आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१०४ दिवसांनी डीजी आले, लोकांशी बोलून म्हणाले, असे नगरसेवक का निवडून देता?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- हजारो लोकांशी संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या शासकीय समित्या कसा कारभार करतात, याचा एक नमुना गुरुवारी औरंगाबादकरांना पाहण्यास मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ मार्च रोजी मिटमिटा दंगल प्रकरणाची चौकशी पोलिस महासंचालकाच्या अध्यक्षतेखाली होईल, असे जाहीर केले. त्यानंतर तब्बल १०४ दिवसांनी महासंचालक सतीशचंद्र माथूर औरंगाबादेत आले. मिटमिटा येथे जाऊन लोकांशी बोलण्याऐवजी त्यांनाच आयजी कार्यालयात बोलावून एसी सभागृहात चार तास बोलणे त्यांनी पसंत केले. लोकांनी पोलिसांच्या अमानुष लाठी हल्ल्याची वर्णने सांगताना नागरी समस्याही मांडल्या. तेव्हा लाठी हल्ल्याला बगल देत 'या समस्या सोडवू न शकणाऱ्या नगरसेवकाला का निवडून देता?' असा सवाल त्यांनी केला. 


शासनाकडून सर्वतोपरी मदतीसाठी प्रयत्न करू असे गुळगुळीत आश्वासन त्यांनी दिले.  दरम्यान, लाठी हल्ल्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्यांनी जाणीवपूर्वक टाळल्याचेही समोर आले.   


नारेगाव येथील डेपो आंदोलकांनी बंद केल्यावर ७ मार्च रोजी काही ट्रक तत्कालीन आयुक्त दीपक मुगळीकर यांनी अचानकपणे मिटमिट्याकडे वळवले. त्यामुळे संतापलेल्या लोकांनी दगडफेक केली. मग पोलिसांनी त्यांच्यावर तुफानी लाठी हल्ला केल्याने दंगल भडकली होती. पोलिसांनी महिलांसह अनेक निष्पापांना घरात घुसून जबर मारहाण केल्याचेही सीसीटीव्ही फुटेज, मोबाइलवर चित्रित व्हिडिओवरून उघड झाले. आमदार इम्तियाज जलील, संजय शिरसाट यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने या प्रकरणाचे विधिमंडळ अधिवेशनात पडसाद उमटले. मग मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवत असून दंगलीची पोलिस महासंचालकांमार्फत चौकशी करण्याचे जाहीर केले.


कागदाला कागद जोडला : इम्तियाज जलील, आमदार
‘गेल्या काही महिन्यांपासून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे माथूर यांनी मिटमिटा, जुन्या औरंगाबादेत लोकांच्या भेटी घेऊन त्यांना धीर देणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. चार जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यात आम्ही मिटमिटाप्रकरणी आवाज उठवणार असल्याचे लक्षात आल्यावर माथूर यांनी गुरुवारी चौकशीचा सोपस्कार करत कागदाला कागद जोडला, बाकी काहीही केले नाही, असे दिसते”    

 

सेवा निवृत्तीमुळे आले : चंद्रकांत खैरे, खासदार 
‘शहरातील भयंकर घटनांची माहिती मी त्यांना पत्राद्वारे दिली. सिटी चौकात दोन दिवसांपूर्वी जे घडले. त्याचीही माहिती पत्रात आहे. त्यामुळे ते मिटमिटा तसेच सिटी चौक भागात पाहणी करतील, असे वाटले होते. आता सेवानिवृत्तीला दोन दिवस बाकी असल्याने ते भेटीगाठीसाठीच औरंगाबादेत आले असावेत”
  

ठोस काही नाही : शिवाजी गायकवाड, रहिवासी मिटमिटा
‘चौकशी समिती मिटमिट्यात येऊन लोकांशी बोलेल, असे वाटले होते. पण त्यांनी आम्हालाच त्यांच्याकडे बोलावले. म्हणणे शांतपणे ऐकून घेतले, पण ठोस आश्वासन काहीच दिले नाही.  ’ 


