आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा मुक्तिलढ्याचे शिलेदार दिनकर बोरीकर यांचे निधन; आज अंत्यसंस्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठवाडा मुक्तिसंग्रामातील शिलेदार, चिंतनशील लेखक आणि सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  प्रा. दिनकर बोरीकर यांचे मंगळवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.


प्रा. दिनकर बोरीकर हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचारही करण्यात आले. आज त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले होते. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. उद्या सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत त्यांचे पार्थिव सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर ११ वाजता पुष्पनगरी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या निधनामुळे बुधवारी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील स.भु. संस्थेच्या सर्व शाळा व महाविद्यालये बंद राहतील, असे संस्थेच्या वतीने कळवण्यात आले आहे. प्रा. बोरीकर यांच्या पश्चात पत्नी सुहासिनी, तसेच डाॅ. रश्मी बोरीकर, रोहिणी देसाई व डाॅ. रेणू चव्हाण या तीन मुली असा परिवार आहे.

 

प्रा. दिनकर बोरीकर; जन्म : २ सप्टेंबर १९३५ | मृत्यू : १६ जानेवारी २०१८

> प्रा. दिनकर बोरीकर यांचा जन्म २ सप्टेंबर १९३५ रोजी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात झाला.

> त्यांचे शिक्षण एम. ए., बीकाॅम, एलएलबी पर्यंत झाले होते. 

> विद्यार्थी दशेत त्यांनी हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यात उडी घेतली. मनमाड, लोणी, वाशीम या भागांत झालेल्या मुक्तिसंग्राम लढ्यात ते अग्रस्थानी होते. 

 

> हैदराबाद येथे सेंट्रल को आॅपरेटिव्ह युनियनमध्ये सहकार समाचारचे उपसंपादक म्हणून काम. 
> स्वामी रामानंद तीर्थ यांच्या आदेशानुसार तेलंगणा, हैदराबाद येथे खादी प्रचार कार्य केले.

> भाषावार प्रांत रचनेनंतर त्यांनी हैदराबादेतून औरंगाबाद गाठले व सभु संस्थेत प्राध्यापक म्हणून नोकरी सुरू केली. अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी अध्यापन केले. प्राध्यापक पदावरून निवृत्त झाल्यावर त्यांनी संस्थेच्या सरचिटणीसपदाची १९९८ ते २००८ अशी दहा वर्षे धुरा सांभाळली. 

> २००८ ते २०११ या काळात ते सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राहिले तर २०११ पासून आतापर्यंत त्यांनी सभु संस्थचे अध्यक्षपद सांभाळले.

 

विपुल साहित्य लेखन

त्यांनी सातत्याने विविध विषयांवर विपुल लेखन केले. त्यात बाल एकांकिकांपासून संशोधन, कथा, कादंबरी, वैचारिक, आध्यात्मिक आदी विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली. प्रेरणादायी पुस्तके, कविता यांचे अनुवाद त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या ‘रविवारच्या शोधात’ या बाल एकांकिकेला राज्य शासनाचा २००७-०८चा शाहीर अमर शेख पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या गाजलेल्या पुस्तकांत ‘मौलाना आझाद - एक पुनर्मूल्यांकन’, ‘महात्मा गांधींच्या स्वप्नातील ग्रामीण भारत’, ‘सरदार वल्लभभाई पटेल आणि हैदराबादचे विलीनीकरण’, ‘पालकत्वाची गुपीते’, ‘दी वन मिनीट मॅनेजर’, ‘ध्यानदर्शन’ यांचा समावेश आहे.

 

हे ही वाचा, 
माझा सख्खा मित्र...
माणसं जोडणारा माणूस

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...