आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी भाष्‍य: ‘बळा’च्या वापराला समर्थन नाही म्हणजे, दगडफेकीलाही नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात आणि परिसरातील खेड्यांजवळ कचरा साठवायला विरोध करणे हा त्या परिसरातील नागरिकांचा हक्क आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात प्रशासनाने बळाचा वापर करू नये, आमचा त्याला विरोध असेल, अशी स्पष्ट भूमिका ‘दिव्य मराठी’ने प्रारंभापासून घेतली आहे. आजही आमची ती भूमिका कायम आहे; पण याचा अर्थ असा नाही की, असा विरोध करू इच्छिणाऱ्यांनी हिंसक घेऊन पोलिसांवर दगडांचा वर्षाव करावा आणि महापालिकेची कचरा वाहतूक करणारी वाहने जाळून टाकावीत.

 

असले हिंसक बळही आम्हाला मान्य नाही. त्यामुळे बुधवारी मिटमिटा गावात ज्या पद्धतीने विरोध नोंदवला गेला त्याचे आम्ही मुळीच समर्थन करणार नाही. ‘बळाचा वापर मान्य नाही’ याचा अर्थ कोणीही केलेला अशा प्रकारचा असंवैधानिक आणि अमानवीय बलप्रयोग मान्य नाही, असाच होतो. त्या ‘कोणीही’मध्ये ‘सर्वसामान्य पण संघटित नागरिक’ही आलेच. त्यामुळे कचरा टाकायला विरोध करू इच्छिणाऱ्या संबंधित परिसरातील सर्व नागरिकांना आम्ही ‘असला’ विरोध ताबडतोब बंद करण्याचे आवाहन करीत आहोत.

 

बुधवारी मिटमिटा गावात कचऱ्याच्या गाड्यांना विरोध करणाऱ्या ग्रामस्थांनी अत्यंत आक्रमकपणे पोलिसांवर दगडफेक केली. त्यात किमान २५ पोलिस जखमी झाले आहेत. कोण आहेत हे पोलिस? तुमच्या, आमच्या घरातीलच हे सदस्य आहेत. त्यांना आदेश मिळाले म्हणून ते महापालिकेच्या गाड्यांना संरक्षण देण्याचे कर्तव्य पार पाडायला आले आहेत. त्यांची इच्छा आहे म्हणून तुमच्या आमच्या परिसरात कचरा टाकायला ते आलेले नाहीत हे लक्षात घ्यायला हवे. ज्यांना कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची व्यवस्था खूप पूर्वीच करणे आवश्यक होते आणि त्यांनी ती केली नाही, त्यांची शिक्षा जशी कचरा टाकून ग्रामस्थांना देता येणार नाही तशीच ती या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही देता येणार नाही. हाच मुद्दा महापालिकेच्या कचरावाहक गाड्यांच्या बाबतीतही आहे.

 

नागरिकांच्या कराच्या रकमेतून या गाड्या खरेदी केलेल्या असतात. त्या जाळून खाक केल्या तर नुकसान कोणाचे होणार आहे? तुमचे-आमचेच. उलट या निमित्ताने नव्या गाड्या ‘खरेदी’ची सुवर्णसंधीच संबंधितांना मिळणार आहे. शिवाय, अशा जाळपोळीत मोठी दुर्घटनाही घडण्याची शक्यता असते ती वेगळीच. म्हणून असल्या कोणत्याही कृत्याचे समर्थन आम्ही कधीही करणार नाही. जर ग्रामसभेने निर्णय घेतला आणि परिसरात कचरा टाकायला विरोध केला तर महापालिकेने त्या परिसरात कचरा टाकण्याचा प्रयत्नही करू नये. महापालिका तसा प्रयत्न करीत असेल आणि ग्रामस्थांना त्याला विरोध करायचा असेल तर तो विरोध शांततामयच असायला हवा.

 

नारेगाव-मांडकीच्या ग्रामस्थांचे उदाहरण  या बाबतीत ताजे आहे. या विजयाच्या आधी या ग्रामस्थांनी किती भोगले आहे, याचीही कल्पना आम्हाला आहे. तो भोग अन्य ग्रामस्थांच्या पदरी येऊ नये, औरंगाबादकरांनी केलेल्या कचऱ्याची शिक्षा अन्य ग्रामस्थांना मिळू नये, असेच आम्हाला वाटते. म्हणूनच अशा कचऱ्याला विरोध करण्याचा हक्क आहे, असे आम्ही सांगत आलो आहोत. पण तो विरोध शांततामय मार्गाने नसेल, तर आम्ही त्याचे समर्थन मुळीच करणार नाही. त्याच वेळी पोलिसांनी निष्पाप मंडळींवर सुडाने कारवाई करू नये, ते दगडफेक करतात म्हणून पोलिसांनी करू नये, अशीही अपेक्षा आहे. पोलिसांच्या अशा कृत्याचीही पाठराखण आम्ही करणार नाही.

बातम्या आणखी आहेत...