महिलांना रडू आवरेना
अॅड.अशोक मुळे, अजबराव मुळे, शिवाजी गायकवाड, हिरालाल वाणी, आर.बी.चव्हाण, विश्वनाथ चव्हाण, अण्णासाहेब वाकळे, दौलत चेचोड आदींनी पोलिसी कारवाई कशी निर्दयी होती, याची माहिती दिली. पोलिसांनी घरात घुसून कशी मारहाण केली हे सांगताना महिलांना रडू आवरत नव्हते. जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार करणाऱ्या डॉक्टर तसेच कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकचालकांचे म्हणणे माथूर यांनी ऐकून घेतले. शिवाय लाठीमार करणाऱ्या आणि जमावाच्या दगडफेकीत जखमी पोलिस कर्मचाऱ्यांकडून घटनाक्रम जाणून घेतला. चौकशीच्या वेळी विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, छावणी विभागाचे सहायक आयुक्त ज्ञानोबा मुंढे आदी उपस्थित होते.

 

डीजींनाही मुद्दा मिळाला 
दुपारी साडेबाराच्या सुमारास आयजी कार्यालयातील वातानुकूलित कॉन्फरन्स हॉलमध्ये चौकशीला प्रारंभ झाला. पहिला अर्धा तास समितीने नगरसेवक रावसाहेब आमले यांच्या नेतृत्वातील गावकऱ्यांचे म्हणणे ऐकले. ७ मार्च रोजी मनपा सफारी पार्कच्या जागेत कचरा टाकणार अशी माहिती मिळाल्यामुळे आम्ही संतापलो होतो. आमच्यावरील पोलिस लाठी हल्ल्यास पहिली दोषी मनपा असल्याचा सूर लोकांनी लावला. १९८० पासून आम्ही मिटमिट्यात राहतो. आम्हाला मनपाने अजूनही नळाचे पाणी दिले नाही. आम्ही तळ्याचे पाणी वापरतो, असे लोक म्हणताच माथूर यांना बोलण्यासाठी मुद्दा मिळाला. नागरी समस्या कायम ठेवणाऱ्या नगरसेवकांना का निवडून देता, असा थेट सवाल त्यांनी केला. 


मिटमिटाच नव्हे जुन्या औरंगाबादकडेही फिरकले नाही 
७ मार्च रोजी मिटमिट्यात तर ११ मे रोजी जुन्या औरंगाबादमध्ये दंगल उसळली होती. दोन्ही भागांना माथूर भेट देतील. लोकांची भेट घेऊन दिलासा देतील, अशी अपेक्षा होती. पण ते फिरकले नाही. दोन दिवसांपूर्वी आमदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वातील जमावाने सिटी चौक पोलिस ठाण्यासमोर जमावबंदी धुडकावून आंदोलन केले. पोलिस एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप करत पोलिसांवर बांगड्या फेकण्यात आल्या. नोटा दाखवण्यात आल्या. त्याची चौकशी करणे त्यांनी टाळले. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी 'आता काही बोलणार नाही' असा पवित्रा घेतला. आणि सायंकाळी ते मुंबईला परतले. 


ही होती मिटमिटावासियांची मागणी 
पोलिसांनी आमच्यावर घरात घुसून लाठी हल्ला केला. वाहनांची मोडतोड केली. त्याचे सीसीटीव्ही फुटेज आहे. तरीही आमच्यावरच कलम ३०७ प्रमाणे गुन्हे दाखल केले. ते मागे घ्या. नुकसान भरपाई द्या. 


काय घडले होते ७ मार्च रोजी

मिटमिटा ग्रामस्थांनी दोन ट्रकसह काही दुचाकी पेटवून दिल्या. दगडफेक केली. पोलिसांच्या लाठीमारात किमान २३० लोक जखमी झाले. त्यातील काही जणांना घराबाहेर काढून झोडपण्यात आले. 


माथूर यांच्या अध्यक्षतेखालील समिती चौकशीचा सोपस्कार पार पाडण्यासाठीच आल्याचे वातावरण पाहण्यास मिळाले. माथूर दोन दिवसानंतर सेवानिवृत्त होत आहे. त्यानिमित्ताने पोलिस दलातर्फे त्यांच्या निरोप वजा सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. त्यात चौकशी जोडल्याची चर्चा पोलिस अधिकाऱ्यांत होती. 


प्रत्यक्षात दिले हे आश्वासन 
संपूर्ण घटनेचा अहवाल लवकरच गृहविभागाला सादर करण्यात येईल. शासनाकडून पीडितांना योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. 

बातम्या आणखी आहेत...