आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परतीच्या मान्सूनवर अल निनोचे सावट, ऑगस्‍टमध्‍येही पावसात खंड पडण्‍याची शक्‍यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जून -जुलैमध्ये राज्यातील व देशातील काही भागात खंड पडलेल्या मान्सूनवर आता अल निनोचे सावट घोंघावते आहे. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यातील पावसावरच खरिपाची मदार आहे. ऑगस्ट महिन्यातही पावसात खंड पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आपत्कालीन पीक व्यवस्थापनासह पेरणीचे नियोजन केल्यास खरिपात काही तरी पदरात पडण्याची आशा अाहे.  


अमेरिकेच्या नॅशनल क्लायमेट प्रीडीक्शन सेंटरच्या अहवालानुसार, ऑगस्ट-सप्टेंबर-ऑक्टोबर या काळात अल निनो सक्रिय होण्याची शक्यता ५७ टक्के आहे. याचा परतीच्या पावसावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मराठवाडा, खान्देश आणि विदर्भ हे विभाग परतीच्या पावसाचे मानले जातात.


पावसाचे प्रमाण वाढणार
या आठवड्यात उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भावर हवेचा दाब ९९६ ते १००० हेप्टापास्कल राहील, त्यामुळे पावसाचे प्रमाण निश्चित वाढेल. मराठवाड्यात वाऱ्याचा वेग ताशी  १३ ते १४ किलोमीटर राहिल्यास, पावसाचे प्रमाण कमी होईल. ओडिशानजीक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे या आठवड्यात पूर्व विदर्भ व पूर्व मराठवाड्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.  ऑगस्टमध्ये पावसात काही प्रमाणात खंड पडतील.
-डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ

 

एक्‍सपर्ट व्‍ह्यू- एक पीक नको, आंतरपीक पद्धत वापरा

जुलै महिना खरिपासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ऐन जुलैमध्येच राज्यातील अनेक भागात पावसाचा ७ ते १४ दिवसांचा खंड पडला आहे. पेरा न झालेल्या भागात आपत्कालीन पीक व्यवस्थापनाचे योग्य नियोजन केल्यास काही प्रमाणात खरीप हाती लागण्याची आशा आहे. १५ जुलैनंतर पेरणीची वेळ आल्यास आंतरपीक पद्धतीचा वापर करावा. यासाठी कापूस आणि सोयाबीन एकास एक ओळ (१:१) असा पेरा करावा किंवा सोयाबीन-तूर (४:२), तूर आणि तीळ (१:२), बाजरी -तूर (३:३), ज्वारी -तूर (३:३) अशी आपल्या सोयीनुसार पेरणी करून जोखीम कमी करता येईल. कमी कालावधीचे वाण वापरावे. मूग-उडीद पेरणी आता टाळावी, तर २० जुलैनंतर कापूस आणि सोयाबीन पेरा टाळावा.

 

 

गुलाबी बोंडअळीचा बंदोबस्त आत्ताच करा
पहिल्या पावसानंतर गुलाबी बोंड अळीचे पतंग कोषावस्थेतून बाहेर पडले आहेत.
गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र सुरू झाले असल्याने कापसामध्ये आताच  कामगंध  सापळे लावल्यास गावामध्ये नर पतंगाची मास ट्रॅपिंग करता येईल.
फुलोरा अवस्था येण्यापूर्वी हे पतंग  कामगंध  सापळ्यात पकडून मारल्यास त्यांचे प्रजनन कमी होईल.

 

कामगंध सापळे; वापर असा करा
- कामगंध  सापळा किंमत : रु ४० ते ६० / सापळा

- एकरी ८ सापळे पिकापेक्षा १ फूट उंचीवर लावावेत. 

- दर ६० दिवसांनी सापळ्यातील ल्युर बदलावी

- सतत ३ दिवस ८ पतंग सापळ्यात आढळल्यास आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असे समजून३५-४५ व्या दिवशी पाते व फुले अवस्थेत ५% निंबोळी अर्क  फवारावे.

 

अल निनोचे संकट येण्याची शक्यता

- अमेरिकेच्या नॅशनल प्रीडिक्शन सेंटरच्या अहवालानुसार, जुलै ते नोव्हेंबर या काळात अल निनोची सक्रियता वाढण्याची शक्यता आहे.
- नोव्हेंबरनंतर अल निनो चांगलाच सक्रिय होऊन तो मार्च- एप्रिल २०१९ पर्यंत राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...