आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आधी फारोळ्यात पंप नादुरुस्त, आता सबब जायकवाडी पंपात शंख-शिंपले अडकल्याची

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पंधरा दिवसांपूर्वी फारोळ्यातील पंप काम करत नसल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे सांगण्यात येत होते. तो पंप दुरुस्त झाला तरीही पाणीपुरवठा सुरळीत का नाही, असा सवाल शुक्रवारी सदस्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केला तेव्हा आता जायकवाडीतील पंपात शंख-शिंपले अडकल्याने पाणी कमी येत असल्याचे मनपा प्रशासनाने सांगितले. दोन दिवसांत पंपाची दुरुस्ती करण्यात येणार असून त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा नवा दावा करण्यात आला. दुसरीकडे आमच्या एका घरात एक खासदार व दोन नगरसेवक राहतात तरीही आम्हाला ८ दिवस पाणी मिळत नाही. तुमचा काय उपयोग? असे म्हणून घरातील व वॉर्डातील लोक टोमणा मारत असल्याची खदखद खासदारपुत्र ऋषिकेश खैरे यांनी व्यक्त केली. शहरात अपुरा पाणीपुरवठा होत असून खासगी टँकरद्वारे जलकुंभावरून पाण्याची चोरी होत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. 


खासदार खैरेंचे कार्यालय व जुने निवासस्थान असलेल्या गुलमंडी, राजाबाजार, मछली खडक या भागात मागील आठ दिवसांपासून पाणी नाही. नागेश्वरवाडी, समर्थनगरात कमी दाबाने पाणी येत असून या भागातील जलकुंभांवरून पाण्याची चोरी होत असल्याचा आरोपही ऋषिकेश यांनी या वेळी केला. मागील दोन महिन्यांपासून शहरातील पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. नगरसेवकांकडून पाण्याची बोंब होत असतानाच खा. चंद्रकांत खैरे यांच्याही घरात मागील आठ दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट असल्याचे या निमित्ताने समोर आले. ऋषिकेश यांचे बंधू सचिनही नगरसेवक आहेत. ऋषिकेश खैरे यांनी याविषयी स्पष्टोक्ती देताना पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारावर ताशेरे ओढले. 

 

चार दिवस अशीच टंचाई 
दरम्यान, पंपाची दुरुस्ती करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागेलच. त्यानंतर शहरात येणाऱ्या पाण्यात वाढ होईल. त्यानंतर पूर्वीप्रमाणे पाणी मिळू शकेल. म्हणजेच अजून चार दिवस शहरातील पाणीटंचाई अशीच असेल. तातडीने दुरुस्ती करून शहराचा पुरवठा सुरळीत करावा, असे आदेश सभापती गजानन बारवाल यांनी दिले.

 
१० एमएलडी पाण्याची तूट 
सर्व सुरळीत होण्याच्या बेतात असतानाच फारोळा येथील पंपात गाळ अडकला. त्याच्या दुरुस्तीसाठी दोन दिवस लागतील. परिणामी शहरात येणाऱ्या पाण्यात १० एमएलडीची कमी आली आहे. त्याचा फटका पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पाळताना बसतो. परिणामी काही भागांना सात दिवसांपासून पाणी मिळू शकलेले नाही. 


गाळ काढण्यासाठी येणार यंत्र 
जायकवाडीतील पंपगृहात शेवाळ, गाळ, शंख, शिंपले फसत आहेत. त्यामुळे उपसा कमी होत आहे. दोन दिवसांत गाळ काढण्याचे यंत्र येणार आहे. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी सांगितले. यापूर्वी फारोळा येथील पंप नादुरुस्त झाल्याने पाणी कमी येत होते. आता जायकवाडी येथील पंपाचे कारण त्यांनी समोर केले. 


फक्त सिडकोलाच सावत्र वागणूक कशासाठी? 
शहराला समान पाणीपुरवठ्याची मागणी होत आहे. सध्या तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी पाणी मिळते. तसेच नियोजन सिडको व हडकोसाठी करण्याचे सोडून आजही चौथ्या व पाचव्या दिवशी पाणीपुरवठा केला जातो. फक्त सिडको-हडको भागाला अशी सावत्र वागणूक का दिली जात आहे, असा सवाल सीताराम सुरे यांनी केला. सिडकोतील एन-५, एन-७, हर्सूल जेल या जलकुंभावरील पाण्याचा टप्पा वाढवण्यात आला असून पूर्वीप्रमाणेच फक्त ४५ मिनिटांचा पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांवर विकत पाणी घेण्याची वेळ आली असल्याची संतप्त भावना नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी व्यक्त केली. 


जुन्या शहरात आठ दिवसानंतर पाणी 
जुन्या शहरात तर सातव्या दिवशी पाणी दिले जात असल्याचे एमआयएमचे सय्यद मतीन यांनी सांगितले. स्थायी समिती, सर्वसाधारण सभा आणि महापौरांनी आदेश देऊनही आजपर्यंत समान पाणीपुरवठा केला नसल्याबद्दल मतीन यांनी रोष व्यक्त केला. गादिया विहारमध्ये आठ दिवस उलटूनही नळांना पाणी आले नसल्याचे राखी देसरडा म्हणाल्या. 


दर शुक्रवारी अर्ध्या शहरात ८ तास वीज गुल, तरीही नियोजन नाही 
औरंगाबाद। देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली गेल्या आठवड्यापासून शहराच्या अर्ध्या भागात महावितरणकडून आलटून- पालटून दोन ते आठ तास भारनियमन केले जात आहे. त्यानुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, अशी नागरिकांची मागणी असली तरी शहरात भारनियमनच होत नाही तेव्हा वेगळे नियोजन करण्याचा प्रश्नच नसल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. महावितरणच्या या अघोषित भारनियमनाचा शुक्रवारीही अर्ध्या शहराला फटका बसला. 


महावितरणकडे विचारणा केली असता मान्सूनपूर्व कामे सुरू असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. खासदार चंद्रकांत खैरे यांनी सकाळी महावितरण व महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. वीजपुरवठा विस्कळीत झाल्यास त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होतो. नागरिकांना पाणी खेचता येत नाही. तेव्हा नेमकी परिस्थिती काय आहे, असा सवाल केला असता शहरात भारनियमन नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. तेव्हा पाणीपुरवठ्यासाठी वेगळे नियोजन करण्याची गरज ती काय, असा सवाल मनपाच्या अधिकाऱ्यांनी केला. जर खरेच भारनियमन सुरू झाले तरी महापालिका त्यानुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन करू शकत नाही. यापूर्वी भारनियमनाच्या काळात बरेच प्रयत्न झाले होते. ते शक्य झाले नाही आणि आताही होणार नाही. 

बातम्या आणखी आहेत...