आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद- निष्ठावंतांना उमेदवारी मिळाली पाहिजे, असे शिवसेनेचे धोरण आहे. ते अनेक वर्षे राबवलेही. पण आता काळ बदलत चालला आहे. त्यामुळे केवळ निष्ठावंत, निष्ठावंत करीत बसण्यापेक्षा निवडून येऊ शकतील, अशी माणसे शोधा आणि त्यांना पक्षात आणा, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी औरंगाबादेत पदाधिकाऱ्यांना दिला. आता निवडणूक जिंकायचीच आहे, असा निर्धार करा व जेथे आवश्यक असेल तिथे निवडून येण्याची ताकद असलेला बाहेरचा उमेदवार मागवा, असे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक उद्धव यांनी गुरुवारी सुभेदारी विश्रामगृहावर बैठक घेतली. त्यात त्यांनी औरंगाबाद जिल्ह्याच्या बैठकीत हे वक्तव्य केले. औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे चित्र २०१४ पूर्वी होतेे. कारण खासदारासह ग्रामीण भागातील कन्नड, वैजापूर, गंगापूरमध्ये सेनेचे आमदार होते. गेल्या निवडणुकीत फक्त कन्नडमधून हर्षवर्धन जाधव विजयी झाले. तो संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले, आता लोकसभा स्वबळावर लढवायची आणि जिंकायचीही आहे. अशा स्थितीत ग्रामीण भागात आपले बळ वाढवावेच लागेल. त्यासाठी केवळ निष्ठावंताला उमेदवारी हा निकष चालणार नाही. त्यापेक्षा एखादा बाहेरचा उमेदवार निवडून येण्याच्या ताकदीचा असेल तर त्याला आयात करा.
स्वबळाची तयारी सुरू
उद्धव म्हणाले, राज्यात यापुढे सेना कुणाशीही युती करणार नाही, हे मी आधीच जाहीर केले आहे. त्यानुसार स्वबळाची तयारी सुरू आहे. डिसेंबरमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेतल्या जाण्याची चर्चा आहे. त्या अनुषंगाने मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांचा पक्ष पातळीवर आढावा घेतला. आता राज्यातील उर्वरित भागातही मी याच पद्धतीने जाऊन आढावा घेणार आहे. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, राज्य संघटक गोविंद घोळवे, मनिषा कायंदे, विनायक राऊत यांचीही उपस्थिती होती.
खोतकरांचा सल्ला : जातीच्या आधारावर उमेदवारी द्यावी
बैठकीस उपस्थित राज्यमंत्री आणि अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेच्या आणखी एका मूळ धोरणाला बदलण्याची मागणी केली. ते म्हणाले की, आतापर्यंत शिवसेना जात-पात न बघता उमेदवारी देत होती. त्यांना निवडूनही आणत होती. मात्र, बदलते राजकीय वातावरण लक्षात घेता मतदारांच्या जातीचे गणित लक्षात घेऊन त्या आधारावरच उमेदवारी दिली पाहिजे, तरच अपेक्षित विजय मिळू शकतो.
हेही वाचा,
कचऱ्याच्या ढिगाऱ्यात दिवस ढकलणाऱ्या औरंगाबादकरांची उद्धव ठाकरे यांनी मागितली माफी
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.