आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हर्सूलमध्ये भाजप नगरसेवकाचीच कचऱ्याच्या वाहनांवर दगडफेक, उपायुक्तांना धक्काबुक्की

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महापालिकेने नियोजन केल्यानुसार हर्सूल-सावंगी तलाव परिसरात दोन दिवसांपासून प्रक्रियेसाठी कचरा टाकण्यास सुरुवात झाली. मात्र, शनिवारी अचानक भाजप नगरसेवक पूनमचंद बमणे व त्यांच्या समर्थकांनी प्रचंड विरोध करत महापालिकेच्या वाहनांना पळवून लावले. स्वत: बमणे यांनी मोटारींवर दगडफेक करत घनकचरा व्यवस्थापन प्रमुख विक्रम मांडुरके यांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ, धक्काबुक्की केली आणि धमकावले. 


बमणे यांना दोन दिवसांनंतर अचानक का जाग आली? असा सवाल करत यामागे राजकारण असल्याची चर्चा आहे. कारण उद्धव ठाकरे यांना महापौरांनी ३० एप्रिलपर्यंत शहरातील कचरा प्रक्रियेच्या ठिकाणी वाहून नेला जाईल, असे आश्वासन दिले होते. ठाकरेंचा शब्द वाया जावा यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आधीपासूनच होती. या घटनेमुळे त्याला पुष्टी मिळाली. 


विरोध केला, दगडफेक केलीच नाही : बमणे 
हर्सूल सावंगी तलावाच्या बाजूलाच महापालिकेचे कर्मचारी कचरा आणून टाकत होते. तलाव तसेच तलावाशेजारी तीन-चार विहिरी आहे, ज्यातून शहरातील ३० हजार नागरिकांना पाणीपुरवठा होतो. आसपासच्या गावांच्या पाणीपुरवठा योजनाही येथे आहेत. कचऱ्यामुळे पावसाळ्यात येथील पाणीपुरवठा दूषित होण्याचा धोका आहे. म्हणून विरोध केला, असे बमणे यांचे म्हणणे आहे. दगडफेक केल्याचा त्यांनी इन्कार केला. 


सकाळी वाद, सायंकाळी काडी लावली 
हर्सूल सावंगी येथे दोन दिवसांत टाकलेल्या कचऱ्यावरून सकाळी वाद झाला, तर सायंकाळी कोणी तरी कचऱ्याला काडी लावली. त्यामुळे परिसरात धूरच धूर झाला होता. जळगाव रस्त्यावरून जाणाऱ्यांनाही याचा फटका बसला. प्रक्रिया करण्यास आमची हरकत नाही, पण कचरा टाकायचा अन् तो पेटवून द्यायचा हेच काम सध्या महापालिका करत आहे. येथेही त्यांनी तेच केले, असे बमणे यांनी सांगितले. 


महापौरही म्हणाले, आता प्रकरण मिटले! 
हर्सूल येथे दगडफेक झालीच नसल्याचा युक्तिवाद व दावा महापौर-उपमहापौरांच्या जोडीने केला. आम्ही तेथे गेलो होतो.लोकांनी विरोध केला, मात्र दगडफेक झाली नाही. जो वाद झाला होता तो आम्ही मिटवला. त्यांनी दगडफेक झाल्याचाच इन्कार केल्याने गुन्हा नोंदवण्यावर त्यांनी भाष्यच केले नाही. तर मीच लोकांशी भांडलो, ते कशाला दगड मारतील, असा युक्तिवाद उपमहापौर औताडे यांनी केला. 

 

मांडुरके म्हणाले, सहकार्य करा, अन्यथा मी जातो 
९ मार्चपासून शहरातील घनकचरा व्यवस्थापन मांडुरकेच सांभाळत आहेत. त्यांना अन्य अधिकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे वेळोवेळी समोर आले. सकाळी हर्सूल येथे कचरा टाकण्यास विरोध झाला तेव्हा मांडुरकेच सर्वप्रथम तेथे गेले. मात्र, जमाव त्यांच्यावरच चालून आला. कोठेही कचरा टाकता, तुम्ही अधिकारी पदाची परीक्षा कशी पास झालात, असा सवाल करत त्यांना धक्काबुक्कीही केली. धक्काबुक्की करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी महापौर व उपमहापौरांकडे केली. मात्र, महापौरांनी 'नंतर बघू'ची भूमिका घेतली, तर गावचा विषय असल्याने उपमहापौर जमावाच्या बाजूने उभे राहिले. त्यानंतर मला जर पदाधिकाऱ्यांचे सहकार्य मिळणार नसेल तर मी मूळ नियुक्तीच्या ठिकाणी जातो, असे मांडुरके म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...