आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोंडी तक्रारीवर गुन्हा नोंदवण्याऐवजी सीपींनी श्रीरामेंना पाठवले होते सक्तीच्या रजेवर!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- तब्बल दोन आठवडे ती पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवत होती. पण दररोज तिला उद्या बघू, नंतर बघू, आताच काही करता येत नाही, असे म्हणून टोलवले जात होते. आता आपल्याला न्याय मिळणारच नाही, असे लक्षात आल्यावर त्या पीडितेने पोलिस आयुक्तालयाच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावरच थेट तक्रार नोंदवली आणि यंत्रणा हलली. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात २६ जून रोजी मध्यरात्री २२ वर्षीय तरुणीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. 


अशा प्रकारच्या इतर प्रकरणांत तत्काळ आरोपीला अटक करणाऱ्या पोलिसांनी श्रीरामेंना बुधवारी रात्री उशिरापर्यंत अटक केली नव्हती. त्या दिशेने पावलेही उचलली नव्हती. हे प्रकरण संवेदनशील आहे. त्यामुळे चौकशी करून कारवाई केली जाईल, असे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले. 


दरम्यान, १२ जून रोजी पीडितेची तोंडी तक्रार आल्यावर १३ जून रोजीच पोलिस आयुक्तांनी श्रीरामेंना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. मात्र, तक्रार दाखल करून पुढील कारवाई करणे टाळले होते, असे समोर येत आहे. दुसरीकडे पीडिता अद्याप सापडली नसल्याचा दावाही पोलिस करत आहेत. 


पोलिस आयुक्त म्हणतात, मी यावर बोलू शकणार नाही 
पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना थेट विचारणा केली असता म्हणाले की, नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. प्रकरण संवेदनशील असल्यामुळे मी सध्या या घटनेवर काहीच बोलू शकत नाही. चौकशी झाल्यावर याची माहिती देण्यात येईल. 


गुन्हा दडवणे कठीण असल्याचे कळल्यावर एफआयआर 
पीडितेने थेट पोलिस आयुक्तालयाच्याच व्हॉट्सअॅप हेल्पलाइनवर तक्रार नोंदवल्याने श्रीरामेंचा गुन्हा दडवणे कठीण आहे, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी धावाधाव करत कलम ३७६ बलात्कार, ४१७ फसवणूक, ३२३ मारहाण व ५०६ शिवीगाळ केली म्हणून एमआयडीसी सिडको पोलिसांत गुन्हा दाखल केला. 


तक्रार करू नये म्हणून दोन पोलिस निरीक्षकांनी धमकावले 
पीडितेने फिर्यादीत म्हटले की, तक्रार करू नको असे म्हणत पोलिस निरीक्षक कैलास प्रजापती व शिवाजी कांबळे यांनी घरी येऊन धमक्याही दिल्या. त्यामुळे भाऊ, लहान बहीण, आईच्या जीवितास धोका आहे. संबंधितांनी हे आरोप फेटाळले. 


तपास अधिकारी म्हणतात : काही बोलणे चुकीचे होईल 
बलात्काराच्या इतर प्रकरणांत पोलिस गतीने कारवाई करतात. आरोपीच्या तत्काळ मुसक्या आवळण्यासाठी पावले उचलतात. पण श्रीरामेंच्या प्रकरणात कासवगती दिसून आली. तपास अधिकारी, पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी तर चक्क या प्रकरणात बोलणे चुकीचे होईल, असे सांगितले. दिव्य मराठी प्रतिनिधीशी झालेली त्यांची प्रश्नोत्तरे अशी. 


प्र. : श्रीरामेंना अटक होणार का? आणि कधी होणार? 
उ. :
आताच काही सांगता येणार नाही. 
 

प्र. : पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला आहे का? 
उ.
: काहीही सांगता येणार नाही. 
 

प्र. : श्रीरामेंवर खरेच कारवाई होईल का? 
उ. :
मी तपास अधिकारी आहे. आता काहीही बोलणे चुकीचे होईल. 
 

प्र. : तपास तरी सुरू झाला आहे की नाही? 
उ. :
मंगळवारी मध्यरात्री गुन्हा दाखल झाला आहे. माझ्या सोबतची टीम पुढील तपास करीत आहे. 


भक्षक बनलेल्या काही रक्षकांवर यापूर्वीही झाले होते असे गुन्हे 
पोलिस म्हणजे समाजातील पीडित, शोषितांचे रक्षक असे म्हटले जाते. प्रत्यक्षात काही रक्षकच भक्षक झाल्याचे काही घटनांतून समोर आले. पोलिसांवर बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील काही असे. 
> २००८ मध्ये तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त बी. यू. पालवे यांच्या विरोधात अल्पवयीन मुलीने बलात्काराची फिर्याद दिली होती. त्यानंतर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही करण्यात आली. मात्र हा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही. 
> २०११ मध्ये तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त संदीप भाजीभाकरे यांच्या विरोधातही एका महिला पोलिस शिपायाने लैंगिक छळाचा आरोप केला होता. तोही नंतर सिद्ध होऊ शकला नाही. 
> गेल्या महिन्यात सिटी चौक पोलिस ठाण्यात एका पोलिस शिपायाच्या विरोधात एका तरुणीने बलात्काराची तक्रार दिली होती. त्यावरून त्याला १८ जून रोजी अटक करण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...