आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंगलीनंतर शहरात प्रथमच येणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडून दिलाशाची अपेक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राजाबाजार, शहागंज आणि नवाबपुरा परिसरात झालेल्या दंगलीला दोन महिने पूर्ण झाले आहेत. दंगलीनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात पोलिसांच्याच व्यासपीठावर येणार आहेत. शनिवार, ७ जुलै रोजी पोलिस आयुक्त कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद््घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी पोलिस महासंचालकपदाचा अलीकडेच पदभार घेतलेले दत्ता पडसलगीकर यांच्यासह मंत्री आणि पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती असणार आहे. 


विशेष म्हणजे या वेळी शहरातील सर्वपक्षीय नेतेही एकाच व्यासपीठावर असणार आहेत. पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, डॉ. रणजित पाटील, खासदार चंद्रकांत खैरे, अामदार इम्तियाज जलील यांच्यासह शहरातील सर्व आमदारांना निमंत्रित करण्यात आले आहे. मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, महापौर नंदकुमार घोडेेलेही असतील. 


३० पेक्षा अधिक अायपीएस शहरात 
शनिवारी एकीकडे पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मंत्री, पोलिस अधिकारी उपस्थित राहणार असताना दुसरीकडे खासगी कार्यक्रमानिमित्त राज्यातील ३० पेक्षा अधिक वरिष्ठ आयपीएस अधिकारी शहरात दाखल होत आहेत. गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजीव कुमार यांच्या मुलाच्या लग्न समारंभानिमित्त हे अधिकारी येत आहेत. त्यामुळे पोलिस आयुक्तालयाच्या लोकार्पणालाही यातील काही अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 


दोन महिने झाले तरी नुकसान भरपाई नाही 
जुन्या शहरात झालेल्या दंगलीला दोन महिने झाले तरी अजून शासनाकडून कुठलीही भरपाई देण्यात आली नाही. पोलिस आणि महसूल विभागाकडून पंचनामे झाले आहेत. त्याचा अहवालदेखील शासनाला पाठवण्यात आला. मात्र अजून नुकसान भरपाई मिळाली नाही. काही राजकीय पक्ष आणि संघटनांनी थोडीफार आर्थिक मदत केली तेवढेच. 


पोलिसांची चौकशी थंडावली 
११ मेच्या रात्री झालेल्या दंगलीत ६० पेक्षा अधिक दुकाने जळाली व त्यांची तोडफोड झाली. १०० पेक्षा अधिक वाहने जळाली तर दोन जणांचा मृत्यू झाला. दंगल रोखण्यात आम्ही अयशस्वी ठरलो, पोलिसांची गुप्तचर यंत्रणा कमकुवत ठरली. त्याची अतिरिक्त पोलिस महासंचालकपदाच्या अधिकाऱ्याकडून चौकशी होईल, असे जाहीर केले होते. मात्र ही चौकशीही थंडावली आहे. शहरात चार महिन्यांत पाच दंगली झाल्या आहेत. मिटमिट्याच्या दंगलीनंतर तत्कालीन पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. शिवाय या दंगलीची नि:पक्ष चौकशी होईल, असे आश्वासन देण्यात आले होते. 


२८ जून रोजी तत्कालीन पोलिस महासंचालक सतीशचंद्र माथूर यांचे पथक मिटमिटा दंगलीची चौकशी करण्यासाठी शहरात आले होते. या पथकाने सीपी कार्यालयात बसूनच ही चौकशी केली. चौकशीसाठी बोलावण्यात आलेल्या नागरिकांनाच माथूर यांनी असे नगरसेवक का निवडून देता, असा सवाल केला. त्या वेळी सबंधित नगरसेवकही त्याच दालनात होते. या समितीकडून ठोस काही निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा असणाऱ्या नागरिकांना केवळ आश्वासनावरच परतावे लागले.

 
समिती आली नि गेली 
नेमकी दंगल कोणामुळे झाली, दंगलीची पूर्वतयारी होती का, या प्रश्नांची उत्तरे अजूनही पोलिस तपासातून पुढे आली नाहीत. आतापर्यंत ६० जणांना अटक करण्यात आली होती. त्यात शिवसेना आणि एमआयएमच्या प्रत्येकी एका नगरसेवकाचा समावेश आहे. यातील बहुतांश संशयित जामिनावर सुटले आहेत. मात्र तपास अजून पुढे सरकलेला नाही. आठ दिवसांपूर्वी सात संशयितांना एका गुन्ह्यातून दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग केल्याचे कारण पुढे करत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील आणि कार्यकर्त्यांनी तब्बल पाच तास सिटी चौक बंद केले होते. अशा घटनांमुळे अजूनही शहर धुमसतच आहे. मात्र प्रशासनाकडून अजूनही कुठलेच ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. 

बातम्या आणखी आहेत...