आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता दिरंगाई केल्यास मनपा बरखास्त करू, औरंगाबादच्या कचराप्रश्नी फडणवीसांचा उग्रावतार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - कचरामुक्तीसाठी ८९ कोटी रुपये दिले. रस्त्यांसाठी १०० कोटी दिले. पण तुम्ही काहीच केले नाही. दोन दिवस कचरा उचलता आणि आठ दिवस तसाच ठेवता. वर्षभरापूर्वी निधी देऊनही रस्ता कामांच्या साध्या निविदाही तुम्हाला काढता आल्या नाहीत. ही शरमेची बाब आहे. आता जे बोलतोय ती शेवटची ताकीद आहे. जास्त दिरंगाई कराल तर महापालिकाच बरखास्त करून टाकू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (१७ जुलै) दिला. आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनाही त्यांनी झापले. दरम्यान, कचरा प्रश्नावरून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेने या महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारली.


विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी २.१५ ते ३.०० अशा पाऊण तास झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी १५ लाख औरंगाबादकरांना कायम वेठीस धरणाऱ्या मनपाच्या कारभाराची अक्षरश: चंपी केली. ९ मार्च रोजी नगरविकास मंत्रालयाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी कचरामुक्तीसाठी पाचकलमी कार्यक्रम दिला होता. त्याची मनपाने अंमलबजावणी केलीच नाही. त्याचा थेट उल्लेख न करता फडणवीस म्हणाले की, शहरातील सर्व कचरा कधी उचलून नेला जाणार आहे, याचा व्यवस्थित रोड मॅप दोन दिवसांत सादर करा.


ही शेवटची ताकीद असे म्हणाले : उपमहापौर विजय औताडे म्हणाले की, ‘मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांशी बोलताना मी ही शेवटची ताकीद देतोय. यानंतर बोलणार नाही. महापालिका बरखास्तीची थेट कारवाई करेल, असे सांगितले. कचरा, रस्त्याचे काम रखडल्याने विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री कमालीचे नाराज होते.


रस्त्याच्या निधीचाही कचरा : औरंगाबादेतील रस्त्यांसाठी गेल्या वर्षी १०० कोटी दिले होते आणि तेवढेच पैसे देण्याची माझी इच्छा होती. परंतु वर्षभरात तुम्ही साध्या निविदा काढू शकले नाहीत. ही शरमेची बाब आहे. तातडीने निविदा प्रक्रिया पूर्ण करा. तुम्हाला जमत नसेल तर मला सांगा. दोन्हीही कामांत अशीच दिरंगाई सुरू राहिली तर मी महापालिका बरखास्त करून टाकीन, असेही फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत बजावले. निविदांना वेग देण्याची जबाबदारी त्यांनी डॉ. निपुण यांच्यावर टाकली.


कोण होते बैठकीस : नगर विकास खात्याच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, आमदार अतुल सावे, आमदार इम्तियाज जलील, उपमहापौर विजय औताडे, भाजपचे गनटेते प्रमोद राठोड, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, आयुक्त डॉ. निपुण विनायक.


कचरा उचलण्याचे नेमके काय सुरू आहे, असा प्रश्न बागडे यांनी केला. तेव्हा प्रशासन काय करतेय, याची माहिती डॉ. निपुण यांनी दिली. त्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी कचरा किती दिवसांत उचलणार आणि पुढील प्रकल्पाचे काय, याचा रोड मॅप विधानसभा अध्यक्षांसह माझ्याकडे दोनच दिवसांत आला पाहिजे, असे स्पष्ट केले.


दोन वर्षांनी पाण्याची अशीच समस्या निर्माण होईल : दोन वर्षांनी पाण्याची अशीच समस्या निर्माण होईल. त्यावर आतापासूनच पावले उचला. कोणाचा दबाव असेल तर मला कळवा. पण काम थांबता कामा नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

मुख्यमंत्री काय म्हणाले?

- डॉ. निपुण, खास कचरा समस्या सोडवण्यासाठी तुमची नियुक्ती आहे. तेव्हा तातडीने ही समस्या मिटली पाहिजे.
- निविदा प्रक्रियेतील हस्तक्षेप मोडून काढा. ही प्रक्रिया पारदर्शकच झाली पाहिजे.
- मनपाने निश्चित केलेल्या जागांवर कचरा टाकण्यासाठी राजकीय हेतूने विरोध होत असेल तर तो खपवून घेणार नाही. तशी सूचना पोलिस आयुक्तांना केली आहे.

 

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून मनपा बरखास्तीची नेमकी तरतूद काय?

- मुख्यमंत्र्यांनी मनपा बरखास्तीचा इशारा दिला. परंतु, कायद्यात यासंदर्भात नेमकी काय तरतूद आहे, हे दिव्य मराठी प्रतिनिधीने तज्ज्ञांकडून जाणून घेतले.

- महाराष्ट्र प्रांतिक महापालिका अधिनियमाच्या कलम ४५२, ५४ आणि ५५ मध्ये मनपा बरखास्तीची तरतूद आहे.

- ८ मार्च १९९९च्या बिहार सरकार बरखास्तीच्या निर्णयाचा हवाला देऊन तज्ज्ञांनी सांगितले -
सद्य:स्थिती पाहता मनपा काहीच करत नाही, असे नाही. त्यामुळे तातडीने मनपा बरखास्त करणे मुख्यमंत्र्यांना शक्य होणार नाही. तसा प्रयत्न केलाच तर तो कोर्टात टिकणार नाही.

 

या कारणाने होऊ शकतो बरखास्तीचा निर्णय
- मनपाने मूलभूत कर्तव्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले.
- मनपाने जनहिताच्या विरोधात काम केले.
- महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान होईल, असे निर्णय घेतले असल्यास.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, भाजपचा सवाल : खैरे, आता सांगा कचऱ्यात कोण राजकारण करतंय?

 

हेही वाचा, 
औरंगाबाद कचऱ्याचा प्रश्न विधान परिषदेत ‘पेटला’, शिवसेनेकडून समस्यांचा वापर दंगल पेटविण्यासाठी हाेत असल्याचा अाराेप

-  'कचराकोंडी माय फूट' शिवसेना समांतरच्या 'पाण्या'तच व्यग्र, शहरापेक्षा 'स्वारस्य' महत्त्वाचे!

- प्रखर विरोध तरी मनपाने पडेगावात टाकला कचरा, गाड्या स्थानिकांनी अडवल्या

 

 

बातम्या आणखी आहेत...