आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा समस्या 'निपुण' आयुक्त सतरा मिनिटे बोलले, पण उत्तर दिलेच नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बुधवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू होताच झाडून साऱ्या नगरसेवकांनी कंठशोष करत आमच्या वॉर्डातील कचऱ्याची समस्या कधी मिटणार, असा एकच सवाल केला आणि त्याचे उत्तर आयुक्तांनी उत्तर द्यावे, असे म्हटले. सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांपासून १ वाजून ५० मिनिटांपर्यंत सर्व नगरसेवक बेंबीच्या देठापासून ओरडत होते. समस्या सांगून उत्तर मागत होते. दिल्लीत स्वच्छता अभियान प्रकल्पात घनकचऱ्याचे तज्ज्ञ म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्तपदी नियुक्त केलेले डॉ. निपुण विनायक काही तरी उत्तर देतील, कचरा मार्गी लावण्यासाठी आपल्याकडे असलेले उपाय सांगतील, असे सर्वांनाच अपेक्षित होते. डॉ. निपुण बरोबर १७ मिनिटे बोलले. आतापर्यंत वेळोवेळी त्यांनी जे सांगितले आहे त्यातच फोडफाड करून निविदा प्रक्रिया कुठपर्यंत आली, कचरा वर्गीकरण, वाहतूक याचे खासगीकरण केल्यानंतर आपण काय खबरदारी घेणार आहोत, याची माहिती दिली. परंतु आता रस्त्यावर पडलेल्या कचऱ्याचे काय, नवीन प्रकल्प सुरू होऊन कचरा प्रश्न सुटेल कधी, याचे उत्तर त्यांनी दिले नाही. उलट बोलणे संपवताना मी जरा जास्तच बोललोय, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. उर्वरित पान.६ 


नगरसेवकांची माफक अपेक्षा : कोठेही न्या पण आमच्या वॉर्डातून कचरा हलवा 
वाॅर्डातील कचरा काहीही करून उचला एवढीच माफक अपेक्षा नगरसेवकांची आहे. कोठेही न्या पण हा कचरा येथून हलवा. पडून असलेल्या कचऱ्यावर आजवर प्रक्रिया झाली नाही आणि होण्याची शक्यताही नाही. त्यामुळे तो कचरा हलवा एवढीच त्यांची मागणी आहे.त्यासाठी आयुक्त काय करतात हे त्यांना जाणून घ्यायचे होते. त्यांच्याकडे काय योजना आहे, याची माहिती त्यांना हवी होती. कचऱ्याचे खासगीकरण केले जाणार आहे. यापूर्वीही रॅम्कीच्या माध्यमातून ते केले गेले होतेच. रॅम्कीने काय दिवे लावले हे सर्वांना माहिती आहे. याचे तसे होऊ नये, अशा सूचनाही त्यांनी केल्या. 


आयुक्त काय म्हणाले त्यांच्याच शब्दात : 
देशातील फक्त ३० टक्के शहरांत कचऱ्यावर प्रक्रिया होते. १४०० शहरांत आजही कचरा डंप केला जातो. ज्या ३० टक्के शहरांत असे प्रकल्प उभे राहिले, त्यांना वेळ लागला. आपल्यालाही वेळ लागेल. मिक्स कचरा हा आपला प्रॉब्लेम आहे. कोर्टाच्या आदेशानुसार नियुक्त समितीने चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव, नक्षत्रवाडी येथे प्रक्रिया करण्याचे निश्चित केले होते. चुकीच्या पद्धतीने कचरा टाकल्याने परिसरातील नागरिकांना त्रास होतोय हे खरे आहे. परंतु आम्ही यापुढे खबरदारी घेऊ. एक हजार घरांमागे एक अशा प्रमाणात आम्ही ३०० रिक्षा खरेदी करतोय. कचरा टाकण्याची सोय झाली म्हणजे कचरा रस्त्यावर येणार नाही. ती सोय नसल्याने कचरा रस्त्यावर येतोय. या कामाचे आम्ही खासगीकरण करतोय. रॅम्कीचा प्रकल्प का अयशस्वी झाला हे आम्ही तपासू. भावी प्रकल्प १०० टक्के यशस्वी होईल, यासाठी प्रयत्न करू. 


> खासगीकरणानंतर मनपाचे जे कर्मचारी अतिरिक्त ठरणार आहेत, त्यांच्याकडे सुपरवायझर तसेच मालमत्ता कर वसुलीचे काम दिले जाईल. सध्या कचऱ्यावर आपण वर्षाला ६५ कोटी रुपये खर्च करतोय. पुढे तो कमी होईल. सध्या आपले कर्मचारी वेळेपूर्वीच घरी जातात. त्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक सुरू करण्याचा विचार आहे. त्यामुळे ते वेळेत कामावर येतील आणि वेळ संपेपर्यंत काम करतील. ( यापलीकडे त्यांनी आता रस्त्यावर पडलेल्या कचऱ्याचे काय, याचे उत्तर दिले नाही.) 


'दिव्य मराठी'चाही ठोस उत्तरासाठी आयुक्तांकडे सातत्याने पाठपुरावा 
कचरा समस्येचे तज्ज्ञ अशी ओळख असलेल्या डॉ. निपुण यांनी औरंगाबादेतील कचरा समस्येविषयी १५ लाख औरंगाबादकरांच्या अपेक्षांवर ठोस उत्तर द्यावे, यासाठी दिव्य मराठीने पाठपुरावा केला आहे. तो असा. 
> १३ मे रोजी सायंकाळी डॉ. निपुण रुजू झाले. १४ मे रोजी दिव्य मराठी प्रतिनिधीने विचारणा केली. कचरा प्रश्न कधी सुटेल, मिटेल हेच नागरिकांना जाणून घ्यायचे आहे. त्यामुळे आम्हाला तेवढेच उत्तर द्या, असेही म्हटले. तेव्हा त्यांनी "मी आत्ताच काही सांगणार नाही. मला १० दिवसांचा वेळ द्या, अभ्यास करून सांगतो,' असे उत्तर दिले. 
> परंतु, मे महिन्यात ते बोललेच नाही. पाहणी सुरू आहे. निविदा प्रक्रिया सुरू आहे, असेच त्यांचे उत्तर होते. 
> २७ जून रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात झालेल्या बैठकीनंतर पुन्हा तोच प्रश्न विचारला. तेव्हा दोन दिवसांत लेखीच देतो, असे त्यांचे उत्तर होते. 
> तब्बल ११ दिवस प्रतीक्षा केल्यावर ९ जुलैला 'दिव्य मराठी'ने एसएमएस टाकून त्याचे काय झाले? असा प्रश्न केला. 
> त्याच दिवशी म्हणजे ९ जुलैला त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घनकचरा व्यवस्थापनाचे खासगीकरण करण्यात येईल, असे सांगितले. सोबत कचरा प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी वेळ मिळाला नसल्याची कबुली त्यांनी दिली. 
> ११ जुलैच्या मनपा सभेतही त्यांनी ठोस उत्तर दिले नाही. 

बातम्या आणखी आहेत...