आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: बियाणे कंपन्यांविरोधात गुन्ह्यांची नोंद, पुढील कारवाई थंड बस्त्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कीडरोग व गुलाबी, शेंदरी बोंडअळीच्या  नुकसानीचे पंचनामे कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करावेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे जी अर्ज भरून घ्यावेत आणि दोषी बियाणे कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी १७ नोव्हेंबर २०१८ रोजी औरंगाबादेत आढावा बैठकीत दिले होते. त्यानुसार कृषी विभागाने राशी, ग्रीन गोल्ड आणि महिकोविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. त्यापैकी एक तक्रार अनधिकृत बियाणे साठ्याबाबत सहा शेतकऱ्यांनी  नोंदवली आहे. मात्र, त्यापुढील तपास व  शेतकऱ्यांच्या फसवणुकीविरोधातील कारवाई गुलदस्त्यात अडकली आहे.   
  

कपाशी बियाणे कंपन्यांनी कीड व रोगास प्रतिबंध करेल असे बियाणे दिले नाही. बीटी बियाणे कालबाह्य झाले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संरक्षक नॉन बीटीचा अजिबात वापर केला गेला नाही. परिणामी गत कपाशीच्या हंगामात बोंडअळी, कीडरोगाचा प्रचंड प्रादुर्भाव होऊन १० ते ६० टक्क्यांवर कपाशी उत्पादनाचे नुकसान झाले आहे.  नोव्हेंबरपासून पंचनामे करण्याचे निर्देश कृषिमंत्री, कृषी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. राज्य कृषी आयुक्त व राज्य कृषिमंत्र्यांनीही स्वत: बांधावर जाऊन कपाशी पिकाची पाहणी केली. त्यानंतर दोषी बियाणे कंपन्यांवर कारवाईचे निर्देश देत  जीएचआय प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यास सांगितले होते.  त्यामुळे  कंपन्यांवर कारवाई करणे आवश्यक होते. मात्र केवळ दोन बियाणे कंपन्यांवर गुन्ह्याची नोंद  केली आहे. 


प्रकरण १ : औरंगाबाद जिल्ह्यातील कुंभेफळचे शेतकरी हरिभाऊ ऊर्फ रामकिशन साहेबराव गोजे यांनी ३० नोव्हेंबर २०१७ रोजी करमाड ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी  नुजिवीडूच्या तीन बॅग, बॅच नंबर ७३६७ कपाशी बियाणे, कावेरी बियाणे कंपनीचे एटीएम, तीन बॅग, बॅच नंबर पीबी ४२४, कॉटबॅक नावाचे  बियाणे आदित्य सीड्स कंपनीच्या चार बॅग, बॅच न २१००४, फास्टक्लास नावाचे बायर कंपनीचे चार बॅग बियाणे, बॅच नंबर ८९००४, सर्व १३ बॅग बियाणे श्रीनिवास कृषी सेवा केंद्र कुंभेफळ येथून ९ हजार ८४० रुपयांत खरेदी करून सात एकरांवर लागवड केली होती.   मात्र, कीडरोग व बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याची कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, तंत्र अधिकारी दिलीप वडकुते, जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी आशिष काळुसे , कृषी अधिकारी दिनकर जाधव यांनी शेतावर येऊन पंचनामा केला तसेच  अहवालही दिला आहे.  त्यांच्या तक्रारीवरून करमाड पोलिस ठाण्यात ३० नोव्हेंबर २०१७ रोजी रीतसर गुन्हा नोंदवला गेला. त्यास अडीच महिने उलटले तरी पुढे कोणतीच कारवाई झाली नाही.   


प्रकरण २ : अजित सीड्सचे बीटी बियाणे बोगस निघाले असून बोंडअळीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे कृषी विभागाने पंचनामे केले आहेत. त्याची प्रत तक्रार अर्जासोबत जोडून गंगापूर तालुक्यातील शेतकरी तथा माजी जि. प. सदस्य संतोष जाधव, संपत रोडगे, योगेश शेळके, भाऊसाहेब शेळके, प्रताप साळुंके, देविदास पाठे, राहुल पारखे यांनी  गंगापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांच्याकडे तक्रार दिली आहे. राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा नोंदवण्यात आला नाही व चौकशी होत नसल्याचे जाधव यांनी सांगितले. अशीच स्थिती सिल्लोड तालुक्यात आहे.


प्रकरण ३ : ग्रीन गोल्ड व राशी, महिकोविरोधात लासूर, जालना व वाळूज पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी ग्रीन गोल्डचा अनधिकृत बियाणे साठादेखील पकडला आहे. याची तक्रार दाखल आहे. त्या पुढील तपासाबाबत विचारणा करतो, अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक प्रतापसिंह यांनी दिली. तथापि  दोषी बियाणे कंपन्यांना पाठीशी घालण्याचे काम सर्व स्तरावर होत आहे. २०१६ मध्ये बंदी घातलेल्या बियाणे कंपन्यांनी बियाणे विक्री केली तर १३ बियाणे कंपन्यांना नोटीस पाठवून केवळ नावाला तीन कंपन्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. 


असे आहे वास्तव     
>औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील ४ लाख ३८ हजार ५९७ शेतकऱ्यांनी जी अर्ज भरले आहेत. त्यापैकी ४३ हजार ६०५ अर्ज बाद झाले आहेत. उर्वरित ३ लाख ९४ हजार ९९२ अर्ज आणि बीज निरीक्षकांनी तेवढेच अर्ज भरले आहेत. जिल्हास्तरीय आय समितीने २८ हजार ४८९ शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. पुढील प्रक्रिया राज्य गुण नियंत्रण अधिकारी यांच्या दालनात पार पडणार आहे.  बियाणे कंपन्यांनी किती नुकसान भरपाई द्यावी हे ठरेल. त्यांना ते मान्य नसल्यास हे प्रकरण न्यायालयातही जाईल. शेतकरी व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाईही निश्चित होऊ शकते.     
>मराठवाड्यातील एकूण २७ लाख ५१ शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे पूर्ण झाले असून १७ लाख ६७ हजार ९४८ हेक्टर कपाशीचे क्षेत्र बाधित आणि १२०२ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने केली आहे. यात जीएचआय बाधित शेतकरी व एकूण क्षेत्रावर झालेल्या नुकसानीची भर पडेल. त्यानुसार बियाणे कंपन्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे.

बातम्या आणखी आहेत...