आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाचा आयुक्त पुन्हा मिळणार; चिरंजीव प्रसाद यांच्या नावावर शिक्कामोर्तब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आैरंगाबाद- नुकतेच दंगलीत होरपळलेल्या औरंगाबादला अखेर पोलिस आयुक्त मिळाले असून चिरंजीव प्रसाद हे नवीन पोलिस आयुक्त म्हणून लवकरच पदभार स्वीकारणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसाद यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. 

 

चिरंजीव प्रसाद यांच्या बदलीमुळे शहराला पुन्हा विशेष पोलिस महानिरीक्षक (स्पेशल आयजी) दर्जाचा पोलिस आयुक्त मिळणार आहे.   दोन दिवसांत ते पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. अमितेशकुमार यांच्या बदलीनंतर यशस्वी यादव यांची पोलिस आयुक्त म्हणून येथे बदली झाली होती. ते दोघेही डीआयजी म्हणजे पोलिस उपमहानिरीक्षक दर्जाचे आयुक्त होते. त्यामुळे औरंगाबादचे पोलिस आयुक्तपद पदावनत झाले होते. डीआयजी ते स्पेशल आयजीपदापर्यंत जाण्यासाठी किमान पाच ते सहा वर्षे लागतात. औरंगाबादसारख्या संवेदनशील शहराला अशाच अनुभवी अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. बदलीबाबत चिरंजीव प्रसाद यांना विचारले असता गुरुवारी रात्रीपर्यंत माझ्याकडे बदलीचा आदेश आला नसल्याचे त्यांनी सांगितले. 


पोलिस आयुक्तांच्या नियुक्तीसाठी भाजप आमदार अतुल सावे यांनी मुख्यमंत्र्यांकडे गुरुवारी आग्रह धरला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड यांच्यासह सावेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन गेल्या काही महिन्यांत शहरात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तातडीने पूर्णवेळ पोलिस आयुक्त मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्या वेळी २४ तासांत चिरंजीव प्रसाद यांच्या नियुक्तीचे आदेश जारी करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 


महिनाभरापासून प्रसाद यांचीच चर्चा 
मिटमिटा येथे कचरा टाकण्याच्या कारणावरून ७ मार्च रोजी झालेल्या दंगलीनंतर राज्य सरकारने १५ मार्च रोजी तत्कालीन पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना तडकाफडकी १ महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवले. तेव्हापासून पोलिस आयुक्तपद रिक्त आहे. औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्याकडे अतिरिक्त पदभार आहे. गेल्या महिनाभरापासून चिरंजीव प्रसाद यांची शहराच्या पोलिस आयुक्तपदी वर्णी लागणार अशी चर्चा होती. दोन दिवसांपूर्वी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन औरंगाबादला तत्काळ पोलिस आयुक्त देण्याची मागणी केली होती. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी तीन दिवसांत पोलिस आयुक्तांच्या नियुक्तीचे आश्वासन दिले होते. 


यापूर्वी होते औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षक 
चिरंजीव प्रसाद हे पोलिस दलात कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून परिचित आहेत. २००२ ते २००४ या काळात ते औरंगाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षक होते. जालन्याचे पोलिस अधीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. ते १९९६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यानंतर फोर्स-वन पथक स्थापन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 

बातम्या आणखी आहेत...