आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी म्हणजेच २३ जानेवारीला प्रायोगिक तत्त्वावर पाच शहर बस सुरू करण्याच्या शिवसेनेच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले. या बससाठी निविदा काढण्यावर निर्णय घेण्यासाठी १८ जानेवारीला अपेक्षित असलेली स्मार्ट सिटीची बैठकच ३१ जानेवारीला होणार आहे. स्मार्ट सिटी योजनेचे मेंटॉर सुनील पोरवाल यांनी नवी तारीख दिली आहे. याच बैठकीत पाच बससाठी निविदा काढण्यासाठी अटी व शर्ती काय असतील, यावर निर्णय होणार होता. परंतु ही बैठकच पुढे ढकलण्यात आल्याने बस खरेदी अर्थातच नंतर होणार हे स्पष्ट झाले.
३१ जानेवारीच्या बैठकीत केवळ ५ बस नव्हे तर त्यासोबतच पहिल्या टप्प्यातील ३२ अशा मिळून ३७ बस खरेदीचा निर्णय घेतला जाणार असल्याचे आयुक्त दीपक मुगळीकर यांनी सांगितले. निविदांच्या अटी व शर्ती ठरवल्यानंतर त्या फक्त पाचच बससाठी न ठेवता पहिल्या टप्प्यातील ३२ बसेससाठीही असतील, असे त्यांनी सांगितले. ३७ बससाठी एकत्रित निविदा जारी केल्यानंतर त्या भरण्यासाठी किमान २५ दिवसांचा कालावधी असेल. त्यानंतर प्रत्यक्ष बस ताब्यात येण्यास महिनाभराचा अवधी लागेल. म्हणजेच पहिल्या टप्प्यातील ३७ बस महापालिकेच्या ताफ्यात येण्यासाठी किमान मार्च उजाडू शकतो, असा प्राथमिक अंदाज आहे.
दुसऱ्या टप्प्यात १२५ बसेस खरेदी करणार
पाच बसेस खरेदी करून त्या एसटी महामंडळाकडे चालवण्यास देण्याचा महापौर नंदकुमार घोडेले यांचा मानस होता. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले खरे; परंतु त्यास यश येऊ शकले नाही. त्यामुळे आता थेट ३७ बस मनपाच्या ताफ्यात येतील. तोपर्यंत बस चालवण्यासाठी ठेकेदार कंपनीसाठीही निविदा मागवल्या जातील. दुसऱ्या टप्प्यात १२५ बसेस खरेदी केल्या जातील. पहिल्या टप्प्यातील निविदा प्रक्रिया वेळेत पार पडली तर काही महिन्यांनी सव्वाशे बसेस दाखल होऊ शकतात.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.