आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: केवळ दहावी शिकलेले दोघे डॉक्टर म्हणून करायचे उपचार, पोलिसांनी केली अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - केवळ दहावीचे शिक्षण झालेले असताना सहा वर्षांपूर्वी पश्चिम बंगालवरून येऊन स्वत:ला एमबीबीएस डॉक्टर असल्याचे सांगून उपचार करणाऱ्या दोघांना मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली. बिपलास तुलसी हलदार (३०) आणि बिस्वजित कालिपाद बिस्वास (३१, दोघांचा ह. मु. भालगाव) अशी लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या बनावट डॉक्टरांची नावे आहेत. शुक्रवारी पोलिसांनी दोघांना मुकुंदवाडी परिसरातून औषधे घेऊन जाताना अटक केली. न्यायालयाने त्यांना २५ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

भालगावात गेल्या सहा वर्षांपासून दोघेही वास्तव्यास होते. केवळ दहावी पास बिपलास सहा वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आला होता, तर बिस्वजित वर्षभरापूर्वी आला. स्वत: अल्पशिक्षित असतानादेखील तो स्वत:ला एमबीबीएस डॉक्टर असल्याचे सांगून झोपडपट्टी, ग्रामीण भागात फसवणूक करून तपासणी करत औषधी देत होता. शुक्रवारी तो औषधे घेऊन मुकुंदवाडी परिसरातून जात असताना खबऱ्याने ते बनावट डॉक्टर असल्याची माहिती मुकुंदवाडी पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी दोघांना अटक केली. चौकशीमध्ये त्यांनी हा सर्व प्रकार सांगितला. निरीक्षक नाथा जाधव, सहायक फौजदार शेख हारुण, कौतिक गोरे, कैलास काकड, विजय चौधरी, शेख अस्लम, प्रकाश सोनवणे, सोमकांत भालेराव, सुनील पवार यांनी मुकुंदवाडी बसस्थानकासमोर सापळा रचून कारवाई केली. त्यांच्याकडून तसेच त्यांच्या घरातून २२ हजार २७५ रुपयांची विविध कंपन्यांची औषधी जप्त करण्यात आली. जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत प्रभाकरराव दाते यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक फौजदार शेख हारुण पुढील तपास करत आहेत.

 

मोठी टोळी असण्याची शक्यता
दोघेच इतकी मोठी फसवणूक करणे अशक्य असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. चौकशीमध्ये यांची मोठी टोळी असल्याची दाट शक्यता पोलिसांना वाटत आहे. त्या दिशेने तपास सुरू असल्याचे निरीक्षक नाथा जाधव यांनी सांगितले.

 

सलाइनसुद्धा लावायचे, अंदाजे औषधी द्यायचे
बिपलास व बिस्वजित शक्यताे झोपडपट्टी परिसरात हा प्रकार करत असत. पैठण, जालना, पाचोड, औरंगाबादच्या ग्रामीण भागात त्यांनी अनेकांना असे सांगून फसवले. अंदाजे औषधी देणे, सलाइन लावणे, इंजेक्शनही देत असत. हा प्रकार सहा वर्षांपासून बिपलास करत होता. त्यानंतर त्याने बिस्वजितला सुद्धा गावाकडून बोलावून घेत यात सहभागी करून घेतले.

 

बातम्या आणखी आहेत...