आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडको-शिवाजीनगर-मुंबई शिवशाही बस सुरू, खासगी ट्रॅव्हल्ससोबत एसटी करणार स्पर्धा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- एप्रिलमध्ये सुरू झालेली औरंगाबाद-सावंतवाडी स्लीपर कोच शिवशाही बससेवा स्थगित करून रविवारी सिडको-शिवाजीनगर-मुंबई वातानुकूलित स्लीपर कोच बस सुरू करण्यात आली. सिडको येथून दररोज रात्री १०.३० वाजता बस सुटेल तर मुंबई येथून रात्री ११.३० निघेल. औरंगाबादेतून मुंबईसाठी एसटीची पहिली स्लीपर कोच सुरू झाल्याने प्रवाशांची सोय झाली आहे. 


प्रवाशांची सुरक्षा आणि मागणी लक्षात घेऊन नवनवीन मॉडेलच्या बसची निर्मिती केली जात आहे. लालपरी, एशियाड, व्होल्व्हो, पुशबॅक, अश्वमेधनंतर नवीन पांढऱ्या रंगाची बस उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर शिवशाही बस दाखल झाल्या. मात्र, खासगी ट्रॅव्हल्सबरोबर स्पर्धा करणे व एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने प्रवाशांच्या मागणीनुसार स्लीपर बससेवा सुरू करणे अनिवार्य होते. लांब पल्ल्याच्या मार्गावरील एसटी स्लीपर कोच नसल्यामुळे प्रवासी खासगी बसलाच प्राधान्य देत असत. ही बाब हेरून परिवहनमंत्री दिवाकर रावते व एसटी प्रशासनाने स्लीपर कोच बस देण्याचा निर्णय घेतला होता. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येत आहे. औरंगाबाद आगारास ७ एप्रिल रोजी दोन बस देण्यात आल्या. ९ एप्रिलपासून मध्यवर्ती बसस्थानक ते कोल्हापूर-सावंतवाडी ही पहिली स्लीपर बस सुरू करण्यात आली होती. प्रवाशांची मागणी थेट औरंगाबाद ते पणजी अशी होती. पण परवानगी न मिळाल्यामुळे सावंतवाडीपर्यंत ही सेवा सुरू करण्यात आली होती. त्यास पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने ही सेवा गोवा सरकारची परवानगी मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्याऐवजी आता १० जूनपासून सिडको, मध्यवर्ती बसस्थानक ते शिवाजीनगर-मुंबई बससेवा सुरू करण्यात आली. उपमहाव्यवस्थापक मधुकर पटारे, आगार व्यवस्थापक पी. पी. देशमुख, स्थानक प्रमुख एस. एस. सूर्यवंशी, वाहतूक निरीक्षक ए. डी. खैरनार यांनी हिरवी झेंडी दाखवून बस रवाना केली. 


मुंबईसाठी ९१८ रुपये तिकीट 
वातानुकूलित स्लीपर बसमध्ये एलईडी टीव्ही, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, वायफाय सेवा, स्वतंत्र रीडिंग लॅम्प, मोबाइल चार्जर, वन बाय टु स्लीपर कोच याप्रमाणे एकूण तीस स्लीपर सीट अाहेत. सिडको ते मुंबईसाठी ९१८ रुपये तिकीट आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकिटात ३० टक्के सवलत लागू आहे. ऑनलाइन तिकीट आरक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. 


नागपूरसाठी बस सुरू होणार
अाैरंगाबादहून नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन लवकरच स्लीपर कोच शिवशाही बससेवा सुरू केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...