 


कचऱ्यापासून मिळते सेंद्रिय घन खत 
सेंद्रिय कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी कंपोस्ट हासुद्धा पर्याय उपलब्ध आहे. कचऱ्यापासून सेंद्रिय घन खत तयार होते, परंतु कंपोस्टिंग प्रक्रियेसाठी बायोगॅस पेक्षा जास्त काळ लागतो. तसेच बायोगॅस प्रकल्पातून निघणारे सांडपाणी हे उत्तम असे सेंद्रिय द्रवरूप खत म्हणून वापरता येते. अर्थात, सेंद्रिय कचऱ्यापासून कंपोस्टिंगद्वारे केवळ घन खत घ्यायचे की गॅस व द्रवरूप खत घ्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. 

बातम्या आणखी आहेत...